रिक्रिएटिंग मायथोलॉजीज लॉजीकली इन फिल्म्स


इंस्पायर्ड होणे ही चित्रपटनिर्मितीतली एक परंपरा आहे, अविभाज्य भाग आहे. पण हे इन्स्पीरेशनच रहावं आणि 'कॉपीड फ्रॉम' वर्जन बनू नये, हे ज्या त्या फिल्ममेकरचं स्किल.

हॉलिवूडमधले सिनेमे उचलून हिंदीत सर्रास सिनेमे बनवले जातात, हे अगदी सर्वश्रुत आहे. यात काही फ्रेम टू फ्रेम कॉपीड असतात तर काही केवळ त्यातली थीम घेऊन, त्याचं इथल्या ऑडियन्सला सूट होईल असं इंडियनाईज्ड वर्जन करतात, जे जास्त योग्य आहे.

याच प्रकारे, भारतीय पौराणिक कथांमधील संदर्भ घेऊन काही चित्रपट बनविण्यात आले, त्याबद्दल थोडेसे.

१९९१ मध्ये आलेल्या मनीरत्नम दिग्दर्शित 'थलपथी' वर (जो हिंदीत दलपती म्हणून डब झालेला), महाभारतातील कर्णाच्या पात्राचा प्रभाव जाणवतो. लहानपणी नाईलाजाने आपल्या अनौरस पुत्राला एक माता एक घराच्या समोर ठेऊन निघून जाते आणि पुढे नशिब त्यांना समोरासमोर उभे करते. कर्णाच्या मध्यवर्ती भूमिकेत सुपरस्टार रजनीकांत, त्याला दुर्योधनासारखी साथ देणारा जिवाभावाचा मित्र आणि साथीदार मामुटी आणि अर्जुनसारखा सावत्र भाऊ अरविंद स्वामी. चित्रपट रेटिंगच्या बाबतीत ओव्हररेटेड असला तरी, अभिनेता रजनीकांत (सुपरस्टार नव्हे) काय करू शकतो, हे पहायचे असेल तर हा चित्रपट नक्की पहा.

पुढे १९९९ मध्ये, राजश्री प्रोडक्शनने रामायणमधील, राम-लक्ष्मण-भरत आणि कैकेयीचा प्लॉट पकडून 'हम साथ साथ हैं' नव्या स्पेशल बडजात्या ढंगात, फॅमिली पॅकसोबत सादर केला. स्पेशल बडजात्या टच असल्याने आणि सुरज बडजात्या त्यावेळी बऱ्यापैकी ट्रॅकवर असल्यामुळे हा चित्रपटही चालला.

प्रकाश झानेही 'राजनीती' मध्ये काही अंशी महाभारतमधली कर्णाची कहाणी, राजकीय पार्श्वभूमीवर सोनिया गांधी अँगल देत, नव्या रुपात रिक्रियेट केली. अजय देवगणचं मध्यवर्ती पात्र कर्णच्या जागी ठेऊन पाहिलं, तर याची खात्री पटेल.

महाभारतानंतर मनीरत्नमने, रामायणातील सर्वात महत्वाचा, सीताहरन प्लॉट त्याच्या 'रावण' या चित्रपटात स्वतःच्या खास मनीरत्नमी शैलीत, विक्रम, ऐश्वर्या आणि अभिषेकला, अनुक्रमे राम, सीता आणि रावणाच्या भूमिकेत घेऊन दाखवला. अर्थात तो पडद्यावर काही विशेष कमाल करू शकला नाही, पण रत्नम फॅन्सच्या लिस्टमध्ये रुजू झाला.

पण या सर्व चित्रपटात जो सर्वात जास्त प्रभावी वाटला, तो या वर्षीचा 'विक्रम वेधा'.

राजा विक्रमादित्य आणि वेताळाची कथा आपण लहानपणापासून ऐकत आलोय, त्याचेच हे २०१७ मधले क्राईम बेस्ड वर्जन, असे म्हटले तर चुकीचे ठरणार नाही. विक्रम नावाचा पोलीस ऑफिसर आणि वेधा नावाचा डॉन, या दोघांच्यामधील चांगल्या आणि वाईट प्रवृत्तीचा संघर्ष म्हणजे, विक्रम वेधा. हा चित्रपट, गुड आणि एव्हील या बाबतीतली तुमची सर्व गृहीतके हाणून तर पाडतोच पण त्याचा सुवर्णमध्य काढत, एका वेगळ्याच उंचीवर संपतो आणि हीच याची खासियत आहे.

स्वतंत्रपणे पाहता वरचे सर्व चित्रपट नक्कीच चांगले आहेत, पण विक्रम वेधामधली ट्रीटमेंट वेगळी आहे आणि यामुळेच तो वेगळा उठून दिसतो, अर्थात तो थ्रिलर असल्याने असे वाटणे साहजिक आहे. तरीही असे प्रयोगशील चित्रपट हिंदीतही व्हावे, अश्या कल्पना हिंदीतही याव्यात ही अपेक्षा.

अर्थात उद्या कुणीही उठून याचा हिंदीत रिमेक करेल यात शंकाच नाही, पण यात तुमचं असं कर्तृत्व किती? हा प्रश्नही त्याच्यासोबत येईलच. शिवाय हा मूळ चित्रपट मेंदूतून कधीच पुसला जाणार नाही, हेही तितकेच नक्की.

कम विथ आयडीयाज, नॉट रिमेक्स..!

© राज जाधव (१५-०१-२०१८)

Comments

Popular Posts