ओप्पम - एक उत्कंठावर्धक सायको थ्रिलर


प्रियदर्शन हा दिग्दर्शनातील हिरा आहे, पडद्यावर इमोशन्स खूप चांगल्या आणि परिणामकारकपणे दाखवणाऱ्या दिग्दर्शकांपैकी एक.

हिंदीत येण्यापूर्वी खूप आधीपासून तो मल्याळम सिनेमांत एकाहून एक सरस सिनेमे देत आलाय. मल्याळम सिनेमातील अजरामर फिल्म्स हिंदीत रिमेक करण्याचे कसब त्याच्या अंगी आहे. यातले काही सिनेमे त्याचे स्वतःचे तर काही इतर दिग्दर्शकाचे आहेत. रिमेक करणे म्हणजे सगळं काही तयार असणार आणि काही विशेष करायची गरज नाही असे वाटत असले, तरी इथे खरा कस लागतो. मोस्टली मल्याळम भाषा ध्यानात घेऊन लिहिलेली एखादी कहाणी आणि केरळमधील रिजनल रेफरेन्सेस, महाराष्ट्र, मुंबई किंवा अन्य उत्तर भारतीय ठिकाणाच्या दृष्टीने कसे येतील, हे डोळ्यासमोर ठेऊन बदलायचे, तेही त्याच्यातला इसेन्स कायम ठेवत, हे फार कमी लोकांना जमतं. प्रियदर्शन हा त्यातलाच एक.

जसा प्रियदर्शन हा दिग्दर्शनातील, तसा मोहनलाल हा अभिनयातील हिरा आहे. मोहनलाल हा एकमेव अभिनेता असावा ज्याचे सर्वाधिक सिनेमे दुसऱ्या भाषेत रिमेड केले गेले असतील. आकडा, तोंडात बोट घालावं इतका फॅसिनेटिंग आहे. आजवर प्रदर्शित झालेल्यांपैकी जवळपास ६० चित्रपटांचे विविध भाषेत रिमेक आले आहेत (२० तमिळ, १६ तेलगू, १३ हिंदी, ९ कन्नड आणि २ बंगाली). शिवाय, यातील सर्वाधिक चित्रपट प्रियदर्शनसोबत आहेत. प्रियन-मोहनलाल ही मल्याळम सिनेमातील एक सुपरहिट जोडी आहे. या जोडीच्या सुपरहिट सिनेमांवर आधारित या हिंदी मूवीजची लिस्ट पहा, हंगामा, ये तेरा घर ये मेरा घर, क्यो की, गर्दीश, मुस्कुराहट, भूलभुलैया (सेकंड युनिट डायरेक्टर), सात रंग के सपने, खट्टामिठा आणि कदाचित आला तर 'ओप्पम'चा रिमेक.

प्रियनचा नसला तरी २०१३ मध्ये आलेल्या दृश्यममुळे एक वेगळाच थ्रिलर पहायला मिळाला, तो हिंदीत अजय देवगनने तर तमिळमध्ये कमल हसनने (पापनासम) तेवढ्याच इंटेनसिटीने साकारला असला तरी मूळ चित्रपट स्टॅन्डस आऊट. तोच प्रकार 'मनीचित्रतलू' या १९९३ मध्ये आलेल्या ऑल टाईम क्लासिक चित्रपटाबद्दलही म्हणता येईल. यात प्रियनने सेकंड युनिट डायरेक्टर म्हणून काम पाहिले होते. तमिळ, तेलुगुतला चंद्रमुखी, हिंदीतला भुलभुलैया, कन्नडमधील 'आप्तमित्रा' आणि बंगालीमधील 'राजमोहल' त्यावर बेतलेला होता. तरीही कोणत्याच चित्रपटाला मूळ चित्रपटाची सर येणार नाही.

ही जोडी पुन्हा एकदा एकत्र आली ती २०१६ च्या 'ओप्पम' या सायकोलॉजिकल थ्रिलरमध्ये. 'ओप्पम' कथा आहे जयरामन (मोहनलाल) नामक एका अंध व्यक्तीची, जो एका बिल्डिंगमध्ये लिफ्ट ऑपरेटर म्हणून काम करतो. अंध असल्याने पाहू शकत नसला तरी त्याची बाकीची इंद्रिये सजग आहेत. आपल्या आजूबाजूला चालणाऱ्या हालचालींवर त्याची बारीक नजर असते. गळाला लागलेला मासा कोणत्या प्रजातीचा आहे हे त्याच्या हालचालींवरून ओळखणे, कापुराचा गंध आल्याने भटजींना ओळखणे, पायाच्या आवाजावरून व्यक्ती किती दूर गेली अथवा उभी आहे हे ओळखणे, वजन आणि उंचीचा अंदाज बांधणे आणि अजूनही कित्येक बारकावे टिपण्याचा सिक्सथ सेन्स त्याच्याकडे असतो (हे वाचताना जरा अशक्य वाटत असले तरी मोहनलाल तो कंविन्सिंगली करतो).

अशात त्याच्या बिल्डिंगमध्ये एक खून होतो आणि  आजूबाजूच्या घडणाऱ्या परिस्थितींमुळे त्याच्यावर खुनाचा आरोप येतो. या खुनामागे असलेल्या आरोपीचा शोध लावणे, स्वतःला निर्दोष सिद्ध करणे आणि नियतीने त्याच्या आयुष्यात आणलेल्या एका लहान मुलीला त्या सायको खुन्यापासून वाचवणे ही कामगिरी, जयरामन त्याच्या असामान्य सिक्सथ सेन्सने पार पाडतो.

चित्रपट आणि खुनामागची पार्श्वभूमी सेट व्हायला बराच वेळ लागतो. पण त्यानंतर चित्रपट पकड घेतो आणि श्वास रोखून आपण त्याचा भाग होऊन जातो. उत्कंठावर्धक क्लायमॅक्स हा तर चित्रपटाचा पीक पॉईंट आहे. काही गाणी चित्रपटाचा स्पीड स्लो करतात, टाळता अली असती तर एक जबरदस्त कॉम्पॅक्ट थ्रिलर झाला असता. मोहनलाल हा खरोखर महान अभिनेता आहे त्याने कामही अफलातून केलं आहे, पण वय लपत नाही. आंधळ्या माणसाच्या चेहऱ्यावरील बारकावे त्याने कितीही चांगल्या प्रकारे दर्शवले असतील तरी त्यासोबत चेहरयावरचा थकवाही जाणवतो, त्याकडे दुर्लक्ष करावे लागते. लहान मुलीचा रोल कमी लांबीचा आहे पण महत्वाचा आहे. या दोघांशिवाय सायको किलर आणि इन्स्पेक्टर ही दोन पात्रे लक्षात राहतात.

कॉमेडीमध्ये अडकून पडलेल्या प्रियदर्शनने आता हिंदी सिनेमात कात टाकायची गरज आहे. जुना मुस्कुराहट, गर्दीश, विरासत वाला प्रियदर्शन पुन्हा यायला हवा आहे. मल्याळममध्ये कांचीवरम जितका इंटेन्स आणि वर्थ होता तितकाच ओप्पमही आहे. मोहनलाल अभिनेता म्हणून चालून जातो पण वयोमानाने जरा खटकतो. हा एक भाग सोडला आणि थोडा स्लो स्टार्ट, कॅरॅक्टर्स आणि स्टोरी सेट व्हायला लागणारा थोडा वेळ, गाण्यांचा अनावश्यक अडथळा जरासा सहन केला तर ओप्पम एक चांगला सायकोलॉजिकल थ्रिलर आहे.

© राज जाधव (१-११-२०१७)

Comments

Popular Posts