नात्यांच्या पाकात मुरलेला गुलाबजाम


राधा, ही आदित्यची कोण होती?

गुरू? मैत्रीण? प्रेयसी? बहीण? आई? तसं पाहिलं तर कुणीच नाही आणि विचार केला तर सर्व काही.

पण मुळात या नात्याला नाव द्यावेच का? आपला हाच प्रॉब्लेम आहे, प्रत्येक नात्याला लेबल लावायला आपल्याला खूप आवडतं. वय, लिंग, राहणीमान, धर्म, जात यांच्या अपरोक्ष एखादे निरपेक्ष नाते असू शकते ना? जे आपण स्वतःहून स्विकारले आहे, कुणीही लादले नाहीये असे. ज्या नात्यांचे आपसूक ऋणानुबंध तयार झालेत आणि जे कायम तसेच रहावेत, जपले जावेत असे दोघांनाही वाटतं. फार कमी लोकांच्या नशिबात ते येते. राधा आणि आदित्यच्या वाट्याला ते आले.

राधाचा भूतकाळ भयानक आहे, त्याचा परिणाम तिच्या सध्याच्या वागण्यावर दिसतोय. तिला कुणाशीच कसलाच संबंध ठेवायचा नाहीये, स्वतःला घरात कोंडून घेतलंय, बाहेर पडणे म्हणजे केवळ थिएटरला जाऊन रणबीरचा चित्रपट पाहणे, तेही तिथे एकांत आणि शांतता असते म्हणून, ठराविक व्यक्ती सोडल्या तर इतरांसाठी तिच्या घराचे आणि मनाचे दार कायम बंद आहे.

अशातच, घराच्या आणि मनाच्याही दारावर थाप येते ती आदित्यची. सुरुवातीला त्याच्या तोंडावर दार आपटणारी, त्याच्यावरही चिडचिड करणारी, त्याला स्वयंपाक शिकवायला नकार देणारी राधा हळूहळू त्याला मदत करायला तयार होते आणि हे बंध खुलत जातात.

स्वतःला घरात कोंडून घेतलेल्या राधाला आदित्य घराबाहेर घेऊन येतो, तिच्यातला हरवलेला आत्मविश्वास पुन्हा मिळवून देतो, तिला जगण्याची नवी उमेद देतो, जे तिच्यासाठी अनमोल आहे, त्याचे आभार तिने अनेकदा नजरेने मानले आहेत.

तो निघून जाणार म्हटल्यावर ती हळवी होते कारण राधाचे आदित्यसोबत एक अनामिक नाते तयार निर्माण झालेले असते, पण नात्याकडून कसलीही अपेक्षा ठेवायची नसते. त्यावर तुम्ही बंधने लादली की ती हरवतात. चित्रपट नेमका याच वळणावर येतो आणि संपतो, जे जास्त परिणामकारक आहे. आपापले आयुष्य आपापल्या मार्गाने पुढे नेत, काही महिने जगलेले ते नाते, दोघेही पुढे जपतात. हे जास्त सकारात्मक आहे, प्रेरणादायी आहे.

गुलाबजाम, इथेच जास्त मुरतो आणि अधिक गोड  होतो, म्हणूनच चित्रपट संपतो तरीही त्याची चव रेंगाळत राहते.

- राज जाधव (२५-०२-१८)

Comments

Popular Posts