सिलसिला, नात्यांच्या गुंतागुंतीचा


प्रेमपट आणि यश चोप्रा यांचा याराना खूप जुना आहे. प्रेमात उतरण्यापूर्वीचा यश चोप्रा, हा खरेतर वेगळ्या अभ्यासाचा विषय.

'दाग' आणि 'कभी कभी' सोडला तर प्रेमपटांपासून हा माणूस तसा जवळपास वीसेक वर्षे दूरच राहिला. तोवर, धुल का फुल, इत्तेफाक, वक्त, दिवार, त्रिशूल, काला पत्थर, मशाल असे एकाहून एक सरस मेनस्त्रीम चित्रपट त्याने दिले. आणि मग आला 'सिलसिला'. त्यानंतर आलेला 'लम्हे' हा खरेतर माझ्या दृष्टीने यश चोप्राचा सर्वोत्तम प्रेमपट, पण त्याविषयी पुन्हा कधीतरी, सध्या 'सिलसिला' बद्दल बोलू.

जया भादुरी, बच्चन होऊन सहा सात वर्षे झालेली, अमिताभ - रेखा ही जोडी त्याच दरम्यान तुफान गाजलेली आणि त्यासोबत त्यांच्या अफेयरच्या बातम्याही. 'सिलसिला' हा त्यांच्या नात्यातील ग्राफचा सर्वोच्च बिंदू म्हणता येईल, त्यानंतर तो ग्राफ कोसळला. कारण त्यानंतर त्यांनी 'म्हणावं असं' एकत्र काम केलं तर नाहीच पण ऑफस्क्रीनही ते एकमेकांपासून दुरावले.

परवीन बॉबी, पद्मिनी कोल्हापुरे वगैरे फायनल करण्यापूर्वी यश चोप्राने फायनली अमिताभ-जया-रेखा ही 'रियल लाईफ' त्रयी कास्ट करून त्यांच्याभोवतीच्या गॉसिपला कॅश करायचा प्रयत्न केला, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. अर्थात, हे तिघे नसते तर चित्रपटाचा तितकासा प्रभाव पडला नसता, कदाचित त्याला एक क्लासिक दर्जाही मिळाला नसता.

तसा चित्रपट अमिताभ-रेखा-जया यांच्यातल्या नात्यावर असला तरी, अमिताभ-रेखा आणि अमिताभ-जया हे पडद्यावरील बॉंडिंग याच्यात खूप फरक आहे. जया - अमिताभ यांच्यामधील सीन्स जितके संयत, मॅच्युअर्ड वाटतात तितकेच अमिताभ - रेखा यांच्यामधील सीन्स अगदी नैसर्गिक वाटतात, दोघांमधील भन्नाट केमिस्ट्री खुलून दिसते.

जयासोबत लग्न होण्याआधीचा आणि नंतरचा अमिताभ यात त्याने कमालीचा समतोल राखला आहे. आपले प्रेम विसरून नैतिक जबाबदारी म्हणून स्वीकारलेल्या नात्याला मनापासून सांभाळत असताना, एके दिवशी नियती अचानक तेच प्रेम त्याच्यासमोर आणून उभे करते, तेव्हा त्याची होणारी घालमेल, तगमग आणि ते परत मिळवण्यासाठीची तडफड अमिताभने नेमकी साकारली आहे. रेखाचीही हालत तीच, लग्नानंतर अमिताभला भेटायला विरोध करणारी पण नंतर अमिताभच्या हट्टापूढे आणि प्रेमापुढे हतबल होणारी रेखाही उत्तम. अमिताभ-रेखा एकत्र इतके खुलले आहेत, की त्यांचे सीन्स पाहिले की वाटते यांना कदाचित कल्पना असावी की यानंतर पुन्हा एकत्र काम करण्याची संधी मिळणार नाही.

अमिताभ, रेखा आणि त्यांची केमिस्ट्री ही गोष्ट चित्रपटातील हायलाईट असली तरी जया भादुरी आणि संजीव कुमार यांनी साकारलेले सपोर्टींग रोल्सही तितकेच महत्वाचे आणि उल्लेखनीय आहेत. चित्रपट जसजसा उत्तरार्धात सरकतो तसतसे अमिताभ-रेखा यांचे प्रेम जया-संजीवच्या लक्षात यावं इतकं बिनदिक्कत फुलत जातं. तरीही जया आणि संजीव, या दोघांचाही संयम कुठेही ढळत नाही.

आपला पार्टनर आपल्याला फसवतोय हे समजल्यावर, दोघांनाही आपापल्या पार्टनरला जाब विचारायचा पूर्ण हक्क आहे, बट दे चुज नॉट टू आस्क आणि हीच गोष्ट जास्त परिणाम साधते. त्यांच्यातील, नेमके उल्लेख टाळून, अमिताभ-रेखाला उद्देशून बोललेले काही सीन्स अफाट जमले आहेत, त्यातील संवाद त्या दोघांच्या कॅरॅक्टर्सचे वेगळेपण अधोरेखित करतात.

म्हणतात ना 'तुम्ही ज्या व्यक्तीवर प्रेम करता, त्याला मोकळे सोडा, ती जर तुमची असेल तर नक्कीच परत येईल', अगदी तसंच, आणि शेवटी होतंही तेच. आपल्या अनेकशा चित्रपटात, लग्नाआधीच्या पहिल्या प्रेमापुढे लग्नसंस्था मोस्टली जिंकतच आलीये, कारण भौतिक सुखाहून नैतिक जबाबदार्या केव्हाही श्रेष्ठ, ही आपली संस्कृती आहे आणि असाच शेवट व्हायला हवा ही आपली मानसिकता.

क्लायमॅक्सच्या पूर्वी अमिताभ जुन्या प्रेमात वाहवत जात असताना, चित्रपटात एक खूप सुंदर डायलॉग आहे, 'तुम्हे इंसान से देवता बनने का हक जरूर हैं, पर देवता से वापस इंसान बनने का नही', अश्या आशयाचा, तो अगदी योग्य वेळी येतो.

अख्ख्या चित्रपटात एक मेजर गोष्ट खटकते. अमिताभ-रेखाला आपली चूक उमगण्यासाठी, चित्रित केलेला प्लेन क्रॅश सिक्वेन्स फारच उथळ आणि अशक्यप्राय वाटतो.

बाकी, जावेद साहेबांची गाणी, शायरी चित्रपटात अजून जान आणतात. शिव-हरीने संगीतबद्ध केलेली 'नीला आसमान', 'ये कहा आ गये हम' आणि 'देखा एक ख्वाब' ही गाणी कायम ओठांवर रेंगाळावीत अशीच आहेत. (नीला आसमानची चाल 'जमीर'च्या वेळी शम्मी कपूर ला सुचली होती, त्याने ती अमिताभला ऐकवलेली, सिलसीलाच्या वेळी अमिताभने शम्मी कपूरची परवानगी घेऊन ती यात वापरली, असेही वाचनात आले). यश चोप्राला स्वतः लाही, त्यांच्या प्रेमपटातील 'सिलसिला' आणि 'लम्हे' सर्वात जास्त आवडतात.

अगदी प्रामाणिकपणे सांगायचं म्हटलं तरी चित्रपटाची अगदीच साधारण अशी बेसिक स्टोरी आहे. 'जुन्या प्रेमींचे वर्तमानात एकमेकांच्या समोर येणे आणि आपला भूतकाळ परत जगण्याचा अट्टहासात हातातलं सगळं काही गमावण्याच्या आधीच सावरत, नियतीने जुळवून दिलेल्या खऱ्या साथीदारांकडे परतणे'. पण यासोबत लाभलेला यश चोप्राचा मिडास टच, जावेद अख्तरची शायरी-गाणी, शिव हरीचं संगीत, अमित-रेखाचा पडद्यावरचा देखणा रोमान्स आणि तितकेच महत्वाचे जया आणि संजीवची प्रगल्भ आणि समजूतदार साथ, याने चित्रपटाला चार चाँद लागतात.

- राज जाधव (१६-११-१७)

Comments

Popular Posts