गीतलेखनातील अमिताभ

'कभी किसी को मुकम्मल जहाँ नहीं मिलता
कहीं ज़मीं तो कहीं आसमाँ नहीं मिलता'

निदा फजलीं यांची ही गझल सर्वार्थाने प्रत्येकाच्या जीवनाचा भाग आहे, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. आपल्या प्रत्येकाच्या जीवनात 'आपल्याला ज्या गोष्टींची आवड आहे', ते न करता येण्याची सल असतेच.

वर्ष १९९९:

लखनऊमध्ये ऑर्केस्ट्रामध्ये वगैरे गाणी गाऊन कंटाळल्यानंतर सर्व चित्रपटवेड्यांच्या परंपरागत प्रथेप्रमाणे, असाच एक तरुण गायक होण्यासाठी स्वप्नांची पोटली बांधून, लखनऊ मधून मुंबईत दाखल झाला. गायनाची कसलीच पार्श्वभूमी नाही, वडील शासकीय पगाराच्या नोकरीवर तर आई हाऊसवाईफ. तरीही स्वप्नांचा मागे धावत तो मुंबईत पोहोचलाच. त्याचं नाव, 'अमिताभ भट्टाचार्य'.

मुंबईत दाखल झाल्यानंतर, कंपोजर्सच्या ऑफिससमोर रांगेत उभे राहायचं आणि आपल्या गाण्याची सीडी जमा करायची, हा त्याचा रोजचा उद्योग चालू होता, पण म्हणावं तसं काही घडत नव्हतं.

अश्यात एक चांगली गोष्ट घडली, ती म्हणजे त्याला प्रीतम चक्रवर्तीला असीस्ट करायची संधी मिळाली (पुढे जाऊन दोघांचं ट्युनिंग यामुळेच जमलं असावं). आणि अश्यातच त्याने फ्रस्टेशन दूर करण्यासाठी काहीबाही खरडायला सुरुवात केली.

वर्ष २००४:

मुंबईत, विशेषतः इंडस्ट्रीत येऊन पाच वर्षे झाली होती पण अमिताभ अजूनही जिथल्या तिथेच होता, स्ट्रगल अजून सुरूच होता. फ्रस्टेशन येत होतं, पण काही मार्ग दिसत नव्हता.
मग असं काहीतरी घडलं की त्याच्या नकळत, त्याचा आयुष्याच्या टर्निंग पॉइंटच्या दिशेने, त्याची वाटचाल सुरू झाली. म्युसिक कंपोजर अमर्त्य राहुत याच्यामार्फत त्याची ओळख अमित त्रिवेदीशी झाली. अमितही त्यावेळेस स्ट्रगलच करत होता, पण टेलिव्हिजन्स, जिंगल्स आणि काही चित्रपटही चालू असल्यामुळे त्यामानाने त्याचे बरे चालले होते फक्त त्याचे नाव म्हणावे तसे लोकांपर्यंत पोहोचले नव्हते. अमित त्रिवेदी आणि अमर्त्यने मराठी चित्रपट 'उत्तरायण' साठी एकत्र काम केलं होतं. भेटीनंतर अमिताभ आणि अमितचे धागे जुळले. अमिताभ आता अमितसोबत डमी सिंगर म्हणून काम करू लागला, त्याच्यासाठी लिरिक्स लिहू लागला. प्रितमसोबत एकच्युअल काम करण्याआधी अमिताभचं ट्युनिंग अमित त्रिवेदीसोबत जबरदस्त जमलं होतं, जे आजतागायत आहे. दोघांनी अनेक क्लासिक अल्बम्स दिले पुढे जाऊन.

वर्ष २००७:

टेलिव्हिजन, जिंगल्स आणि काही चित्रपटांशिवाय अमित त्रिवेदीने या वर्षी इंडियन आयडॉल फेम अभिजित सावंतच्या जुनून अल्बमसाठीही काम केलं. पण त्याच्या आयुष्यातली सुवर्णसंधी चालून आली ती सिंगर शिल्पा रावमुळे. तिने अमितची ओळख अनुराग कश्यपशी करून दिली. अनुराग त्याच्या ड्रीम प्रोजेक्ट 'देव डी' साठी नव्या दमाच्या कंपोजिशन्सच्या शोधात होता. अमित हा प्रोजेक्ट करणार असं ठरलं, पण काही कारणांसाठी हा चित्रपट लांबला आणि दरम्यान राजकुमार गुप्ताच्या 'आमिर' साठी अनुराग कश्यपने अमित त्रिवेदीला रेकमेंड केले. पहिलाच चित्रपट असल्यामुळे अमित त्रिवेदी थोडासा नर्व्हस होता त्यामुळे त्याने गाणं लिहिण्यासाठी अमिताभ भट्टाचार्यला बोलावून घेतलं.

वर्ष २००८

गायक होण्याचं स्वप्न आता हळूहळू धूसर होतंय असं दिसायला लागल्यावर आणि अमित त्रिवेदीच्या समजावण्यानंतर नाईलाजाने अमिताभ लिहायला तयार झाला खरा, पण त्याने गायक होण्याची अजूनही आशा सोडली नव्हती. त्याच भीतीपोटी त्याने, स्वतःच्या नावाऐवजी 'इंद्रनील' हे टोपणनाव धारण करायचे ठरवले. 'आमिर' आला, बऱ्यापैकी चालला, क्रिटिकली बरंच कौतुक झालं चित्रपटाचं, म्युझिकचं, पण इंद्रनील पडद्याआडच राहिला.

वर्ष २००९

सुदैवाने 'देव डी' चं काम पुन्हा सुरू झालं होतं आणि एव्हाना अमिताभला आपल्यातल्या गायकापेक्षा गीतकारावरचा विश्वास दृढ झाला होता, कारण इंडस्ट्रीत राहणं गरजेचं होतं. शिवाय जे विकलं जातंय ते सोडून भलत्याच्या पाठीमागे लागून हाती शून्य राहण्याचीही दाट शक्यता नाकारता येत नव्हती. अमितमुळे देव डीच्या टीममध्ये अमिताभची वर्णी लागली आणि पुढे इतिहास घडला.

देव डी चं काम सुरू झालं. अमिताभला अमित त्रिवेदीच्या जगावेगळ्या कंपोजिशन्स करण्याच्या हातोटीची पुरेपूर जाण होती आणि अमितला अमिताभच्या रफ, हटके तरीही ट्युनमध्ये फिट बसणारे लिरिक्स लिहिण्याच्या कौशल्याचीही. जसा 'इमोसनल अत्याचार' हा शब्द.

इमोसनल अत्याचारची कल्पना अमिताभला सुचली आणि गाण्याचा बाज शब्बीर कुमार- मोहम्मद अझीझ टच असलेला, ब्रास बँड मध्ये गातात त्याप्रमाणे ठेवायचा, असं ठरलं. डेमोसाठी अर्थातच अमिताभ होताच, जोडीला अमितही आला आणि दोघांच्या आवाजात गाणं रेकॉर्ड झालं, अनुराग कश्यपला ऐकवण्यात आलं. अनुरागला हे गाणं, त्याच्या ब्रास बँड टच आणि त्या दोघांच्या आवाजासहित इतकं आवडलं की त्याने दोघांच्या आवाजातलं वर्जन जसंच्या तसं सिनेमात घ्यायचं ठरवलं.

आता अमिताभ चक्रावला. त्याला वाटलं, आपण असं गाणं स्वतःच तयार केलंय की जे आपलं गायक होण्याचं करियर एक क्षणात धुळीत मिळून टाकेल. इथं अमिताभमधला गायक पुन्हा जागृत झाला, त्यांने अनुरागला त्याची भिती समजावून सांगितली आणि त्यावर मार्ग म्हणून, क्रेडीट्स मध्ये 'बँड मास्टर रंगीला आणि रसीला' असे नाव द्यायचे फायनल झाले.
देव डी आला आणि त्याच्या अनयुजुअल कश्यप टचमुळे तो लोकांच्या पसंतीस उतरला. त्याचं संगीतही हळू हळू लोकांच्या ओठी तरळू लागलं. इमोसनल अत्याचारने तर कित्येक बाराती गाजवल्या असतील. त्यावेळेसचे बरेचशे म्युझिक अवॉर्डसही त्याने पटकावले. अमित त्रिवेदीला तर नॅशनल अवॉर्डही मिळवून दिलं. देव डी नंतर अमिताभ भट्टाचार्य आणि अमित त्रिवेदी ही जोड गोळी लोकांच्या परिचयाची झाली. स्ट्रगल संपली असं म्हणता येणार नाही, इथे खरी स्ट्रगल सुरू झाली होती, मिळवलेलं अस्तित्व टिकवण्याची.

याच वर्षी गायक अमिताभ भट्टाचार्यलाही एक संधी मिळाली. करण जोहर धर्मा प्रोडक्शनच्या बॅनरखाली नवोदित दिग्दर्शक, अयान मुखर्जीला आणि शंकर-एहसान-लॉय यांना घेऊन 'वेक अप सिद' च्या तयारीत होता. त्यातले एक गाणं अमित त्रिवेदी बनवत होता, ज्यासाठी त्याने अमिताभला बोलावून घेतले. ते गाणं होतं 'ईक तारा'. युथ ओरिएंटेड विषय असल्याने चित्रपट तरुणांमध्ये लोकप्रिय झाला आणि 'ईक तारा' नेही आपले अधिराज्य गाजवले. २००० नंतरच्या ऑल टाईम बेस्ट गाण्यांची जर यादी केली, तर हे गाणे हमखास त्यात असेल, असे म्हटले तर ती अतिशीयोक्ती होणार नाही.

वर्ष २०१०

वर्षाच्या मध्यंतरानंतर अमित त्रिवेदी आणि अमिताभ भट्टाचार्य ही जोडी पुन्हा एकदा एकत्र आली तो चित्रपट होता विक्रमादित्य मोटवाने या नव्या दमाच्या दिग्दर्शकाचा, 'उडान'. चित्रपटाचा विषय आणि थीम वेगळी होती. विषयाला साजेसं संगीत आणि वेगळ्या धाटणीची गाणी यांचा सुरेख संगम यात अनुभवता आला. 'आझादीया', 'नाव', 'एक उडान', 'कुछ नया तो जरूर हैं' अशी एकापेक्षा एक अर्थपूर्ण आणि चित्रपटाला जोडून ठेवणारी तेवढ्याच ताकदीची गाणी अमिताभने याच्यामार्फत दिली. चित्रपट समीक्षकांनीही गौरवला आणि अमित-अमिताभ ही जोडी काय जादू करू शकते याचा पुन्हा प्रत्यय आला.

आमिर, देव डी, उडान अश्या चित्रपटांची लिस्ट वाढत होती पण अमिताभ हे नाव अजून मासेसपर्यंत पोचलं नव्हतं, त्याला एक मेजर कमर्शियल हिटची गरज होती. ती कमी पूर्ण केली, यशराज प्रोडक्शन्सच्या 'बँड बाजा बारात' ने. यातली गाणी तुफान गाजली, अमिताभच्या लेखनातले वेगळेपण प्रत्येक गाण्यात अधोरेखित होत होते. चित्रपट दिल्ली बेस्ड असल्यामुळे दिल्लीछाप शब्दांचा वापर करून अमिताभने स्वतःचे वेगळेपण सिद्ध केले. 'ऐवेयी ऐवेयी' मधल्या 'चाय में डुबा बिस्कुट हो गया' टाईप लिरिक्सने लोकांच्या नजरा वळवल्या. तरकीबें, श्रेयां घोषालचं 'आधा ईश्क' आणि 'दम दम' जमून आली, शिवाय अमिताभला 'मित्रा' साठी पुन्हा एकदा गायची संधी मिळाली आणि काय गायलाय तो खरोखर. 'मित्रा' हे त्याचं स्वतः गायलेल्या गाण्यांमध्ये पर्सनल फेवरीट आहे, अगदी ईक तारा पेक्षाही.

वर्ष २०११

या वर्षी बऱ्याच चित्रपटांसाठी गीतलेखन करण्याची संधी अमिताभला मिळाली. अमित त्रिवेदीसोबत 'नो वन किल्ड जेसीका' आणि 'चिल्लर पार्टी', प्रीतम सोबत 'रेडी' आणि 'थँक्यू', सलीम सुलेमान सोबत बँड बाजा नंतर पुन्हा एकदा 'लेडीज वर्सेस रिकी बहल', लव का दि एन्ड, दिल्ली बेली वगैरे.

पण खऱ्या अर्थाने हे वर्ष साजरं झालं ते अमिताभने ओनीरच्या 'आय एम' साठी लिहिलेल्या 'इसी बात पें' या गाण्यासाठी नॅशनल अवॉर्ड मिळालं, या खास कारणामुळे.
ऐकलं नसेल तर नक्की ऐका.

"अगर जिंदगी हो खुद में कही
फिर क्यू रहें किसी की कमी
बोझ बन के रहें क्यू सुबह किसी रात पें
आ बदल डाले रस्में सभी इसी बात पें.."

वर्ष २०१२

यावर्षी 'फेरारी की सवारी', 'अय्या', 'एक मैं और एक तू' मध्ये अमिताभला संधी मिळाली. पण हे वर्ष गाजवलं ते अग्नीपथ आणि एजंट विनोदच्या गाण्यांनी. अजय-अतुलच्या संगीताला तोडीस तोड शब्द लिहून त्याने अग्नीपथ अल्बम अजरामर केला. 'अभी मुझ में कही' आणि 'ओ सैया' तर इमोशनली बेस्ट. एजेंट विनोदमध्ये एक बाजूला 'पुंगी' सारखं अतरंगी गाणं तर दुसरीकडे अनेकार्थी अजरामर 'राबता'. त्याच्या पोतडीत सर्व प्रकारच्या जडीबुटी सापडतील असा हरफन मौला आहे तो.

वर्ष २०१३

अमिताभने अमित त्रिवेदीबरोबर यावर्षी 'बोंम्बे टॉकीज' 'घनचक्कर' आणि 'लुटेरा' मध्ये पुन्हा काम केले. घनचक्कर आणि लुटेरा चित्रपटातली गाणी ही कथेला सूट होणारी होती तरी अगदी विरुद्ध टोकाची. घनचक्कर मधली गाणी ही वेगळ्या जॉनरची होती, 'घनचक्कर बाबू',  'लेझी लॅड', 'झोलू राम', 'अल्लाह मेहेरबान' टाईप तर लुटेरा मधली गाणी संथ, आशयाला धरून अशी होती. त्या काळाला साजेल असं मोनाली ठाकुरच्या जादुई आवाजातलं 'सवार लू', अव्यक्त प्रेमावरचं 'अनकही', जीवनाचं तत्वज्ञान शिकवणारं 'मोंटा रे', हळव्या मनाची हाक 'मनमर्जीयां', अमित त्रिवेदीनं गायलेलं जगण्याने हताश झालेलं 'जिंदा हू यार काफी हैं'. सर्व ट्रॅक्स अजरामर.

याशिवाय याच वर्षी प्रितमसोबतचा 'ये जवानी हैं दिवानी' आणि विशाल शेखर सोबतचा 'चेन्नई एक्सप्रेस' च्या गाण्याचंही कौतुक झालं. 'ये जवानी' टिपिकल अमिताभ-प्रीतम अल्बम तर 'चेन्नई एक्सप्रेस' मध्ये साऊथ इंडियन फ्लेवर गाणी.

वर्ष २०१४

यावर्षी अमिताभच्या दोन चित्रपटांच्या गीताने वर्ष गाजवलं ते म्हणजे 'शंकर एहसास लॉय' सोबतचा 'टू स्टेटस' आणि 'विशाल शेखर' सोबतचा 'हसी तो फसी'.

टू स्टेटस मधली 'मस्त मगन', 'ओफ्फो', 'चांदनिया' गाणी लक्षात राहिली तर 'लोचा ए उलफत' ही नवी संकल्पना त्याने जगासमोर आणली.

हसी तो फसीबद्दल काय लिहू. 'परिणीती' आणि 'जेहनसीब' साठी कितीही वेळा पाहू शकतो मी. 'जेहनसीब', 'मनचला' ही गाणी ऑल टाईम फेवरीट्स सोडली तर 'ड्रामा क्वीन', 'पंजाबी वेडिंग सॉंग' आणी 'शेक ईट लाईक शम्मी' अशी व्हरायटी देखील आहे.

वर्ष २०१५

रोहित शेट्टी, शाहरुख, काजोल, वरुण आणि क्रितीचा मल्टिस्टारर 'दिलवाले' बॉक्स ऑफिसवर काही जादू दाखवू शकला नाही पण 'गेरूआ', 'प्रेमिका', 'मनमा इमोशन' आणि 'जनम जनम' प्रेक्षकांच्या पसंतीस उतरले.

'बजरंगी भाईजान'च्या सात-आठ गाण्यांच्या गर्दीत अमिताभने लिहिलेल्या, 'तू चाहीये' या एकाच गाण्याचं वेगळेपण उठून दिसतंच.

'फँटम'च्या 'अफगाण जलेबी' नेही त्या वर्षी वेडं लावलं, हे विसरायला नको.

वर्ष २०१६

हे वर्ष अमिताभच्या मानाने सर्वात महत्वाचं मानायला हवं, असंच गेलं. या वर्षीचे दोन ब्लॉकबस्टर सिनेमे त्याच्या नावे होते, 'ए दिल हैं मुश्किल' आणि 'दंगल'. पुन्हा दोन्ही एकमेकांपासून वेगवेगळे आणि चॅलेंजिंग प्रोजेक्ट्स. ए दिल..मध्ये रोमान्स, इमोशन, विरह हा मेन कंटेंट असला तरीही त्यात नवीन जनरेशनला कनेक्ट होतील असे 'क्यूटी पाय' आणि 'ब्रेकअप सोंग्स' देखील होते. 'चन्ना मेरेया' ने वर्ष गाजवलं तर बुलेया आणि टायटल ट्रॅकचेही कौतुक झाले.
दंगल बऱ्यापैकी चॅलेंजिंग होता. आमिर खानने अमिताभचं काम 'दिल्ली बेली' च्या वेळी जवळून पाहिलं होतं, आवडलंही होतं. यातल्या गाण्यात हरियाणाच्या मातीतला गंध जाणवतो. सिगरेटच्या पॅकेटच्या वॉर्निंगवरून सुचलेलं 'हानिकारक बापू' असो की 'धाकड' किंवा 'दंगल' टायटल ट्रॅक, ही हरियाणवी टचची गाणी शिवाय वेगळ्या मूडचे गीलेहरिया आणि इमोशनल नैना नक्कीच चित्रपटाचा आशय अजून गडद करतात.

वर्ष २०१७

या वर्षी मोस्ट अवटेड रईसमधले 'जालीमा' लक्षात राहिलं. ट्यूबलाईट आणि जग्गा जासुस बॉक्स ऑफिसवर दणकून आपटले असले तरी, काही गाणी ओठांवर रुळली.
अमिताभ सध्या प्रभासच्या 'साहो'वर काम करतोय. पुढे अजूनही प्रोजेक्ट येतील त्यातही अशीच अर्थपूर्ण विविधता असेल ही खात्री आहे. त्याच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा!

- राज जाधव (१२-०८-२०१७)



Comments

Popular Posts