बाप ट्रायोलॉजी


अमरीश पुरी यांनी खलनायक म्हणून एक काळ गाजवला. पण नव्वदच्या दशकात त्यांच्यातल्या चरित्र अभिनेत्याचे आपल्याला जे दर्शन झाले, ते थक्क करणारे होते. अमरीश पुरीने पडदयावर रंगवलेले 'बाप', हे असामान्य होते, हे मान्य करायला हवं. माझ्या मते ज्या पद्धतीने त्यांनी हिंदी सिनेमात इमोशनल बाप रंगवला, कदाचितच अजून कुणी इतक्या निष्ठेने आणि परिणामकारक रंगवला असेल.

अमरीश पुरी यांनी असंख्य बाप साकारले असतील, हर तर्हेचे. अनेक चित्रपटात खलनायक निभावताना आपल्या मुलाला आपल्याच वाईट मार्गावर चालायला शिकवणारा बाप तर त्याने कित्येक वेळा साकारलाय, त्याला मोजदादच नाही. अर्ध्यसत्यमधला वेलणकरचा बाप हा देखील अंगावर काटा आणणारा होता. फुल और कांटे मध्ये, एके बाजूला लोकांचा थरकाप उडवणारा डॉन आणि दुसरीकडे मुलासाठी आत कुढणारा बाप, हा वेगळा होता. डीडीएलजे, परदेस आणि त्या काळात बऱ्याच तत्सम चित्रपटात आलेला बाप हा काहीसा अलोकनाथ मार्गे जाणारा होता, सभ्य, संस्कारी, तरीही लोकांच्या लक्षात राहणारा.

पण, खऱ्या अर्थाने अमरीश पुरीने साकारलेली 'बाप ट्रायोलॉजी' म्हणजे 'गर्दीश', 'विरासत' आणि 'घातक'. यातले दोन चित्रपट प्रियदर्शनचे आहेत, गर्दीश आणि विरासत. प्रियदर्शनच्याच मुस्कुराहट आणि हलचल मध्येही त्यांचं काम उल्लेखनीय होतं. पण, गर्दीश, विरासत आणि घातक या तिन्ही चित्रपटातला इमोशनल बाप, पुन्हा कधी पडद्यावर दिसला नाही. तसे तिन्ही चित्रपट असंख्य वेळा पाहता येतील. पण काही सीन्स बाप-मुलाच्या नात्याला गडदपणे अधोरेखित करतात.

१. गर्दीशमध्ये शेवटच्या सीनमध्ये बिल्ला आपल्या मुलाला, शिवाला (जॅकी श्रॉफ) मारत असताना पाहणारा हतबल बाप अमरिश पुरीने कमालीचा रंगवला आहे.

हाच बिल्ला जेव्हा, शहराच्या मध्यवर्ती भागात भर चौकात बापाला मारत असतो तेव्हा शिवा बेभान होऊन त्याचा  सामना करतो आणि रागाच्या भरात त्याला जवळपास जिवानिशी मारतो. ज्यासाठी शिवाला बापाच्या द्वेषाला सामोरं जावं लागतं. पण यावेळी या घटनेने, आपल्याला मारताना पाहत असताना आपल्या मुलाला काय वाटले असणार, याची त्या बापाला जाणीव होते आणि तोच शेवटी त्या मुलाला बिल्लाला संपवायला सांगतो आणि त्यानंतर इन्स्पेक्टर न बनू शकलेल्या आपल्या मुलाला सॅल्युट ठोकतो, जे त्याचे स्वप्न असते.

२. विरासतमध्ये आपला मुलगा परदेशातून शिकून आलाय आणि तो आता आपल्यासोबत आपल्या मातीची सेवा करत राहणार, गावाचं भलं करणार, हा भ्रम पाळणाऱ्या बापाला जेव्हा तो आपल्याला सोडून परदेशात व्यवसाय करणार आहे हे कळल्यानंतर अस्वस्थ झालेला बाप अप्रतिम आहे. रागात आपल्या मुलाची कॉलर पकडणारा, पुन्हा भानावर येऊन ती सावरत नीट करणारा. आरडाओरड करून मुनीमला त्याच्या जाण्याच्या तिकिटांची व्यवस्था करायला सांगणारा, परत त्याला जवळ बोलावून '२० दिवस तरी थांब, किमान १५, दहा तरी?, मलाही वाटतं तुझ्यासोबत बसावं, गप्पा माराव्या' असं विनवणारा बाप डोळ्यात पाणी आणतो.

त्यानंतर, जड मनाने जायची परवानगी दिल्यानंतर, बाहेर पडणाऱ्या पावसामुळे चालताना शक्ती (अनिल कपूर)चा पाय घसरतो, तेव्हा आपल्या खुर्चीवरून उठत, 'सांभाळून चाल, बेटा' असं काळजीने म्हणतो. जे अनेकार्थाने आपल्यासमोर येतं.

३. घातकमध्ये असे अनेक सिन आहेत, संवाद आहेत, जे मनात कोरले गेले आहेत. कातीया अमरीश पुरीच्या गळ्यात पट्टा घालतो तो सीन पाहणे असह्य होतं. संवादात, 'एक अकेला काशी काफी है, मुझे कंधा देने के लिये' किंवा अपने गुस्से को पालना सिख, काशी' आजही आठवतात.

पण जो जास्त इमोशनल करतो तो म्हणजे, जेव्हा बापाकडे खूप कमी वेळ आहे याची जाणीव मुलाला होते, तेव्हा तो त्यांना परत गावी जाण्यासाठी तयार करत असतो. बापाला खरं तर दवाखान्यातच रहायचं असतं, पण आपल्या लोकांमध्ये रहायला मिळेल, बरं वाटेल, असं म्हणत तो त्यांना तयार करतो. गावी गेल्यावर काय काय करायचं, याची जेव्हा ते यादी वाचू लागतात, तेव्हा मात्र सनीला रडू अनावर होतं आणि आपली शेवटची घटिका आली याची त्या बापालाही जाणीव होते आणि तो 'मृत्यू एक सत्य आहे, जे आपल्याला, स्वीकारावं लागेल', हे काशीला सांगतो.

अनेक बाप येतील, जातील, पण हे तीन मात्र सदैव मनात घर करून राहतील, हे नक्की.

- राज जाधव (०२-०४-२०१९) 

Comments

Popular Posts