कबीर सिंग आणि नैतिकता


एक खूप छान वाक्य आहे. Even a clock that does not work is right twice a day.

याचा अर्थ कुठलीही गोष्ट पूर्णतः निरुपयोगी नसते. त्यातून आपण काय घ्यायचं हे आपल्याला कळायला हवं.

अर्जुन रेड्डीचा रिमेक असलेल्या कबीर सिंगवरून जो गदारोळ माजलाय त्यावर खरं तर बोलायचं टाळत होतो, पण रहावलं नाही. शाहिदने रंगवलेला नायक दारुडा, ड्रग एडिक्ट, स्त्रीलंपट, लिंगपिसाट वगैरे दाखवला असल्याने तो बऱ्याच जणांना खटकला आहे. असा नायक दाखवण्याची ही पहिली वेळ नक्कीच नाही. अर्थात, त्याच्या वागण्याचं समर्थन अजिबात नाहीये. कारण, मी कबीर सिंगला केवळ एक पात्र म्हणून पाहतोय, म्हणून ते परफेक्ट असावं हा माझा अट्टहास नाही. कारण, शाहीदचा 'विवाह' पाहिल्यानंतर मी शंभर टक्के संस्कारी झालो नव्हतो, त्यामुळे कबीर सिंग पाहून मी बिघडेल, असंही मला वाटत नाही. एखादा चित्रपट एखाद्या चांगल्या-वाईट पात्राच्या समर्थनार्थ आहे किंवा नाही, यावर आणि त्याच्या नैतिकतेवर प्रश्न निर्माण करण्यापेक्षा तुम्ही त्यातून काय आत्मसात करता हे महत्त्वाचं. शिवाय त्यातलं काहीच पटलं नसेल तर न पाहण्याचा मार्ग मोकळा आहेच. मागे मी 'संजू' पाहिला, त्यात मला पर्सनली असं वाटलं की राजू हिराणीने हा सिनेमा संजय दत्तची बाजू मांडण्यासाठी केला असावा (खरी की खोटी हा वेगळाच मुद्दा). राजू हिराणीने हा मोह टाळायला हवा होता, असंही वाटलं. यात संजय दत्तलाही ग्लोरिफाय करण्यात आलं होतं. पण या चित्रपटात मला केवळ परेश रावलने उभा केलेला विलक्षण ताकदीचा बाप लक्षात राहिला आणि काही प्रमाणात विकी कौशलने साकारलेला दोस्त आणि रणबीर कपूरने घेतलेली मेहनत. मी संजूमधून एवढंच घेतलं.

कबीर सिंगच्या बाबतीतही मी तेच करतोय. शाहिदने कबीरसाठी भन्नाट ट्रान्सफॉर्म केलंय स्वतःला आणि त्यासाठीच हा चित्रपट पहायचा होता. दुसरं महत्वाचं कारण म्हणजे कबीरचा मित्र शिवा (सोहम मुजुमदार). हे पात्र अर्जुन रेड्डीतही आवडलेलं. मैत्री कशी असावी? तर शिवाने निभावलेल्या पात्रासारखी, इतकी साधी व्याख्या करता येईल, असा हा निर्विवाद बेस्ट परफॉर्मन्स आहे. कबीर स्वतःला कितीही उध्वस्त करण्याचा प्रयत्न करत असताना प्रत्येकवेळी 'मत कर यार..' असं जीव तोडून सांगणारा, आपला मित्र कितीही चुकीची गोष्ट करत असला तरी केवळ मैत्रीपोटी त्याला साथ देणारा, दर वेळी तो त्याच त्या चूक होऊन ज्या खाईत पडतो त्यातून त्याला सुखरूप बाहेर काढणारा शिवा साकारणे सोपं नाहीये.

खरं तर दोघांच्याही मानसिकतेचा विचार केला तर कबीरपेक्षाही शिवा जास्त कॉम्प्लिकेटेड वाटेल. समोरचा माणूस एकाहून एक मुर्खपणाची मालिका आपल्यापुढे करत असताना, जिथे कुठल्याही नॉर्मल माणसाला त्याला प्रत्येक वेळी एक सणसणीत लगावून द्यायची इच्छा होईल, तिथे त्या माणसामागे खंबीरपणे उभे राहणे, शिवाय, वेळोवेळी लटपटणाऱ्या त्याच्या पावलांनाही उभं रहायला मदत करणे. अखेरीस, या सर्वांवर कडी म्हणजे, भूतकाळ विसरून कबीरने सरळमार्गी आयुष्य जगावं म्हणून शिवाने कबीरसमोर ठेवलेला शेवटचा एक पर्याय म्हणजे मैत्रीची परिसीमा गाठणारा आहे.

तसा, मोरली शिवाही चुकीचाच. शिवाच्या पात्रातही काही लोकांना आपल्या मित्राच्या चुकीच्या वागण्याचं समर्थन करणारा अंधमित्र दिसेल. पण या वादातही न पडता आपण फक्त त्याच्या कृतीला एका मित्रत्वाच्या नात्याने पाहिलं तर त्यातली मानसिकता जास्त चांगल्या प्रकारे समजू शकेल.

तात्पर्य इतकंच की शाहिदने साकारलेला कबीर सिंग आवडला, पण असा इसम प्रत्यक्षात कुठे भेटला, तर त्याच्यापासून चार हात लांब रहायला आवडेल. मात्र असा शिवा कुठे भेटला, तर त्या दोस्ताला आयुष्यभर कवटाळून ठेवायचा मोह नक्कीच आवरता येणार नाही.

- राज जाधव (२३-०६-३०१९)

Comments

Popular Posts