फाटक्या नशिबाला टाके घालणारा सुई-धागा


सुई धागा..!

ही कहाणी आहे एका स्वप्नाची, ध्येयाची, वेडाची, स्वतःसाठी वेळ न मिळू शकलेल्या आणि या स्वप्नाच्या प्रवासात अलगदपणे खुलत गेलेल्या एका दृढ नात्याची... आणि सर्वात महत्वाचे म्हणजे एका जोडीची.. सुई आणि धागा. शिवाय, हे एकत्र असतील तरच दोघांच्याही अस्तित्वाला अर्थ आहे, या सांकेतिक संदेशाचीही.

वरुण धवन आणि अनुष्का शर्मा या जोडीला ही उपमा दिली आहे, असे म्हटले तर वावगे वाटणार नाही. कारण टायटल सॉंगमध्ये एक खूप छान ओळ आहे जी या दोघांच्या नात्याला अधोरेखित करते.. 'सुई सीधी खडी, नाचे धागा'. ममताही नेमके हेच करते, मौजीच्या सोबत विश्वासाने खांद्याला खांदा लावून उभी राहते, त्याची मेंटर होते, प्रत्येक वेळी त्याला योग्य मार्ग सुचवून स्वतःच्या पायावर, आत्मविश्वासाने आणि सन्मानाने उभे रहायला मदत करते. तिच्या केवळ सोबत ठाम उभे राहण्याने मौजीला नवी उमेद आणि हिम्मत येते. चित्रपटाच्या नामावलीत अनुष्काचे नाव वरुणच्या आधी येते, इथपासूनच हा विचार अधोरेखित व्हायला सुरुवात होते, हे विशेष.

वरूण धवन, मौजी या व्यक्तिरेखेत इतका एकरूप झाला आहे की जुडवा वगैरे मध्ये नको नको ते चाळे करणारा, हाच इसम आहे का? असा प्रश्न पडावा. यूपीमधील भाषा, त्यातल्या उच्चारातल्या बारकाव्यांसकट त्याने नेमकी हेरली आहे. कपडे, राहणीमान आणि चेहऱ्यावरील आत्मविश्वास यामुळे तो वरुण न राहता पूर्णता मौजी होऊन जातो. 'सब बढीया हैं' म्हणत नोकरीच्या ठिकाणी रोज होणारा अपमान सहन करत, आयुष्यात येईल तो दिवस पुढे ढकलत जाण्याची हळूहळू त्याची मानसिकता झालेली असते. त्यातून त्याला बाहेर पडायला, स्वतःचा व्यवसाय सुरू करायला ममता भाग पाडते, त्याच्या इतकीच मेहनत तीही घेते. शतक मारणाऱ्या खेळाडू इतकाच महत्वाचा, त्याला स्ट्राईक देणारा, कसे खेळावे याचे मार्गदर्शन करणारा आणि मोलाची साथ देणारा दुसऱ्या बाजूला उभा असणारा, दोन अंकी धावसंख्या करणारा खेळाडू असतो. ममताही अशीच दुसऱ्या बाजूला खंबीरपणे उभी राहणारी पार्टनर वाटते. नोकरी सोडून, स्वतःचा व्यवसाय चालू केल्यानंतर येणारे छोटे मोठे अडथळे पार करत, घर-संसार, इतर गोतावळा सांभाळत, त्यांच्याशी झगडत, त्यांचा विरोध पत्करून आणि अंततः त्यांनाच साथ घेऊन तो हा प्रवास साध्य करतो. स्वप्नपूर्तीच्या मागच्या वेडेपणाचा प्रवास याच वर्षी आलेल्या 'पॅडमॅन' मध्येही दिसला. पण विषय सेन्सिटिव्ह असल्याने आणि त्याला इतर कुणाचीही साथ नसल्याने त्याची तीव्रता अधिक होती.

बदलापूर आणि ऑक्टोबरनंतर वरुण धवनचा अजून एक दमदार परफॉर्मन्स पहायला मिळतो. सोबत अनुष्काही या नव्या, कधीही न पाहिलेल्या पेहरावात जान आणते. रघुवीर यादव चिडखोर तरीही आतून नरम बापाच्या भूमिकेत चपखल वाटतो. इतर सहकालाकारांची कामेही उत्तम.

शरत कटारियाने 'दम लगा के हैशा' नंतर पुन्हा एकदा विजयी पताका फडकवला आहे. 'सुई धागा' आणि 'दम लगा के हैशा' या दोन्ही चित्रपटांची रूपरेषा साधारण समांतर वाटते. गावाकडचे वातावरण, घर, परिवारातील सदस्य, कथेची मांडणी वगैरे सगळं जसंच्या तसं वाटतं. यात हातखंडा असला तरीही, शरत कटारियाने टाईपकास्ट न होता, पुढचा चित्रपट आवर्जून वेगळ्या प्रकारच्या करावा. चित्रपट उत्तरार्धात थोडासा रेंगाळलेला वाटतो, पण तुम्ही त्यात गुंतलेले असताना लक्षात येत नाही.

वरूण ग्रोव्हर आणि अनु मलिक ही अन्यूजवल जोडी 'दम लगा के हैशा' नंतर इथेही कमाल करताना दिसते. लक्षपूर्वक ऐकले तर वरुण ग्रोव्हर साध्या शब्दात, विषयाला अनुसरून किती खोल काहीतरी लिहून जातो याची प्रचिती, प्रत्येक वेळा नव्याने येत राहते. अनु मलिकची ही सेकंड इनिंग कमाल आहे, त्याच्यातला इंटेन्स संगीतकार फार कमी वेळा बाहेर येतो आणि जेव्हा येतो तेव्हा तो दीर्घ काळ स्मरणात राहतो. दम लगा के, बेगम जान आणि आता सुई धागा यात त्याने त्याच्या शैलीपेक्षा वेगळे देण्याचा यशस्वी प्रयत्न केला आहे. शरत-अनु-वरुण या त्रयीचे 'मोह मोह के धागे' या जादुई गाण्याइतके कैफ आणणारे नसले तरी 'चाव लागा' विशेष आवडले. टायटल सॉंग आणि 'तू ही अहम'ही सुरेख जमलंय.

एकंदर, सुई धागा, ही एक खूप साधी कहानी आहे, पण साधारण मुळीच नाही. पूर्ण चित्रपटाच्या एकंदर प्रभावाबद्दल सांगायचे झाल्यास, सुई धागा ही एक राहुल द्रविडची खेळी वाटते. अगदी संयत. यात कुठेही तुफान फटकेबाजी नाही, तरीही मनोरंजन होते, संथ असली तरी रटाळ वाटत नाही, चौकार- षटकार नसले तरी सुरेख ड्राईव्हज पहायला मिळतात आणि सर्वात महत्वाचे म्हणजे शतकी खेळी नसली तरी डोळ्यांचे पारणे फेडणारा एक नेत्रदीपक सोहळा अनुभवून आपण बाहेर पडलेलो असतो.

- राज जाधव (०२-१०-२०१८)

Comments

Popular Posts