सिड मेहरा आणि करन शेरगिल, एकाच आरशाच्या दोन बाजू


'दिल चाहता हैं' पाहिल्यानंतर 'सिड' म्हणजे अक्षय खन्नाचा सिद्धार्थ मल्होत्रा हे साधं सरळ समीकरण इतकं अंगवळणी पडलं होतं की नाव उच्चारताच तो आपोआप नजरेसमोर यायचा. शांत स्वभावाचा, काहीसा अलिप्त राहणारा, मोजकेच आणि नेमके बोलणारा सिड मनात घर करून गेला तो कायमचाच. पण कालांतराने सिड म्हटलं की मल्होत्राच्या मागे हलकासा पुसटसा मेहरा दिसू लागला, सिड मेहरा अर्थात रणबीर कपूर आणि त्यानेही मनाला भुरळ घातली.

जितकी त्याची रूम अस्ताव्यस्त, तितकाच तोही. कसलेही ध्येय न बाळगणारा, बापासोबत काम करण्यात रस नसलेला, येणारा क्षण मस्तीत (आनंदात नव्हे) वाया घालवणारा, आयुष्यात पुढे काय करायचे आहे याची पर्वा न करणारा, बापाचं क्रेडिट कार्ड बिनदिक्कत वापरणारा, 'बडा होकर भी बाप के पैसे उडाऊँगा' असं अभिमानाने म्हणणारा सिड, परफेक्टली सध्याच्या दिशाहीन पिढीचा प्रतिनिधी वाटतो. एका सिनमध्ये रस्त्याच्या कडेला असलेल्या ठेल्यावर खाल्ल्यानंतर बिल भरायला, त्याला क्रेडिट कार्ड देताना पाहताना हसू येत असलं आणि तो निरागस वाटत असला, तरी खूप खोल अर्थ आहे त्या सीनला.

कट टू 'लक्ष्य'...

'दिल चाहता हैं' नंतर फरहान अख्तरकडून अपेक्षा वाढलेल्या असताना 'लक्ष्य' आला आणि अतीव अपेक्षा ठेवणार्या बऱ्याच जणांचा हिरमोड झाला. का? इतका वाईट होता का लक्ष्य? तसूभरही नाही. लक्ष्यबद्दलचं हे इनिशीयल मत हळू हळू बदलत गेलं आणि लोकांनी त्याची दखल घेतली. माझ्यासाठी तो दिल चाहता हैं इतकाच आवडता आणि हृदयाच्या अगदी जवळचा चित्रपट आहे.

सिड मेहरा इतकाच रितीक रोशनने साकारलेला करन शेरगिलही बडे बाप का बिगडा बेटा, त्याची रूम आणि त्याचं जगणंही तितकंच अस्ताव्यस्त, उशिरापर्यंत झोपणं, नोकराने सकाळी उठवल्यावर डोळे न उघडता त्याला गिझर ऑन करायला सांगणं, बापासोबत काम करण्यात रस नसणं, करियर ओरिएंटेड कोणतंही ध्येय नसणं, स्वतःचा निर्णय स्वतः घेण्याची कुवत नसणं, मित्र एमबीए करतोय किंवा मिलीटरीत जातोय म्हणून स्वतः ही तेच करण्याचा निर्णय घेणं, हे सगळं सम-अप केलं तर सिड आणि करन एकाच आरशाच्या दोन बाजू वाटतात. आपल्या भावाशी केलेली तुलना ही त्याची एक दुखरी नस, 'मी 'उदेश' नाहीये, मला प्रत्येक बाबतीत त्याच्याशी कॅम्पेयर करत जाऊ नकोस' हे तो पोटतिडीकेने सांगत असतो.

दोघांच्याही भरकटत चाललेल्या एमलेस आयुष्याला योग्य वेळी रुळावर आणण्याचे काम करतात त्या 'आयेशा'(कोंकणा सेन शर्मा) आणि 'रोमी' (प्रीती झिंटा).

आयेशा नावाच्या महत्वाकांक्षी लेखिकेशी सिडची झालेली ओळख, बापाशी भांडून त्याचं तिच्यासोबत राहायला जाणं, तिचं त्याला समजून घेता घेता त्याच्यातल्या ध्येयहीन विचारांना दिशा देत आणि त्याच्या बेशिस्तपणाला चाप देत त्याला स्वतंत्रपणे स्वतःच्या पायावर उभं राहण्यासाठी मदत करणं हळुवारपणे येतं पडद्यावर.  फोटोग्राफर म्हणून त्याला स्वतःच्याच कंपनीत काम दिल्यानंतर त्याचं होत जाणारं ट्रान्सफॉर्मेशन, हळूहळू आयशाला सिडच्या प्रेमात पाडतं, शिवाय तिच्या बॉस, कबीरबद्दल असलेलं प्रेम हे केवळ आकर्षण होतं हेही तिला वेळीच उमगतं.

तिकडे रोमी आणि करन दोघेही एकमेकांवर प्रेम करतात. एक स्टूडेंट ऍक्टिव्हिस्ट आणि रिपोर्टर असल्याने रोमी तिच्या करियरविषयी सजग आहे, शिवाय ती करनला त्याच्या आयुष्यातले 'लक्ष्य' शोधायलाही परावृत्त करते. पण यातले गांभीर्य लक्षात न घेता एका मित्राच्या इन्फ्लुएन्सने तो आर्मीत जायचं ठरवतो. रोमीचा त्यालाही नकार नसतो पण जेव्हा तो तिथुनही पळून येतो तेव्हा ती त्याच्यापासून वेगळे होण्याचा निर्णय घेते आणि इथून त्याच्या बेफिकीर करन शेरगिल ते लेफ्टनंट (पुढे जाऊन कॅप्टन) करन शेरगिलच्या ट्रान्सफॉर्मेशनला सुरुवात होते.

सिडचे बाबा (अनुपम खेर) सुरुवातीला मनमिळाऊ, सिडला प्रेमाने समजावणारे व अंततः कठोर, तर करनचे बाबा (बोमन इराणी), हे सुरुवातीपासूनच कठोर वाटत असले तरी आपल्या मुलांविषयी दोघांच्याही मनात अतोनात प्रेम आहे. आपला मुलगा स्वतःच्या पायावर उभे राहणे शिकला आहे, हे पटल्यानंतर सिडचे बाबा त्याला घरी न्यायला येतात तेव्हा त्यांच्या डोळ्यात ते प्रेम, ते समाधान दिसतं. तसेच, करन कारगिलच्या मिशनला जाण्याआधी खास त्याच्या बाबांना फोन करून, तो त्यांच्यावर किती प्रेम करतो हे सांगतो, तेव्हा त्या कठोर दगडालाही पाझर फुटतो. आपण लोक बाबा या इलेमेंटला कधीच मोकळेपणाने बोललेलो नसतो आयुष्यात, आणि जेव्हा बोलण्याची वेळ येते तेव्हा खरंतर वेळ निघून गेलेली असते, असो.

अखेरीस, आपला मुलगा जगणे शिकला आहे, हे पटल्यानंतर घरचे सिडला न्यायला येतात, तेव्हा, हा निघून जाणार म्हणून, त्याच्या प्रेमात पडलेल्या आयेशाच्या मनाची घालमेल त्याच्या लक्षात येत नाही. आपणही तिच्या प्रेमात आहोत यापासून अनभिज्ञ असणारा तो घरी आल्यावर जेव्हा न्यूजपेपरमध्ये आलेलं आयेशाचं आर्टिकल वाचतो तेव्हा त्याला खऱ्या प्रेमाची अनुभूती होते.

रोमाही रिपोर्टर बनून कारगिलला येते तेव्हा तिची भेट एका वेगळ्या करन शेरगिलशी होते. तिने तिची एंगेजमेंट मोडलेली आहे. या पार्श्वभूमीवर एका बेसवर हल्ला होतो आणि त्या दोघांना काही वेळ एकत्र व्यतीत करायला मिळतो. त्या भयाण वातावरणात दोघांच्या मनातली घालमेल 'कितनी बाते याद आती हैं' मध्ये नेमकी मांडलेली आहे.

तसं बर्याच अंशी मी स्वतःला या दोन्ही कॅरॅक्टरशी रिलेट करतो, म्हणून खूप जवळची वाटत राहतात.
पण पडद्यावरचं करनचं ट्रान्सफॉर्मेशन सिडपेक्षा अधिक परिणामकारकरित्या समोर येतं. आधीचा केयरलेस, बाळबोध वाटणारा करन जेव्हा एक तडफदार, रुबाबदार लेफ्टनंट बनतो तेव्हा त्याचा एकंदर ऑरा अगदीच उठून दिसतो आणि त्याने तो कॉन्फिडन्स शेवटपर्यंत मेंटेन केला आहे, यातच त्या कॅरॅक्टरची जित आहे. मिशनला जाण्याआधी तो रोमीला त्याचं 'लक्ष्य' म्हणून तो सर करणार असलेल्या टेकडीकडे बोट दाखवतो, त्या सीनमध्ये रितीकने जीव ओतलाय.

दहा गुंडांना लोळवणाऱ्या, झाडामागे फिरणाऱ्या, प्रत्येक गोष्टीत परिपूर्ण आणि असामान्य असणारऱ्या बनावटी नायकांपेक्षा आपल्या नेहमीच्या जीवनाशी आणि संवेदनांशी एकरूप वाटणारे सिड आणि करन केव्हाही अधिक जवळचे, खरेखुरे आणि आपल्यातले वाटतात, अगदी आत्ता बाहेर पडलो तरी गर्दीत सापडावेत असे.

© राज जाधव (१४-०९-२०१७)

Comments

Popular Posts