सलमान हबीब आणि नैतिकतेच्या व्याख्या


'ती' रोज रात्री उशिरा घरी येते, कधीकधी रात्रपाळीला जाते, शिवाय मुलांसोबत बिनधास्त वावरते, ती चारित्र्यहीन असावी. तो रोज नवनवीन मुलींसोबत फिरतो, त्याच्यावर चांगले संस्कार नसावेत, किंवा, आई वडिलांना किती छान सांभाळतो तो, सभ्यही दिसतोय, चांगलाच असेल.

आपण प्रत्येक गोष्ट दोनच तराजूत तोलू पाहतो, चांगली आणि वाईट. त्याला तिसरी बाजू असू शकेल हे आपल्या मिडलक्लास मानसिकतेला मान्यच नसते. शिवाय, आधार लिंक करावं तसं, आपण चांगल्या-वाईटच्या परिसीमा ठरवायला, नैतिकतेची ठिगळं त्याला जोडू पाहतो. कोणतीही व्यक्ती कशी वागते किंवा काय डिसीजन घेते, हे ती कोणत्या परिस्थितीत घेते, त्यावेळच्या प्रायोरिटीज काय होत्या, यावर अनेकदा अवलंबून असते.

तसंच, कोणताही टिपिकल मिडलक्लास (मी स्वतःलाही यात धरलंय) मानसिकतेचा माणूस, 'जिंदगी मिलेगी ना दोबारा' पाहताना, सलमान हबीबला (नसिरुद्दीन शाह), अश्याच कारणांसाठी नैतिकतेच्या पिंजऱ्यात उभा करतो; लग्न, घर, बायको-मुलगा यांवर त्याने आर्टिस्ट बनण्याच्या स्वप्नाला निवडलं, म्हणून.

इम्रान (फरहान अख्तर) त्याला स्पेनमध्ये भेटतो आणि खरं बोलण्याचं आव्हान देतो, तेव्हाचा सलमानचा प्रत्येक संवाद अगदी प्रॅक्टिकल आणि टू दि पॉईंट आहे. सगळ्यात जास्त जो मनावर ठसतो, तो म्हणजे-

"सच होता क्या हैं? हर एक का अपना अपना वर्जन होता हैं सच का.."

खरेच, काय चुकीचे आहे यात? प्रत्येकाची खरेपणाची व्याख्या वेगवेगळी असते, ती आपण इतरांवर लादू शकत नाही. अर्थात यात सलमान हबीबच्या वागण्याचं समर्थन करण्याचा हेतू अजिबात नाहीये. हे करायला जी हिम्मत त्याने दाखवली ती आपल्याला कधीच दाखवता येत नाही.

हे इतकं खरंखुरं आपल्याला कधी जगताच येत नाही, म्हणूनच आपण आपल्या संकल्पनांवर इतरांची नैतिकता ठरवून त्यांना लेबल लावण्यात मग्न असतो. पण अश्या वेळी एक गोष्ट आपण विसरतो की, तो सर्व बंधने झुगारून त्याची स्वप्ने पूर्ण करत आहे आणि आपण अजूनही मिडलक्लास चौकटीत अडकून बसलो आहे.

- राज जाधव (११-०२-२०१८)

Comments

Popular Posts