शशी - एक सेन्सिबल कपूर


१९५० च्या आसपास राज कपूरच्या 'आग' आणि 'आवारा' मध्ये लहान राज कपूरच्या भूमिकेत शशी कपूर प्रथम पडद्यावर दिसला आणि त्यानंतर इतर चित्रपटातही चमकू लागला. १९६० च्या दशकात धरमपुत्र, वक्त, जब जब फुल खिले, प्यार किये जा, कन्यादान, हसीना मान जायेगी, एक श्रीमान एक श्रीमती, प्यार का मौसम असे चित्रपट देत त्याने स्वतःचं अस्तित्व पटवून दिले.

१९७० च्या दशकात, विशेषतः ६९ ते ७३ च्या दरम्यान जिथे हिंदी फिल्म इंडस्ट्री अल्पकाळी सुपरस्टार राजेश खन्नाला डोक्यावर घेऊन नाचण्यात दंग होती शिवाय ७३-७४ च्या आसपास एका असामान्य आणि खऱ्याखुऱ्या सुपरस्टार 'अमिताभ बच्चन' चा उदय झाला होता, त्यावेळेस आणि नंतरही शशी कपूर अभिनेत्री, शर्मीली, वेगळ्या धाटणीचा सिद्धार्थ, चोर मचाये शोर वगैरे मधून तग धरून होता. अर्थात सुपरस्टार ही पदवी त्याच्यासाठी नव्हती, त्याला त्याची गरजही नव्हती.

१९७५ च्या 'दिवार' मध्येही तो अमिताभच्या समोर  तेवढ्याच ताकदीने उभा राहिला. अमिताभचा रोल कितीही स्टाईलबाज असला, एकाहून एक डायलॉग्स त्याच्या फेवरमध्ये असले तरी 'मेरे पास मां हैं' हा त्याच्या आवाजातील कल्ट डायलॉग आजही अजरामर आहे. पुढे ही जोडी कभी कभी, त्रिशूल, दो और डॉ पांच, काला पत्थर, सुहाग, शान, सिलसिला, नमकहलाल मध्ये ही दिसली, आवडली गेली.

१९८० च्या दशकात शशी कपूर सहाय्यक आणि चरित्र अभिनेता म्हणून दिसू लागला. निर्देशक म्हणून 'अजूबा'मध्ये जास्त काही चमक दाखवता आली नसली तरी निर्माता म्हणून उत्सव, जुनुन, कलयुग, विजेता, ३६ चौरंगी लेन अशी वेगळी वाट खूपच चोखंदळपणे जोपासली, तीही काळाच्या पुढे राहून. १९८६ मध्ये आलेल्या न्यू दिल्ली टाईम्समध्ये पुन्हा एकदा त्याने तो काय ताकदीचा अभिनेता आहे हे दाखवून दिले आणि अभिनयाचा राष्ट्रीय पुरस्कारावर आपले नाव नोंदवले.

राज कपूर मला पर्सनली आवडलेला नाही, तो नक्कीच ग्रेट असेल, यात शंकाच नाही. शिवाय शम्मीची अदाच वेगळी आहे, जे त्याने केले त्यासाठी त्याला फुल मार्क्स, त्यातल्या युनिक डान्सिंग स्टाईलसाठीही, पण जिथे अभिनयाबद्दल बोलायचं असेल तिथे या सर्वांत शशी कपूर बाजी मारतो.

कपूर घराण्याचे नाव पाठीशी लावूनही स्वतःच्या क्षमतेच्या जोरावर इंडस्ट्रीत टिकून राहिलेला, कपूर घराण्यातील दुसऱ्या फळीतील सर्वात सेन्सिबल अभिनेता, म्हणून शशी कपूर कायम स्मरणात राहील.

या महान अभिनेत्यांच्या आत्म्यास शांती मिळो, ही ईश्वरचरणी प्रार्थना!

© राज जाधव (४.१२.२०१७)

Comments

Popular Posts