ए वतन.. ए वतन..


परमाणु आणि राझी हे दोन्ही सिनेमे पाहिले. अश्वत रैना (जॉन अब्राहम) आणि सेहमत (आलीया भट)च्या पात्रांमध्ये, अर्थातच एक सामायिक धागा आहे, देशभक्तीचा, आपल्या देशाच्या प्रती प्रेमाचा, आत्मीयतेचा आणि अभिमानाचा. दोघेही देशाच्या प्रेमापोटी स्वतःला झोकून देतात आणि आपापले काम पूर्ण करण्याच्या जिद्दीने जंग जंग पछाडतात.

अश्वत रैनाने देशासाठी पाहिलेल्या स्वप्नात सुरुवातीपासूनच अनेक अडथळे येतात. बऱ्याचदा त्याला कमी लेखलं जातं, त्याच्या अपरोक्ष त्याचा प्रोजेक्ट पुढे नेण्याचं कारस्थान केलं जातं, त्याच्या मेहनतीचे यश चाखण्याची तयारी करून बसले असताना आलेले अपयश मात्र याच्या माथी मारलं जातं, त्या प्रोजेक्टपासून त्याला नाईलाजाने दूर व्हावं लागतं. या सगळ्यात बायकोची साथ मिळते. पण आपण देशासाठी काही करू शकलो नाही, हे अपयश तो उराशी कवटाळून बसलेला असतो. सुदैवाने त्याला अजून एक मौका मिळतो, पण तो रस्ताही सहज पार करता येईल असा नसतो. त्यातही अनेकदा परिस्थिती त्याच्या विरोधात जाते. कधी नैसर्गिक, कधी वैयक्तिक तर कधी राजकीय घडामोडींमुळे त्याचे स्वप्न अर्धवट राहण्याच्या शक्यता निर्माण होतात. अश्यातच अखेरीस या सर्व अडथळ्यांवर मात करून, जेव्हा ते स्वप्न पूर्ण होते, तेव्हा पूर्ण सिनेमाभर वेळोवेळी दाटलेले अश्रू एक साथ ओघळतात आणि अश्वत मनसोक्त रडून घेतो. तो प्रसंग खूपच हळवा, कंविनसिंग आणि आवंढा दाटून यावा असा झालाय.

आपल्या पुढ्यात काय वाढून ठेवले आहे याची कल्पना नसलेली सेहमत, केवळ बापाच्या सांगण्यावरून, त्याच्या देशाच्या प्रती असणाऱ्या विश्वासावर विश्वास ठेऊन, पाकिस्तानात जासुस बनून जायला तयार होते. पण, देशासाठी हे काम करताना आपण किती लोकांच्या विश्वासाचा, माणुसकीचा, चांगुलपणाचा आणि प्रेमाचा, शिवाय गरज पडली तर खुद्द त्या माणसांचादेखील खून करणार आहोत, याच्या दाहकतेची तिला जाणीव नसावी. स्कुल फंक्शनमध्ये 'ए वतन' हे गाणे चालू असताना, ती ते भारताला समोर ठेऊन गुणगुणते, तेव्हा तिच्या भावना तिच्या नजरेत साफ दिसून येतात. त्याच डोळ्यात, नाईलाजाने काही पावले उचलावी लागल्यावर आलेलं अपराधीपणही दिसते. अश्या प्रसंगानंतर परिस्थितीपुढे हतबल झालेली जिवाच्या आकांताने रडणारी सेहमत आपल्याच समोर अनेक प्रश्न उभे करते.

तसं पाहिलं तर दोघांनी आपल्या देशासाठी आकाश-पाताळ एक केलं. दोघांनाही देशासाठी आपण काहीतरी करत असल्याचे समाधान आहे. अश्वतचं रडणं त्याच आंतरिक समाधानातून आलेलं आहे, जे इतके दिवस मनात साठून होतं ते उत्कटतेने बाहेर येतं.

याउलट सेहमतचं रडणं वेगळं आहे. ती तिच्या कामाने जेवढी देशाच्यासमोर स्वतःची मान उंचावत आहे, तेवढेच तिचे पाय नैतिक अपराधाच्या दलदलीत खोल फसत जात आहेत. तिचं दुःख जास्त आहे, ती भावनिक आहे, पण तशी असण्याची इथे तिला मुभा नाहीये. तिला देशाच्या भल्याच्या दृष्टीने काही कठोर निर्णय घेणे भाग आहे. तिच्या इच्छेच्या अपरोक्ष ती जे करते आहे, ते तिला आयुष्यभर सतत घाबरवत राहणार, हे नक्की.

- राज जाधव (१२-०६-२०१८)

Comments

Popular Posts