सुलू कर सकती हैं


एखादी क्षुल्लकशी, तरीही नेहमीपेक्षा वेगळी गोष्ट अंगीकारायची असेल किंवा जिवापाड जपलेले एखादे स्वप्न साकार करण्याच्या दृष्टीने पहिले पाऊल टाकायचे असेल, तेव्हा सर्वात महत्वाचे काय असते? ती गोष्ट आपण करू शकतो, हा आत्मविश्वास आणि त्या आत्मविश्वासामागे असलेली आपल्या माणसांची साथ.

'सुलू', ही अशीच एक साधारण मध्यमवर्गीय गृहिणी आहे. आयुष्याकडून तिचे जास्त काही मागणे नाहीये. टिपिकल मिडलक्लास घरात आपल्या नवऱ्यासोबत आणि लहान मुलासोबत ती खुश आहे. छोट्या छोट्या गोष्टीत मोठा आनंद मिळविणे हा तिचा स्वभाव. लिंबू चमचा स्पर्धेतही ती उत्साहाने भाग घेते. जिंकणे तिच्यासाठी दुय्यम आहे, त्यापेक्षा त्या खेळाचा आनंद घेण्यात तिला अधिक रस आहे. ती दुसऱ्या क्रमांकावर येऊन, पुन्हा स्पर्धा संपल्यावर पहिल्या क्रमांकाच्या जागी उभे राहून फोटो काढून घेते, यातही तिच्या चेहऱ्यावरचा आनंद लपत नाही. या सर्वात तिला लाखमोलाची साथ आहे, तिच्या नवऱ्याची, अशोकची, ज्यामुळे ती कोणताही निर्णय खंबीरपणे घेऊ शकते आणि एके दिवशी ती तो घेतेही.

लहानपणापासूनच वडिलांच्या लाडक्या असलेल्या सुलुच्या बहिणी सध्याही चांगल्या प्रतिष्ठित जॉबमध्ये आहेत. त्यामुळे, ती लाडकी आणि कमवती नसल्याचे शल्य तिला कुठेतरी टोचत असते. अश्यातच तिला एका रेडिओ शो मध्ये एक प्रोग्राम करण्याची संधी मिळते. नाईट शो आणि कंटेंट काहीसा समाजमान्य नसल्याने, त्यासाठी तिला विरोध होणे स्वाभाविक होते, पण यात तिला किमान अशोकची साथ मिळते, हे सर्वात जास्त महत्वाचे (शो दरम्यान तिला नेहा धुपिया आणि विजय मौर्य यांची महत्वाची साथ मिळते. सरप्रायझिंगली, नेहा धुपियाने कमालीची मॅच्युअर आणि संयत मरिया मॅडम साकारली आहे).

घरच्यांचा विरोध असूनही सुलू शो करते. फक्त करतंच नाही तर, एक औपचारिकता न ठेवता ती कॉलर्सना प्रामाणिकपणे आणि इमोशनली हँडलदेखील करते. शो, अर्थातच हिट होतो, पण नवीन बॉसमुळे कामावर आलेला ताण, परिवारात आणि शेजारीपाजारी चाललेली कुजबुज, मुलाच्या शिक्षणाकडे झालेले दुर्लक्ष, या कारणांमुळे इथवर साथ देणारा अशोक काहीसा दुरावतो. आपल्या घराला आपली गरज आहे, या जबाबदारीचे भान ठेवत, सुलू स्वखुशीने तिचा निर्णय बदलण्याचे ठरवते आणि चित्रपट संपतो... सॉरी सुरू होतो. होय! खरा चित्रपट इथेच सुरू होतो.

चित्रपटातील सर्वात भिडणारी गोष्ट आहे त्याचा शेवट. अगदी कुठल्याही टिपिकल मिडलक्लास व्यक्तीच्या आयुष्यात होणारा शेवट, हा याहून वेगळा नसेल. तो पाहिल्यानंतर, हे माझंच तर आयुष्य आहे, असे कुठल्याही मध्यमवर्गीय व्यक्तीला वाटेल. आपण मोठी स्वप्ने पाहत असतो, दोन्ही हात पंख बनून उडण्यासाठी आतुर असतात, नजर आकाशात झेप घेत असते, पण पाय घर-परिवाराच्या, जबाबदाऱ्यांच्या, संसाराच्या ओझ्याखाली दबलेले असतात. त्यांना लाथाडून आपण उडू शकत नाही, म्हणून आपण मधला मार्ग शोधतो.

चित्रपटाच्या शेवटी सुलुही तेच करते, पण कुठल्याही प्रकारचा नाईलाज म्हणून नाही, तर पुन्हा त्याच आनंदात, त्याच आवेशात ती पुन्हा 'मैं कर सकती हैं, अशोक' म्हणून जिद्दीने उभी राहते. हेच सगळ्यात जास्त महत्वाचं असतं, नाही?

- राज जाधव (११-०४-२०१८)

Comments

Popular Posts