कलाशास्त्रातील पायंडे मोडत जाणारा एकलव्य

१९८९ मध्ये विधु विनोद चोप्रा 'परिंदा'मुळे चर्चेत आला आणि तिथून मागे वळून पाहण्याची वेळ त्याच्यावर आजतागायत आली नाही. '१९४२ अ लव स्टोरी' मुळे त्याची पाळंमुळं इंडस्ट्रीमध्ये अधिकच घट्ट रोवली गेली. पुढे 'करीब' आणि 'एकलव्य' प्रेक्षकांच्या पसंतीस उतरले नाहीत, 'मिशन काश्मीर'ही म्हणावा तसा चालला नाही, पण त्याचं कौतुक झालं.

वेळीच सावरून, हिंदीत एकलव्यनंतर दिग्दर्शनात थोडंसं बॅकफूटवर जात त्याने स्वतःच्या बॅनरखाली इतर दिग्दर्शकांना संधी दिली (अपवाद २०१५ मधील ब्रोकन होर्सेस हा इंग्रजी चित्रपट). त्यातही लेखक, पटकथाकार, निर्माता अश्या वेगवेगळ्या भूमिका त्याने निभावल्या. राजकुमार हिरानी या गुणी दिग्दर्शनाने त्या संधीचं सोनं करत 'मुन्नाभाई सेरीज', '३ ईडीयट्स' आणि पीके सारखे ब्लॉकबस्टर दिले. प्रदीप सरकारसोबतचा 'परिणिता' असो, की राजेश मापूसकर दिग्दर्शित 'फेरारी की सवारी' किंवा बेजोय नांबियारसोबतचा 'वझीर', प्रत्येक चित्रपटाचं स्वतःचं असं वेगळेपण दिसत गेलं.
पण परींदापूर्वी, म्हणजे १९८९ उजाडण्याआधीची साधारण १२-१३ वर्षे त्याने केलेली स्ट्रगल पडद्यामागे राहिली. 

सुरुवातीपासूनच क्राईम आणि थ्रिलर जॉनरमध्ये त्याने आपलं काम सुरू केलं होतं, ते १९७६ मध्ये 'मर्डर ऍट मंकी हिल' नावाच्या नॅशनल अवॉर्ड विनिंग शॉर्ट फिल्मपासून, ज्यात त्याने स्वतः अभिनयही केला होता. असाच तो ओझरता 'जाने भी दो यारो' मध्येही दिसला होता. स्वतःचा थ्रिलरचा ट्रेंड त्याने १९८१ मध्ये आलेल्या आणि नसीरने अभिनय केलेल्या 'सजाये मौत' मध्ये आणि पुढे १९८५ मध्ये 'खामोश' मध्येही कायम ठेवला.

आजही जेव्हा बेस्ट थ्रिलर्स इन बोलीवुड अशी एखादी लिस्ट सर्च करायला जाल तर, 'खामोश' हे नाव आलं नाही तरच नवल. अमोल पालेकर, नसिरुद्दीन शाह, शबाना आझमी, पंकज कपूर, सोनी राजदान, अजित वाच्छानी, सदाशिव अमरापुरकर, पवन मल्होत्रा, सुधीर मिश्रा अशी तगडी स्टारकास्ट ठासून भरलेली असताना, सर्वांना त्यांच्या योग्यतेचे रोल्स लिहिणे आणि त्यावेळी, प्रस्थापित नसताना, ते त्यांच्याकडून कन्वींसिंगली करवून घेऊन पडद्यावर उतरवणे हे एक मोठे चॅलेंज तयार खुबीने पेललं असं म्हणावं लागेल.

अभिनय, कथा, पटकथा, निर्माता आणि दिग्दर्शन अश्या सर्व क्षेत्रात आपले पाय रोवून, स्वतःचे सामर्थ्य सिद्ध करणाऱ्या या अवलियाला वाढदिवसाच्या शुभेच्छा..!

- राज जाधव (०६-०९-२०१७)

Comments

Popular Posts