दहशतवादाच्या गडद कॅनव्हासवर रेखाटलेले हळवे रंग


'मणीरत्नम', हा एक अफाट ताकदीचा चित्रकार आहे. सर्वात आधी तो काय करतो, तर एका कोऱ्या कागदावर हळुवारपणे हळवी चित्रे रेखाटायला सुरुवात करतो, निरागस नात्यांचे भावनिक रंग भरत. आपण त्यात एकरूप होऊ लागतो आणि मग त्यानंतर तो, त्याच्या बॅकग्राऊंडला डार्क थीमही रंगवायला लागतो. पण हे सगळं एकसलग चालू असतं, म्हणून त्याची भीषणता एका क्षणात जाणवत नाही. पुढे जाऊन जेव्हा निरागसता आणि दाहकता समोरासमोर येतात, तेव्हा लक्षात येतं की, किती अलगदपणे त्याने आपल्याला दोन्ही परिस्थितींच्यासमोर आणून उभे केले आहे.

हीच गोष्ट ठळकपणे आपल्याला त्याच्या रोजा, बॉम्बे आणि दिल से मध्ये दिसते. दहशतवाद्यांच्या तावडीत असलेल्या आपल्या नवऱ्यासाठी झगडणारी रोजा, बॉम्बेच्या दंगलीत होरपळणारा हिंदू-मुस्लिम परिवार आणि दिल से मधील प्रेम, आदर्शवाद, नैतिकता आणि दहशतवाद यात नेमके काय निवडावे या द्विधा मनस्थितीत अडकलेले जोडपे, यात हाच समान धागा पहायला मिळतो. मणीरत्नमच्या टेररीजम ट्रायोलॉजीमधल्या या तिन्ही कथा दहशतवाद / दंगलीच्या पार्श्वभूमीवर उभ्या राहतात, हळुवारपणे फुलतात आणि एका क्षणी गडद होत जातात. असे, दोन्ही बाजूंचे दोन वेगवेगळे पैलू मणीरत्नम आपल्यापुढे संयतपणे उलगडून ठेवतो. या तिन्ही सिनेमांवर कधीतरी स्वतंत्र लिहिणार आहे, कारण आजचा विषय वेगळा आहे. टेररीजमच्या बॅकड्रॉपवर हळुवार फुलत जाणारी कथा, हीच बेसिक थीम घेऊन आलेला मणीरत्नमचा मास्टरपीस, Kannathil Muthamittal (A Peck on the Cheek).

श्रीलंकन सिव्हिल वॉरच्या पार्श्वभूमीवर कथा सुरू होते. श्रीलंकेतील तमिळ भाषिकांसाठी लढणाऱ्या 'तमिळ टायगर्स' साठी स्वतःला वाहून घेतलेल्या श्यामा (नंदिता दास) आणि दिलीपन (जे. डी. चक्रवर्ती) यांचे लग्न झाले आहे. एक प्रसंगात श्रीलंकन आर्मीचा हल्ला होतो तेव्हा दिलीपन, श्यामाला मागे ठेऊन निघून जातो, नेमके याच वेळी श्यामा एक रेफ्युजी कॅम्पमध्ये, भारतात रामेश्वरममध्ये एका मुलीला जन्म देते आणि नाईलाजाने, मुलीला सोडून, नवऱ्याच्या काळजीपोटी श्रीलंकेत परतते.

'अमूधा' (पी. एस. किर्तना), आता नऊ वर्षाची झाली आहे. इंजिनियर आणि लेखक तिरुचेलवन (आर. माधवन) आणि इंदिरा (सिमरन) यांनी मिळून तिला दत्तक घेतलेले आहे. ठरल्याप्रमाणे, तिरु आणि इंदिरा, अमूधाच्या नवव्या वाढदिवसाला, ती त्यांची खरी मुलगी नसल्याचे सांगतात. तिच्यासाठी हा धक्का, या कोवळ्या वयात मोठाच असतो, ती हळूहळू या दोघांपासून आणि तिरु-इंदिराच्या खऱ्या मुलांपासून दुरावते. हे दुरावणेही अगदी तिच्या वयाच्या मानसिक अवस्थेला शोभेल, असंच आहे, म्हणून जास्त भावते. शिवाय एक दोनदा आपल्या खऱ्या आईच्या शोधात घरातून निघून जाण्याचाही प्रयत्न करते. अखेरीस तिरु आणि इंदिरा तिला तिच्या आईला भेटवण्याचे ठरवतात आणि तिच्यासहीत श्रीलंकेला येतात आणि तिच्या आईचा शोध घेतात.

चित्रपटाचा शेवट हा जरा जास्तच मेलोड्रामॅटिक वाटत असला, तरी एकंदर विचार करता जस्टीफायही होतो. काहींना चित्रपट लांबलेला, कंटाळवाणाही वाटू शकेल. अजून एक खटकणारी गोष्ट म्हणजे, 'तिरु आणि इंदिराने अमूधाला ही गोष्ट सांगायची गरजच काय होती?' हा प्रश्न पडू शकतो. हाच आक्षेप इंदिराच्या वडिलांनीही नोंदवलेला असतो. पण, सारासार विचार करता एक गोष्ट लक्षात येते की तिरु एक लेखक आहे, शिवाय पुढारलेल्या विचारांचा माणूसदेखील आहे. अमूधाला दत्तक घेता यावं म्हणून तो इंदिराशी, तिला याची कल्पना देऊन लग्न करतो, लेखन करतानाही तो 'इंदिरा', हे टोपणनाव लावतो, मग अमूधाला ही गोष्ट जाणून घ्यायचा हक्क आहे, असे त्याला वाटणे साहजिक नाही का?

चित्रपट, खास मणीरत्नम शैलीतला असल्याने, सामान्य कथानक असूनही, विशेष छाप पाडतो. अमूधा, ही चित्रपटाचा आत्मा आहे. सुरुवातीची चुलबुली अमूधा ते सत्य समजल्यानंतर अस्वस्थ झालेली, खऱ्या आईच्या भेटीसाठी आतुर झालेली  अमूधा हा प्रवास त्या इवल्याश्या जिवाने खूप नैसर्गिकपणे दाखवलाय. आर. माधवनचा मॅच्युअर परफॉर्मन्स, सिमरनची तोलामोलाची साथ आणि प्रकाश राजचे महत्वाचे पात्र असूनही, अमूधा हे चित्रपटाचे मध्यवर्ती पात्र म्हणून रिप्रेजेंट करणाऱ्या मणीरत्नमचे विशेष कौतुक. बॅकफुटवर राहून काम करणे, अंडरप्ले करणे हे खरेतर त्या पात्राची उंची अधिकच वाढवते, हेच या तिघांच्या पात्रांवरून अधोरेखीत होते. नंदिता दास आणि जे. डी. चक्रवर्ती यांचे छोटेसे रोलही उल्लेखनीय. मणीरत्नमचा सिनेमा आणि रहमानचं संगीत हे एकमेकांना नेहमीच कॉम्प्लिमेंट करत राहतात, इथेही रहमान आपल्याला निराश करत नाही. रवी के. चंद्रन यांची सिनेमॅटोग्राफी ही देखील जमेची बाजू, श्रीलंकेतील नयनरम्य सौंदर्य, सागरकिनारे अजूनच खुलून दिसतात.

साध्याश्याच कथेला खास मणीरत्नम टच, सोबत रहमानी संगीत, नयनरम्य फ्रेम्स, साजेशी सिनेमॅटोग्राफी, अमूधाचा निव्वळ नैसर्गिक आणि प्रामाणिक अभिनय आणि इतर कलाकारांची सुरेख साथ, यासाठी हा सिनेमा एकदा तरी पहावा.

- राज जाधव (२२-०२-२०१८)

Comments

Popular Posts