युवाची १४ वर्षे


वेगवेगळ्या विचारसरणींच्या तीन युवकांना मध्यवर्ती भूमिकेत घेऊन मणीरत्नमने बनवलेल्या 'युवा' या चित्रपटाला नुकतीच १४ वर्षे लोटली. तीन युवक वेगवेगळ्या परिस्थितीमुळे एकमेकांसमोर उभे ठाकतात आणि प्रत्येकाच्या निर्णयांमुळे एकमेकांच्या आयुष्यावर काही पडसाद उमटतात, याची कथा आहे 'युवा'.

चित्रपटाच्या सुरुवातीलाच हावडा ब्रिजचा एक सीन आहे, ज्यात महत्वाची तिन्ही पात्रे एकत्र दिसतात. टू व्हीलरवर असलेल्या मायकलचा पाठलाग करणारी एक कार, ड्राईव्ह करत करत मायकलवर नजर ठेवणारा डबलू, तर काम सोडून ससीच्या नावे खडे फोडणारा लल्लन. लिफ्ट दिलेल्या अर्जुनला ब्रिजवर मिराच्या टॅक्सीजवळ सोडून मायकल पुढे चालू लागतो. पुढच्या काही वेळात लल्लन त्याच्या बाईकला गाठून मायकलला गोळी मारतो आणि तो ब्रिजवरून खाली कोसळतो. पुढे याच सीनभोवती क्लायमॅक्सपूर्वीचा पूर्ण चित्रपट फिरत राहतो. सुरुवातीचा हा सीन पूर्ण चित्रपटाचा माहौल सेट करतो.

अजय देवगणचा 'मायकल' हा भ्रष्ट राजकारणाची पाळेमुळे उखडून, या व्यवस्थेत नवीन पिढीसाठी मार्ग बनवणारा एक स्टुडेंट लिडर आहे. त्यासाठी त्याला त्याच्या मित्रांचीही साथ आहे. गावोगावी जाऊन सभा भरवणे, त्यातून जनजागृती करणे हे त्याचे काम. या ध्येयापोटी त्याने परदेशातील स्कॉलरशीपलाही लाथाडले आहे. अश्यातूनच त्याने त्याच्या शत्रूंची संख्याही वाढवली आहे. त्यात आता अजून एकाची भर पडलीये, बेरकी राजकारणी बंडोपाध्याय म्हणजे ओम पुरी. बंडोपाध्यायने गोपालच्या (सोनू सूद) मदतीने त्याला संपवण्याची जबाबदारी सोपवली आहे लल्लनवर.

अभिषेक बच्चनचा 'लल्लन', बेफिकीर, बिनधास्त, वाया गेलेला, तापट डोक्याचा, प्रत्येक गोष्ट मारहाण केल्याने सुटते असे मानणारा. म्हणूनच कदाचित बायकोवरही हात उचलणारा, सासऱ्याने वॉचमनच्या नोकरीची शिफारस केल्यानंतर त्याच कंपनीत जाऊन खंडणी मागणारा, बायको ससीवर जेवढे प्रेम, तितकेच तो करत असलेल्या अनैतिक कामांवरही. दोन्हीपैकी कोणतीही गोष्ट सोडण्याची त्याची तयारी नाहीये. वर्चस्वाच्या या खेळात त्याने त्याच्या भावालाही सोडले नाही, अर्थात लल्लनने त्याला बाजूला केले नसते, तर बाजी उलटी होण्याची शक्यतादेखील होती. भावाला संपवून त्याने बंडोपाध्यायशी हात मिळवला आहे.

टिपिकल गुड-बॅड थियरीनुसार मायकल हा कथेचा नायक वाटत असला तरी, हा चित्रपट लल्लनच्या स्टोरीच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने जास्त इंटरेस्टिंग वाटतो. त्याची स्टोरी संपली तरीही, आपल्यापुरती ती शेवटपर्यंत चालूच राहते. अभिषेकने इतके जीव ओतून काम केले आहे की युवा म्हणजे लल्लन आणि लल्लन म्हणजे युवा, सदैव असेच समीकरण राहील.

विवेक ओबेरॉयचा 'अर्जुन', हाही एक बेफिकीर तरुण. करियरबद्दल कन्फ्युज्ड, वडिलांची इच्छा आयएएस होण्याची, त्याला स्वतःला जायचे असते अमेरिकेला, व्हिसा मिळविण्याची धडपड चालू असताना नेमक्या दोन घटना घडतात, ज्या त्याचे आयुष्य बदलून टाकतात, मीराशी (करीना कपूर) ओळख आणि लल्लनने जखमी केलेल्या आणि मरणाच्या दारात असलेल्या मायकलशी सामना. मिराशी नुकतीच झालेली ओळख, दोघांना एकमेकांबद्दलची ओढ, पण मिराचं लग्न एका कानपुरीयाशी ठरलेलं आणि याचीही ओढ अमेरिका. अखेर सर्व परिस्थिती जवळून अनुभवल्यानंतर, मायकल व इतर दोन साथीदारांसोबत अर्जुनही राजकारणात प्रवेश करण्याचा निर्णय घेतो.

नायिकांमध्ये चुलबुली इशा देओल छान वाटते आणि साध्यासुध्या वेशातली, मोकळ्या केसांमध्ये वावरणारी शुभ्र रंगाची करीनादेखील आवडून जाते, पण खऱ्या अर्थाने लक्षात राहते ती राणी मुखर्जीची ससी. घरच्यांचा विरोध सहन करून लल्लनसोबत जाणारी, त्याला वाईट कामांपासून परावृत्त करण्यासाठी जीवाचं रान करणारी, वेळोवेळी पदरी निराशा पडूनही प्रत्येक वेळी लल्लनवर विश्वास ठेवणारी, त्याला नवी संधी देणारी आणि पुन्हा हताश होणारी ससी उठून दिसते. सहाय्यक भूमिकेत मुरलेला राजकारणी ओम पुरी, धूर्त भावाच्या रूपातला सोनू सूद आणि ससीला दिलेल्या शब्दासाठी जीव देणारा विजय राज आपली चमक दाखवतात. कार्तिक कुमार आणि लेखक दिग्दर्शक आणि अनुरागचा भाऊ अभिनव कश्यपदेखील महत्वाच्या रोलमध्ये आपली छाप पाडतात.

युवामध्ये सर्वात जास्त भावलेली अजून एक गोष्ट म्हणजे मणीरत्नमची काहीशी 'रोशोमान' टाईप स्टोरीटेलिंगची पद्धत. तीन मध्यवर्ती पात्रांशी निगडित एकच स्टोरी तीन पात्रांच्या पॉईंट ऑफ व्ह्यू ने दाखवली गेली. अर्थात काही प्रसंग रिपीट होतात तर काही प्रसंगांचे अर्धवट राहिलेले दुवे दुसऱ्या स्टोरीत सापडतात आणि शेवटी एक पूर्ण कॅनव्हास आपल्यापुढे उभा राहतो.

अजून एक उल्लेखनीय गोष्ट म्हणजे हा चित्रपट एकाचवेळी हिंदी आणि तामिळमध्ये चित्रित करण्यात आला आणि एका दिवसाच्या फरकाने रिलीज झाला. अजय, अभिषेक, विवेक यांचे रोल्स तमिळमध्ये अनुक्रमे सुर्या, माधवन आणि सिद्धार्थ यांनी तितक्याच ताकदीने केले.

अनुराग कश्यपचे संवाद ही देखील एक जमेची बाजू आहे. मूळ इंग्रजीत लिहिलेली कथा आणि पटकथा अनुरागकडे सोपवत मणीरत्नम यांनी हिंदी वर्जनसाठी अनुरागला पूर्ण मोकळीक दिली होती, विशेषतः लल्लनच्या बिहारी भाषेचा लहेजा पकडण्यासाठी. लल्लन, गोपाल आणि त्यांच्या कंपूचे डायलॉग्स ऐकल्यास कश्यपने घेतलेली मेहनत दिसेल. तमिळ वर्जनचे संवाद सुजाथा यांनी लिहिलेले असून तो चेन्नईस्थीत असल्याने त्याचा फ्लेवर, कोलकत्ता बेस्ड युवापेक्षा थोडासा वेगळा होता.

उत्कृष्ठ छायाचित्रण हे मणीरत्नमच्या प्रत्येक सिनेमाची खासियत आहे. याचे श्रेय रवी के. चंद्रन यांना द्यायला हवे. लक्षपूर्वक पाहिले तर लक्षात येईल, इथेही तिन्ही कॅरेक्टरसाठी एक विशिष्ठ कलर स्कीम तयार केली आहे. माधवन/अभिषेकच्या राऊडी कॅरेक्टरला सूट होईल अशी रेड कलर थीम बॅकग्राउंडला दिसेल, तिच सिद्धार्थ/विवेकच्या कुल एटीट्युडला सूट होईल अशी ब्लु आहे, तर आयडीयलिस्ट लिडर सुर्या/अजयसाठी ग्रीन थीम आहे. शिवाय तिघांच्या कॅरेक्टरला अनुसरून कॅमेरा हँडलिंगही वेगवेगळ्या प्रकारचे होते. त्याच बरोबर कलकत्त्यातील डिटेलिंग करणारे आणि 'खुदा हाफीस' या गाण्यातले कॅमेरावर्क तर अफाट.

अखेरीस, ज्याचा 'युवा'त सिंहाचा वाटा आहे मोठा तो म्युझिक माएस्ट्रो ए. आर. रहमान. मणी आणि रहमान हे कॉम्बिनेशन असेल तर त्यावर वेगळे काही लिहायची आवश्यकताच नसते. मेहबूबचे बोल आणि रहमानचं संगीत, चित्रपटाला अजूनच समृद्ध करतात. प्रेयसीची हळवी आर्जव 'कभी निम निम' आणि समुद्रकिनाऱ्यावर रेंगाळणारं 'खुदा हाफीस' ही गाणी जास्त लोकप्रिय झाली तर 'धक्का लगा बुक्का', 'फना' आणि अदनान समीच्या आवाजातील 'बादल वो आये' ही देखील आजही ओठांवर रेंगाळतात.

मणीरत्नम, रोजा, बॉम्बे, दिल से मध्ये, दहशतवाद आणि दंगल यांच्या पार्श्वभूमीवर जितक्या उत्कटपणे हळव्या प्रेमकथा रेखाटतो, तितक्याच ताकदीने तो युवा आणि गुरूमध्ये नव्या पिढीची जिद्दी आणि चिकाटीची कहाणीसुद्धा दाखवतो. रिलीज झाला त्यावेळी बऱ्याच समीक्षकांनी 'युवा'ला नाकारले. मणीरत्नमचा तो चार्म गेला असल्याची वक्तव्येही केली, चित्रपट कमाईचा बाबतीतही तसा फ्लॉपच गणला गेला, पण असे काळाच्या पुढचे चित्रपट योग्य त्या वेळी तरंगून वर येतातच. म्हणूनच, सध्या युवाला कल्ट फॉलोविंग आहे.

भ्रष्टाचाराने सडलेल्या सिस्टीमला दोष देण्यापेक्षा किंवा 'हा देश कधीच सुधारू शकत नाही', हे सतत गिरवत बसण्यापेक्षा बदल घडवायला आपण स्वतःहून
पाऊले उचलली पाहिजेत, हा नारा 'रंग दे बसंती'च्या दोन वर्षे आधी, काहीश्या वेगळ्या प्रकारे 'युवा' ने दिला. देशाच्या राजकीय परिस्थितीला नावे ठेवण्याऐवजी स्वतः सक्रिय राजकारणात उतरून परिस्थिती बदलायची गरज आहे, याची जाणीव करून देण्याचे काम 'युवा'ने केले. जुने पायंडे मोडत, गालात चपराक बसल्यावर दुसरा गाल पुढे न करता, नवी पिढी धक्क्याला बुक्का द्यायला मागे पुढे पाहणार नाही, याची जाणीव आजच्या युवाला झाली तरी चित्रपटाचे सार्थक होईल, असे म्हणता येईल.

- राज जाधव (२२-०५-२०१८)

Comments

Popular Posts