सिक्रेट सुपरस्टार- एका बेसिक स्वप्नाची गोष्ट


ध्येयासाठी पछाडलेल्या व्यक्तींबद्दल मला नेहमीच अतोनात आदर आहे, ऑनस्क्रीन आणि ऑफस्क्रीनही. मग क्षेत्र कोणतंही असलं तरी फरक पडत नाही, कारण मला, ज्या मागे, ज्या साठी तो धावतोय, ते स्वप्न माझ्या अभिव्यक्तीशी रिलेट होतं, याचंच अप्रूप अधिक असतं.

सिक्रेट सुपरस्टार ही अशीच एक साधी सरळ कथा आहे, एका स्वप्नवेड्या मुलीची, इंसियाची, जी सिंगर बनण्याच्या ध्येयाने पछाडली आहे. ज्यात तिच्या आईची पराकोटीची साथ आहे तर बापाचा कमालीचा विरोध. हा विरोध केवळ गाण्याबाबत नाही तर एकंदर स्त्रीजातीबद्दल आहे. मुलीने शिकावं, तेही केवळ मुलगा शोधण्यात काही अडचण येऊ नये इतपतच (जी त्याला स्वतःला आली), ही विचारसरणी. त्याउपर तिचं वेगळं काही अस्तित्व, स्वतःची काही स्वप्ने असू नयेत. अश्यातच नाईलाजाने ती एक वेगळा मार्ग अवलंबून, स्वतःची ओळख लपवून प्रसिद्ध होते आणि नाट्यमयरित्या जगासमोर सुपरस्टार म्हणून उदयास येते. यात तिला मोलाची मदत होते ती सर्वप्रथम तिच्या अम्मीची, नंतर तिचा क्लासमेट चिंतन आणि एके काळी गाजलेल्या आणि सध्या इंडस्ट्रीने नाकारलेल्या म्युझिक डायरेक्टरशी, शक्ती कुमारशी, जो स्वतः ही स्वतःच्या अस्तित्वाशी झगडतोय, पण एका वेगळ्या एटीट्युडने.

आमिर कोणत्याही कॅरॅक्टरची नस उत्तमरित्या पकडण्यात माहीर आहे, यात शंकाच नाही. यातही त्याने तेच केलंय. कॅरॅक्टर म्हणून शक्ती कुमार पचायला अवघड आहे पण जमलाय. तरीही, निकुंभने जसा इशानचा कायापालट केला तो टच इथे मिसिंग वाटतो. अर्थात केस टू केस बेसिसचा विचार करता ही तुलना चुकीची होईल, पण पडद्यावर आमिर असताना यु कान्ट एक्स्पेक्ट  लेस आणि ही तुलना होतेच. मे बी हे कारण असू शकतं की, इंसियाला फक्त वाट दाखवण्यापूरताच, निमित्तमात्र शक्तीचा रोल होता. शक्तीने म्हटलेल्या या डायलॉगप्रमाणे "तुम जैसे टॅलेंटेड बच्चे होते हैं ना, वो सोडे में इस बबल की तरह होते हैं, वो ऐसेही उपर आहे हैं, अपने आप, उन्हे कोई नही रोक सकता.." कदाचित, या बबल्सप्रमाणे वरती येण्याचे काम तिचे तिलाच करायचे आहे, ही शक्यता आहे.

एकवेळ तर इथवरही वाटलं की आमिरने हा रोल केला नसता तरीही चालू शकलं असतं, पण आमिर काम करतोय आणि आमिर प्रोड्युस करतोय म्हणून मिळालेलं प्रिरिलीज ऍडवांटेज त्याला मिळालं नसतं आणि चित्रपट येऊन कधी गेला हेही कळलं नसतं.

अजून एका कारणासाठी अमिरचं कौतुक करायला हवंय, ते म्हणजे चित्रपट हा इंसियाचा आहे आणि तिचाच वाटत राहतो. सुपरस्टार म्हणून आमिर कुठेही मध्ये फुटेज खात नाही. हेच त्याने तारे जमीन पर च्या वेळेसही केलेलं, मध्यंतरापर्यंत साधं दर्शनही दिलं नव्हतं त्याने पडद्यावर आणि तरीही नंतर येऊन स्वतःचं अस्तित्व गडदपणे अधोरेखित केलं.

पडदयावर आमिर असताना झाहिरा वासीमचं अस्तित्व जाणवतंच नाहीतर ठळक उठून दिसतं. दंगलमध्ये जितकी धाकड वाटलीये, तितकीच इथे मॅच्युर वाटते. तिची गाण्याविषयीची आत्मीयता, आईबद्दलचं प्रेम, बापाचा राग, द्वेष, भीती, गाणं सोडतानाची हतबलता, हे सगळं ती खूपच संवेदनशीलपणे उभे करते. तिचं भविष्य उज्वल आहे यात शंकाच नाही. आमिरचा सोड्याच्या बबल्सचा डायलॉग तिला पक्का सूट होतोय.

मेहेर वीजने साकारलेली नाजीया, इंसियाची आई, ही देखील कथेचा अविभाज्य भाग आहे. स्वतः आयुष्यभर कुढत जगलेली असताना, मुलीच्या स्वप्नात स्वतः रमणारी, नवऱ्याचा रोष पत्करून, प्रसंगी शारीरिक त्रास सहन करत मुलीला तिच्या स्वप्नासाठी सपोर्ट करणारी आई तिने अक्षरशः जिवंत केली आहे. बजरंगी भाईजानमधल्या आर्त आईचंच हे एक्सटेंडेड वर्जन म्हटले तर वावगे ठरणार नाही.

राज अर्जुनने साकारलेला तिरसट बाप चीड आणणारा आहे. हा चेहरा कुठेतरी पाहिल्यासारखा वाटत होता. सर्च केल्यावर कळाले 'रावडी राठोड' मध्ये एका बऱ्यापैकी रोलमध्ये होता. यातही त्याचे काम चांगले आहे.

अमित त्रिवेदी एक वेडा मनुष्य आहे आणि ते त्याने पुन्हा एकदा सिद्ध केलंय. दिवसेंदिवस प्रेमात पाडतोय हा माणूस. त्रिवेदीने, विषयाला अनुसरून, प्रत्येक सिच्युएशनला कौसर मुनिरने लिहिलेल्या गाण्यांना तितक्यात अप्रतिमपणे कॉम्प्लिमेंट करतील अश्या कंपोझिशन्सने चार चाँद लावले आहेत शिवाय मेघना मिश्राचा आवाज हा झहीरासाठी परफेक्ट सूट झालाय.

अद्वैत चंदन हा पहिल्या चित्रपटात चकित करतो. चित्रपटाचा गाभा फिल्मी वाटू न देता (काही टाळता येणारे संदर्भ सोडले तर) वास्तवाशी पकडून ठेवल्याबद्दल त्याचे कौतुक करायला हवे. यामुळेच काही सीन्स लक्षात राहतात. ज्या कॉम्पिटिशनमध्ये भाग घेण्यास उत्सुक असते त्याच पँप्लेटने जमिनीवरचे अन्न पुसणे, रेकॉर्ड करण्यासाठी पुस्तकांच्या थप्प्यांवर रचलेला लॅपटॉप, क्लासमध्ये सुचलेली ट्यून विसरू नये म्हणून येणारे उत्तर न सांगता ट्यून पकडून ठेवत टीचरची छडी खाणे आणि सर्वात महत्वाचे अखेरच्या अवॉर्ड फंक्शनमध्ये केवळ मेन प्रोटोगोनिस्ट आहे म्हणून तिला जिंकलेली न दाखवणे. या सर्व गोष्टी चित्रपटाला वास्तवाशी धरून ठेवतात.

तारे जमीन पर मध्ये एक अखेरचा सीन आहे. इशानला न्यायला त्याचे पेरेन्ट्स येतात आणि सर्व टीचर्सना भेटतात. प्रत्येक टीचर त्याचं कौतुक करत असतो आणि हे त्यांच्यासाठी आश्चर्याचं असतं. प्रिन्सिपल तर त्यांना इयरबुकवर छापलेली इशानची प्रिंटिंगही दाखवतात. हे सगळं झाल्यावर शेवटी जेव्हा ते इशानला गाडीत बसवून नेणार असतात तेव्हा इशान मागे वळतो आणि धावत आमिरकडे येतो. तो त्याला उचलून हवेत उचलून धरतो आणि चित्रपट तिथे संपतो. निकुंभ सरांमुळे इशान उडायला शिकला, हे किती सुंदरपणे प्रतिकात्मक दाखवलंय.

अशीच आत्मीयता इंसायालाही शक्तीबद्दल वाटते आणि तिला एयरपोर्टला सोडवायला आलेल्या शक्तीला ती परत माघारी येऊन मिठी मारते.

हे दोन्ही सीन्स खूप महत्वाचे आणि एकमेकांशी
संलग्न आहेत. दोन्हीतून त्या कॅरॅक्टरची आपल्या मेंटरबद्दलची कृतज्ञता दिसून येते.

इशान नंदकिशोर अवस्थीचं अवघं आयुष्य बदलवून टाकणारा राम शंकर निकुंभ इथेही दिसतो पण वेगळ्या रुपात. तशी तुलना होणे जरा अवघड आहे कारण इथे निकुंभचं पारडं जड जाईल, कारण निकुंभने इशानसाठी जे केलं ते निस्वार्थी, निरपेक्ष होतं तर शक्ती इंसियासाठी केवळ एक साधन झाला, तिला तिच्या स्वप्नापर्यंत पोचवण्यासाठी. तिची खरी प्रेरणा होती ती तिची अम्मी. जी, इंसिया तिचा इवलासा अंश असल्यापासून झगडत होती तिच्या अस्तित्वासाठी. तिची आवड समजून घेणे, तिचा छंद झोपासण्यास मदत करणे, कधी पैसे चोरून तर कधी तिचे दागिने विकून अम्मीने इंसियाच्या स्वप्नासाठी एक वेडी आई जे जे करु शकेल ते सर्व केलं. चित्रपटाच्या अखेरीस जेव्हा इंसिया सिक्रेट सुपरस्टार म्हणून समोर येते तेव्हा आपल्याला दिसते ती शेवटच्या क्षणापर्यंत तिच्यामागे खंबीरपणे उभी राहिलेली खरीखुरी सिक्रेट सुपरस्टार, तिची अम्मी. तो शेवट डोळे ओलावून जातो.

आपण प्रत्येकजण स्वप्नाळू असतो, आजन्म. त्यामुळे दुसऱ्यांच्या स्वप्नांशी लवकर कनेक्ट होऊ शकतो. त्यांची धडपड, तगमग आपणही अनुभवलेली असते. अशाच एका स्वप्नासाठी आणि आई मुलीतल्या नात्यासाठी हा चित्रपट एकदातरी नक्की पहावा.

© राज जाधव (२१-१०-२०१७)

Comments

Popular Posts