टेलिफोन धून में लिखनेवाला


जुरासिक पार्क में सुंदर से जोड़े जॅज़ म्यूज़िक गाए मिल के,
पिकासो की पैंटिंग मेरा पिछा पकड़ के टेक्सास में नाचे मिल के

काऊबाय देखें मुझे, प्लेबाय छेडे मुझे,
सेक्स मेरे तन में हो, मिक्स मेरे मन में हो,
पॉप म्यूज़िक जैसी लैला, स्ट्रॉबेरी जैसी आँखे
लवस्टोरी बन जाने दे, किक थोड़ी चढ जाने दे...

आहे त्या चालीत म्हटलं ना? नव्वदच्या दशकातील प्रत्येकाने असंख्य वेळा गुणगुणले असेल हे.

नव्वदचं दशक सुरू झालं आणि हिंदी चित्रपटसृष्टीला, 'रोजा' मार्फत मणीरत्नम आणि ए आर रहमान यांची ओळख झाली. रोजा चित्रपट म्हणून जितका उजवा होता तितकाच संगीतातही त्याचे अढळ स्थान आजही तितकेच कायम आहे. मूळ तामिळ असलेल्या या सिनेमाची हिंदीमधील गाणीदेखील आजही लोकप्रिय आहेत आणि याचे श्रेय जाते पी. के. मिश्रा या अवलीयाला. नव्वदीत, तामिळमधून हिंदीत डब केलेल्या मोस्टली सर्वच चित्रपटांची गाणी मिश्राने लिहिली आहेत.

'रोजा'च्या आधी त्याने मणीरत्नमच्याच 'दलपती'च्या हिंदी डब वर्जनची गाणी लिहिलेली, त्यांनतर त्याची 'रोजा'साठी वर्णी लागली. आजही 'दिल हैं छोटा सा, छोटीशी आशा', भारत हम को जान से प्यारा हैं', 'रोजा जानेमन', 'ये हसीन वादिया' ही गाणी क्लासिक म्हणून गणली जातात.

डब केलेल्या सिनेमात गाणी लिहायची म्हणजे तसे अवघड काम, पण मिश्राने ते लीलया पार पाडलं. मिश्राची खासियत म्हणजे कुठल्याही सेन्सिबल गीतकाराने बापजन्मात दिल्या नसतील किंवा विचारही केला नसेल, अश्या उपमा, असे शब्द तो वापरायचा.

वर नमूद केलेलं 'हमसे हैं मुकाबला' मधलं अतरंगी शब्द असलेले गाणेच पहा, त्यातलीच 'टेक ईट इजी उर्वशी', 'गोपाला गोपाला' आणि 'पट्टी रॅप' ही गाणी एका बाजूला आणि 'सून री सखी' हे तरल गाणं एका बाजूला. प्रभू देवा आणि नगमा यांचा अजून एक चित्रपट, 'लव बर्डस', त्यातील 'कम ऑन कम ऑन' आणि 'नो प्रॉब्लेम' गाणीही त्याचीच.

आमच्या ऐन टिनएजात, 'दुनिया दिलवालोंकी' मधील 'डोन्ट वरी मुस्तफा' आणि 'हॅलो डॉक्टर, दिलकी चोरी हो गयी' देखील फेमस झाले होते. हिंदुस्थानमधील 'टेलीफोन धून में' मला या दोन ओळींसाठी प्रचंड आवडतं. एक कवी म्हणून इमॅजिन केलं तर कसली भन्नाट कल्पना आहे ही - 'टेलीफोन धून में हसने वाली, मेलबोर्न मछली मचलने वाली'. हे गाणं एकदा ऐकाच, त्यात काय नाहीये? मेलबोर्न, मडोना पासून झाकीरचा तबला, सेलफोन, कॉम्प्युटर सगळं काही आहे. त्यातलंच 'लटका दिखा दिया तुमने' देखील तितकंच कॅची.

काही महिन्यांनी, या माणसाला जाऊन दहा वर्षे होतील. शोधूनही याचे साधे एक 'विकिपीडिया' पेज, एखादा फोटोसुद्धा सापडला नाही, वाईट वाटलं.

एव्हाना, हे वाचून बरेच जण नॉस्टॅलजीक झाले असतील किंवा काही जणांनी अश्या क्वालिटीलेस लिरिक्ससाठी भुवयाही उंचावल्या असतील. ज्याचा त्याचा प्रश्न. मला नव्वदच्या अनेक गोष्टी प्रचंड नॉस्टॅलजीक करतात, त्यातलीच ही एक, म्हणून मी त्यांचे कुठल्याही प्रकारचे मूल्यांकन करत बसत नाही. भावनांचे मूल्यांकन करूच नये.

मी सध्या, रोजा, हमसे हैं मुकाबला आणि हिंदुस्थानची गाणी लूपवर ऐकायला घेतोय. तुमचं तुम्ही बघा.

- राज जाधव (०९-०५-२०१८)

#nostalgic90s

Comments

Popular Posts