लैला मजनू, असीम प्रेमाची अनुभुती


प्रेम म्हणजे नक्की काय? एखाद्यावर जीवापाड प्रेम करणे किंवा वेड्यासारखे प्रेम करणे म्हणजे काय? ते एखाद्याला कसं पटवून देता येऊ शकतं? तुमचा वेडेपणा जस्टीफाय कसा करता येऊ शकतो? मुळात, प्रेमाची व्याख्या काय?

प्रेमात पडलेला माणूस हा, कानात हेडफोन घालून, आपल्याच मस्तीत गुंग असलेल्या माणसासारखा असतो, बाहेरच्या जगाशी पूर्णपणे डिस्कनेक्टेड. नाही म्हणायला फक्त त्याचं शरीर दिसत असतं बाहेरच्या जगाला आणि त्याच्या चित्रविचित्र हालचाली आणि हावभाव.

बाहेर काय चालू आहे याचे भान न ठेवता, मोठ्याने ओरडत एखादी धून गुणगुणत, कुठलेसे गाणे चिरक्या आवाजात म्हणत असताना, हेडफोनबाहेरचं जग त्याला वेडं म्हणत असलं तरी, तो कानावर पडणाऱ्या स्वर्गीय सुखाचा आनंद घेत असतो. उलटपक्षी, त्याच्यासाठी बाहेरचं जग निरुपयोगी असतं. कारण, तो काय चिरंतन अनुभव घेतो आहे, हे फक्त आणि फक्त त्यालाच ज्ञात असतं. आपण इतरांच्या नजरेतून कसे दिसतोय याची पर्वा तर सोडाच, हा विचारही त्याला सतावत नसतो. बाहेरून तो फकीर वाटत असला तरी आतून तो मस्त कलंदर बनून असीम आनंदाची अनुभूती घेत असतो, त्याच्यापुरतीच. त्या आनंदाची तुलना केवळ मजनूच्या प्रेमाशी होऊ शकते.

लैलाच्या प्रेमात आकंठ बुडालेला मजनू, जेव्हा लैलाच्या बापाला हतबलतेने सांगतो, "मी कितीही सांगायचा प्रयत्न केला तरी तुम्हाला कळणार नाही की आमच्या दोघांत काय नातं आहे, कदाचित मलाही ते सांगता येणार नाही", तेव्हा हे न कळणं देखील एक प्रकारे निर्वाज्य प्रेमाचीच ग्वाही देत असतं.

'देवदास'चे कालानुरूप बदललेले व्हर्जन्स (तिन्ही देवदास, ते अलीकडचे देव डी, दास देव आणि काहीसा अर्जुन रेड्डी) पाहिले असतील तर एक गोष्ट लक्षात येईल की सगळ्यांचा गाभा एकच आहे, तत्व एकच आहे. लैला मजनू हा चित्रपटही मूळ लैला मजनूच्या कथेचा आत्मा सांभाळत पुढे सरकतो. काश्मीरच्या पार्श्वभूमीवर घडणारी ही कथा सुरुवातीला टिपिकल प्रेम कथा, परिवारांची दुश्मनी, बाप की इज्जत वगैरे ठरलेले फॉर्म्युले दाखवते. अर्थात, चार्मिंग लैला (त्रिप्ती डिमरी) आणि ग्रेसफुल मजनूच्या (अविनाश तिवारी) अदाकारी, दमदार संवाद, इम्तियाज- साजिद अलीची पटकथा, इर्शाद कामीलचे कमाल शब्द आणि निलाद्री-जॉनच्या  संगीतामुळे पहिला भाग चांगलाच सुकर होतो. फर्स्ट हाफमध्ये चित्रपट नेहमीच्याच वाटेवर जातोय असे वाटत असताना, काही अश्या घटना घडतात, की कथा वेगळे वळण घेते आणि चित्रपट एका वेगळ्याच, थक्क करणाऱ्या उंचीवर संपतो. लैला मजनू या चित्रपटाची जादू, सेकंड हाफनंतर चित्रपटाचा बदलत जाणारा प्रवाह, कैसचं मजनू म्हणून झालेलं एक्ट्रीम ट्रान्सफॉर्मेशन आणि अखेरीस सुन्न करणारा क्लायमॅक्स यातच आहे. तो अनुभव घेण्यासाठी मात्र तुम्हाला चित्रपटाच्या प्रवासात सुरुवातीपासून सामील व्हावं लागतं.

लैला मजनू या केवळ व्यक्ती नाहीत, हा एक समाज आहे ज्यांना नियतीची साथ कधीच मिळाली नाही. मजनूचं नशीब तर त्याहून वाईट, प्रेमात सर्वस्व हरवून तो स्वतःपुरता देखील उरत नाही हा इतिहास आहे आणि कालांतराने त्याची पुनुरावृत्ती होतच राहणार. केवळ चेहरे, नावे आणि धर्म बदलतील पण लैलाच्या शोधात कित्येक मजनू स्वत्व हरवून भरकटत राहतील, हे अलिखित सत्य आहे. त्याहून महत्वाचे म्हणजे, याचा कुणावर काहीही परिणाम होणार नाही, कारण मजनूच्या वेडेपणाची तीव्रता समजून घ्यावी अशी कुणाचीही कुवत नाहीये.

मजनूने प्रेमाची अत्युच्च परिसीमा गाठली आहे, इतकी की सर्व परिस्थिती त्याच्या फेवरमध्ये असताना, नशिबाचे पारडे त्याच्या बाजूला झुकले असताना, शिवाय ज्या लैलाची तो आतुरतेने वाट पाहत असतो ती खुद्द त्याच्या समोर येऊन उभी ठाकली असताना, त्याला त्या मानवी सांगाड्याचे कसलेही अप्रूप वाटू नये? अर्थात, तो एकटा होता असे नाही, दोघे दुरावल्यापासून प्रत्येक वेळ त्याची कल्पना बनून ती त्याच्या सोबत होती. तिची वाट पाहत बसणाऱ्या त्याच्या कल्पनेने तिला त्याच्यापुरते अस्तित्वात आणले होते. पण, आता त्या कल्पनेचीच इतकी सवय झाली होती की त्याला
खऱ्या 'ती'ची गरज नव्हती. मुळात, कल्पना तरी कसे म्हणावे तिला हा प्रश्न आहेच, कारण ती त्याच्यासाठी वास्तवापेक्षाही अधिक सजीव होती.

एखाद्या व्यक्तीवर इतके प्रेम करावे की त्यासाठी खुद्द त्या व्यक्तीचीही गरज पडू नये? ही प्रेमाची कुठली पायरी म्हणायला हवी? हे अफाट आहे, आकलनाच्या पलीकडचे आहे. परंतु, हेच त्यांच्या नशिबाच्या कपाळावर कोरलेलं आहे आणि ते दोघेही त्याला बदलू शकत नाहीत, हे अगदी चित्रपटाच्या ओपनिंग क्रेडीट्सच्या वेळीच 'हमारी कहानी लिखी हुई हैं, और ये दुनिया क्या, दुनिया के लोग क्या, हम खुद भी उसे बदल नही सकते' म्हणत आपल्यावरही सुरुवातीपासूनच खोल बिंबवलं जातं.

या सर्वांचा सारांश एकच, 'लैला मजनू' एक कैफ आहे, नशा आहे, तलफ आहे कधीही न संपणारी, न मिटणारी. आवाक्याबाहेर असताना सोबत देणारी आणि बाहूपाशाच्या परिघात असूनही कवेत घ्यायची गरज न वाटणारी. अगदी नमाजाहूनही तल्लीन, खुदाच्या प्रार्थनेहूनही श्रेष्ठ, बेभान होऊन स्वतःचं अस्तित्व विसरायला लावणारी आणि हाफिज बनवणारी, तर्कशक्तीच्या सीमेबाहेरील एक तरल भावना, जी फक्त अनुभवता येते आणि ती निःसंकोचपणे अनुभवावी.

- राज जाधव (१६-११-२०१८)

Comments

Popular Posts