मी आणि माझी तीन 'उत्तेजना'र्थ बक्षिसे


मला लहानपणापासूनच चित्रपटांची भयंकर आवड, वेड म्हणा हवं तर. ८० च्या दशकातील जन्म असल्याने आणि ९० च्या दशकात जरा बऱ्यापैकी कळत असल्याने त्या काळाच्या आसपासचे चित्रपट, कलाकार जास्त प्रिय आहेत. व्हीसीआर, टीव्ही, विडिओ पार्लर, ओपन एयर टॉकीज ते बंदिस्त थिएटर ही सर्व माध्यमे आणि प्रत्येकातली वेगळी अशी मजा खूप जवळून अनुभवलेली आहे (त्यात आत्ता विसीडी, डीव्हीडी, कॉम्पुटर, लॅपटॉप आणि मोबाईल हे ऍड होतील, असो).

त्या काळात, तसं चित्रपट पाहणं हा एक सोहळा असायचा, पूर्ण फॅमिलीचाच. सगळ्यांनी एकत्र बसून पाहायचे असे चित्रपट. त्यावेळी चित्रपटही तसे बऱ्यापैकी सोज्वळ असायचे, पण तरीही कुठेतरी काही उत्तेजक, अवघडलेले सीन्सही असायचे. तर असे हे क्षण म्हणजे आमच्यासारख्या दूधखुळ्या (?) मुलांसाठी 'चुळबुळ मोमेंट्स' असायचे.

'चुळबुळ मोमेंट्स' या करिता की ते सीन्स सुरू झाले की काय करावे कळत नसायचे. मग उगीच डोके खाजव, पसरलेले पाय गुंडाळून मांडी घालून बस किंवा वाईस वर्सा. घरातली मोठी मंडळी मग उगाच कामं सांगायची, पाणी वगैरे घेऊन या म्हणून (आणि स्वतः बघत बसायची). तेव्हा काही भले मोठे सीन्स नसल्याने हे मिनिट-दोन मिनिटं चालायचं, पण तोही काळ इतका मोठा वाटायचा की तेव्हा आईनस्टाईनच्या थियरी ऑफ रिलॅटिव्हीटीचा खरा अर्थ कळायचा.

आमची आज्जी तर प्रत्येक हिरोईन तिचीच नात वगैरे असल्यासारखी वागायची. दोघं जरा जवळ आली की हिचेच श्वास भराभर चालायचे, हात धरला तर हिची चलबिचल आणि गालावर जरी ओठ टेकवले गेले तरी हिला ठसका आणि आम्हाला कामं लागायची. नंतर नंतर आम्ही प्रतिबंधक उपाय म्हणून, चित्रपट सुरू होण्याआधीच दोन तीन जग भरून ठेवायला लागलो, तर यांची कामं बदलायला लागली.

एकदा असाच 'दिल' पाहत असताना, आमिर-माधुरीचा पार्टीमधला तो फेमस किसिंग सीन लागणार होता (गणित कच्चं असलं तरी, कोणता सीन केव्हा लागणार, याचे हिशोब ठेवण्याची असामान्य कला लहानपणापासूनच अवगत होती, ती आजतागायत आहे हे नशीब). तर, तो सीन चालू होण्याच्या बऱ्यापैकी आधीच आम्ही आज्जीला तिथून पळवून लावत होतो. बरेच आढेवेढे घेत ती निघाली, पण संगमाची वेळ खूप जवळ जवळ येत होती, म्हणून अजूनच काळजी वाटायला लागली. ही इकडून उठायला आणि माधुरी दिक्षित स्लो मोशनमध्ये आमिरकडे निघायला एकच वेळ झाली. आता ही (माधुरी) काय करतेय, ही उत्सुकता चित्रपटात आणि ही (आज्जी) काय करतेय ही भीती आमच्या मनात, एकाच वेळेस आली. शेवटी कशीबशी जिन्यापर्यंत पोचत, वरती चढत चढत नेमक्या वेळी म्हातारीने मान वळवली (शेवटी आमचीच आज्जी) आणि बया कोसळता कोसळता वाचली. त्या काळात इम्रान हाश्मी नव्हता हे खरोखर आमचं आणि तिचं नशीब, नाहीतर त्याच्यावरच खटला चालवावा लागला असता, असो.

आत्ताच्या काळात जसे मुन्नी, शीला, लैला, रजिया, सुल्ताना, फलाना, ढीकाना, शेंगदाणा, फुटाना अश्या ललना आयटम डान्स करतात, त्यावेळी हे असले प्रकार कमी असायचे.
या सगळ्या बया आणि त्यांची ढीगभर गाणी एकीकडे आणि या सगळ्या जणी झक मारतील अशी त्या काळातील तीन 'उत्तेजनार्थ' गाणी एकीकडे.

एक, 'मिस्टर इंडिया'तले 'काटे नही कटते ये दिन ये रात..'

दोन, 'बेटा'मधले 'धक धक करने लगा'

आणि तीन, 'मोहरा'मधले 'टीप टीप बरसा पानी..'

अस्मानी निळ्या साडीतली श्रीदेवी, हृदयाचे ठोके चुकवणारी माधुरी आणि पिवळ्या साडीतली रविना, या तिघींशिवाय नाइंटीजचा उल्लेख करणं म्हणजे मिठाशिवाय पंचपक्वानांचं कौतुक करणं.

अजून एक जमेची बाजू म्हणजे इथे कुठेही बटबटीतपणा नाही, अंगप्रदर्शन नाही. उत्तेजक वाटत असलं तरी अश्लील नाही.

हे सगळं जमून येण्याचं अजून एक कारण म्हणजे,  पडदयावर दिसणारी दोघांमधली अप्रतिम केमिस्ट्री. नाही म्हटले तरी, अनिल-श्रीदेवी, अनिल-माधुरी आणि अक्षय-रविना यांच्या अफेयरच्या चर्चा रंगलेल्या आहेतच, म्हणून या जोड्या पडद्यावर सहजसुंदर वाटत राहतात, खऱ्याखुऱ्या वाटत राहतात.

आपल्याला आपल्या प्रत्यक्ष आयुष्यातली एखादी आठवण, क्षण, प्रसंग परत एकदा मागे जाऊन रिविझिट करावा, असं वाटतं पण हे शक्य नसतं. याबाबतीत आपण खरंच लकी आहोत. जुने आवडते चित्रपट, अशी प्रिय गाणी लुपवर टाकून कधीही पाहू शकतो आणि नॉस्टॅलजीक होऊ शकतो.

माझ्या चाईल्डहुडने दिलेली ही तीन उत्तेजनार्थ बक्षिसे कायम स्मरणात राहतील. या गाण्यांचा उल्लेख झाल्या झाल्या यातल्या स्टार्टिंगच्या सिग्नेचर ट्यून्स कानात वाजत राहतील, कायम. सदैव.

- राज जाधव (०७-१०-२०१७)

Comments

Popular Posts