लाल रंग


जसं सध्या पुणेकर आहे, तरीही बालपण आणि शिक्षण सोलापूर आणि कोल्हापूरमध्ये गेल्यामुळे ही दोन्ही शहरं फार जिव्हाळ्याची वाटतात (कोल्हापूर जरा जास्तच), तसंच अर्ध्याहून अधिक पंजाब आणि हरियाणा फिरलो असल्यामुळे व तिथल्या लोकांचा सहवास मिळाल्यामुळे त्यांच्या राहणीमान, बोलण्या-वागण्याच्या बाबतीतही आपलेपणा जाणवतो.

ओये लक्की पासून सुरु झालेला हा सिलसिला, मध्यंतरी TWM रिटर्न्स, उडता पंजाब आणि दंगलच्या निमित्ताने परत ताजा झाला होता. कदाचित त्यामुळेच दंगल खूप जवळचा वाटलेला. सर्व कॅरॅक्टर, भाषा, आजूबाजूची ठिकाणं सगळेच ओळखीचे वाटत होते.

आता हे पुन्हा नव्याने आठवण्याचे कारण म्हणजे, 'लाल रंग'. अस्सल हरियाणाच्या मातीतला चित्रपट, दिल्ली चंदीगड हायवेच्या मधोमध वसलेलं शहर, 'करनाल' मधला.

विषय नवा आणि वेगळा असला तरी चित्रपट मैत्री, प्रेम, विरह, लोभ, पश्चाताप या सगळ्यांवर वेगळ्याच शैलीत भाष्य करतो.
चित्रपटाचं कथानक बेकायदेशीर ब्लड चोरीवर आधारित आहे. या धंद्यातला महारथी बनू पाहणारा, शंकर (रणदीप हुडा) शासकीय विद्यालयात 'डिप्लोमा इन मेडिकल लॅब टेक्नॉलॉजी' मध्ये ऍडमिशन घेतो, कारण त्याला बेमालूमपणे ह्या धंद्यात जम बसवायचा आहे आणि ते कॉलेजमध्ये राहूनच शक्य आहे. तिथल्या लॅब असिस्टंट पुष्पेंदर उर्फ बावजी (राजेंद्र सेठी) आणि इतर स्टाफची त्याला साथ आहे, त्यामुळे कॉलेजमधल्या अटेंडेन्स वगैरे फॉर्मलिटीज तर मॅनेज होतातच पण तो कॉलेजचे रजिस्टर, मेडिकल कॅम्प इथेही फेरफार करून स्वतःच्या रक्ताचं पाणी करून, दुसऱ्यांच्या रक्ताचे पैसे कमवतोय. बेकायदेशीर काम करत असला तरी, तो वृत्तीने खलनायक वाटत नाही, त्याच्या कॅरॅक्टरला काहीसा ग्रे शेड आणि संवादाला ब्लॅक ह्युमर टच असूनही तो शांत डोक्याचा, तिरकस हसणारा, विनोदी (witty या अर्थाने), दिलदार, भावनिक आणि तत्ववादी आहे. पण हे सारे पदर जसजसा चित्रपट पुढे सरकतो, तसतशे आपल्यासमोर उलगडत जातात.

त्याच कॉलेजमध्ये आपल्या वडिलांच्या वशिल्याने राजेशने (अक्षय ओबेरॉय) ऍडमिशन घेतले आहे. पहिल्याच दिवशी तो रॅपीडिक्स स्पॉन्सर्ड इंग्लिश बोलणारी पूनम (पिया वाजपेयी) ला भेटतो, त्यांचात वाद, मैत्री आणि कालांतराने (quite obvious) प्रेम होते. तिथेच त्याची शंकर सोबतही ओळख होते. शंकरच्या बिनधास्त, बेफिकीर स्वभावामुळे राजेश हळू हळू त्याचा बेस्ट बडी होऊन जातो. आरएक्स १०० वर उनाडक्या करत फिरणे, कॉलेज सोडून शंकर सोबत त्याच्या रूमवर पार्ट्या करणे हे उद्योग सुरु होतात. शंकरच्या रूमवरही अस्ताव्यस्त पडलेलं सामान सोडलं तर भिंतीवर नेताजी सुभाषचंद्र बोस यांचं पोस्टर हे एकदम नजरेत येणारं (तुम मुझे खून दो दर्शवणारं, पण याचा अर्थ शंकरपुरता वेगळा होता). शंकर काय करतोय याची कल्पना नसल्यापासून ते त्याच्या कामात मदत करून स्वतः चा हिस्सा मिळवणे, इथपर्यंतच्या त्याच्या प्रवासात राजेश खुश आहे. अर्थात तो मोबदला कामाच्या तुलनेत त्याला नेहमीच कमी वाटतो, पण त्याने कधी शंकरला बोलून दाखवले नव्हते. त्याच्याही नकळत तो झटपट पैसे कमावण्याच्या चक्रात अडकत चालला होता.

पुढे एका घटनेत एका डोनरचा मृत्यू होतो आणि तात्पुरता पोलिसांचा ससेमिरा यांच्या पाठी लागतो. शंकरची दुखरी नस, त्याची प्रेयसी राशी त्याला सोडून गेली आहे, राजेशच्या विनवणीमुळे ती त्याला एकदा भेटायला येते, तेही शेवटचं. तिच्या जाण्याने शंकर हताश होतो आणि हाती आलेलं एक नवीन काम तो राजेशला देतो. पोलीस त्यांच्या एका ब्लड सप्लायरला पकडतात, पण राजेश काम फत्ते करतो आणि शंकरकडे येतो. शंकर नेहमीप्रमाणे त्याचा हिस्सा देऊ करतो पण आता राजेशची भूक वाढली आहे, आता त्याला अर्धा हिस्सा हवा आहे. तो शंकरची कॉलर पकडतो आणि शंकर त्याचा कान लाल करतो. शंकर तिजोरी उघडून त्याच्या तोंडावर पैसे फेकून, 'प्रेमाने मागितले असते तर सगळे दिले असते ' म्हणून निघून जातो.

राजेशच्या डोक्यात हवा गेली आहे, आता तो एकटं काम करतोय. शंकरला बायपास करून त्याचे सारे काँटॅक्टस, बावजी यांना वापरून तो परस्पर काम करतोय. त्यात त्याचा जम बसलाय, चांगले पैसेही कमावू लागलाय. त्याला शंकरचा रेप्लिका व्हायचंय, त्याच्यासारखीच आरएक्स १०० ही घेतली आहे त्याने. घरचे खुशही आहेत, कारण पैसा घरात येतोय. एक छान वाक्य आहे यात, गरिबाघरी येणारा पैसा कुठून आलाय हे विचारलं की लक्ष्मी नाराज होते, येतोय तो येऊ द्यायचा, नाही म्हणायचं नाही. घरच्यांनी पूनमसोबत लग्नही ठरवलं आहे. सगळं आलबेल आहे समजून तो आई वडिलांना हरिद्वारला घेऊन जातो. दरम्यान, राजेश आणि बावजीच्या चुकीमुळे हरविंदर नामक एका गरजूला HIV बाधित रक्त चढवलं जातं आणि यात राजेशचं नाव समोर येतं.
एस पी गजराज सिंग (रजनीश दुगगलने जमवलाय रोल), जो बर्याच दिवसांपासून यांच्या मागं आहे, पोलिसी खाक्या दाखवून त्याला आणि त्याच्या साथीदारांना यातून सुटण्याचा पर्याय देतो; दोन दिवसात त्यांच्या म्होरक्याचं नाव सांगायचं. राजेश पूनमला हे सर्व शंकरने फसवून करवून घेतल्याचं सांगतो आणि आपली कातडी वाचवण्यासाठी पोलिसांना त्याचे नाव कळवणार असल्याचेही सांगतो. शंकर त्याला रस्त्यात भेटतो आणि त्याला, पेंडिंग असलेल्या राईडला घेऊन जातो आणि माझं नाव यात येता कामा नये शिवाय ही तुझी पापं तुलाच भोगावी लागणार आहेत, अशी प्रेमळ धमकी देऊन निघून जातो. इथे त्याचे कॅरॅक्टर काहीसे निगेटिव्ह वाटते.. पण, पुन्हा तो प्रेक्षकांना चकित करतो.

सकाळी राजेशच्या दारात बावजी येऊन उभा राहतात आणि त्याला पेपर आणि राजेशसाठी दिलेली चिठ्ठी दाखवतात. शंकरने सर्व आरोप स्वतःवर घेतले असतात, "आता मी आत पाच वर्षे मजा करणार, तुम्ही बाहेर राहून तुमच्या पापांची फळं भोगा", असं म्हणत. शिवाय राजेशने आपल्यासाठी विनवणी करून राशीला भेटायला आणल्याबद्दलचे उपकारही तो विसरला नव्हता, त्याचीही परतफेड करायची होतीच. राजेश निरुत्तर होतो.

त्यानंतर राजेशने आता प्रामाणिकपणे काम करायला सुरुवात केली आहे. पण पाच वर्षांपासून जी सजा तो भोगतोय, त्याची सल अजून कमी होत नाहीये. पाच वर्षांनी राजेशला एका हॉस्पिटलमध्ये एका रक्ताच्या बाटलीच्या सॅम्पलकडे बघून हे सगळं पुन्हा आठवलंय. त्याला मुलगा झालाय, तो त्याला घेऊन बायकोसोबत कारमध्ये चालला आहे, समोर त्याला आरएक्स १०० दिसतेय, ओळखीची. तो खाली उतरतो आणि ओळखीचा आवाजही कानी पडतो, शंकरचा.

बाप झाल्याबद्दल त्याचे अभिनंदन करत तो विचारतो, "नाव काय ठेवलं आहे?"

राजेश म्हणतो, "शंकर"

"नाव तर ठेवलंस ठीक आहे, पण गुण माझ्यासारखे नकोत"
यावर शांतपणे राजेश म्हणतो, "म्हणूनच तर ठेवलंय"

अख्ख्या चित्रपटात शंकर इथे निरुत्तर होतो.

शेवटी राजेश शंकरला मनसोक्त मिठी मारून, या शिक्षेतून मुक्ती द्यायला सांगतो.

शंकर आता एक एनजीओ चालवतो, नियमित रक्तदान करतो. त्याची आजवरची 'लाल रंग' ची कमाई त्याने हरविंदरच्या मुलाला डॉक्टर बनण्यासाठी दिली आहे, राजेशलाही तो प्रायश्चित म्हणून काही पैसे त्याला द्यायला सांगतो. चित्रपट संपतो.

अस्सल हरियाणवी जाट 'रणदीप हुड्डा' ने साकारलेला शंकर ही चित्रपटाची एक मोठी जमेची बाजू आहे. सरबजीत आणि चार्ल्स पहिला नाहीये अजून, ते सोडून (बघेपर्यंत तरी) हा त्याचा आजवरचा सर्वोत्कृष्ट परफॉर्मन्स असेल. पूर्ण चित्रपटभर त्याचा वावर एका वाघासारखा आहे, दबक्या पावलांनी चालणारा, पण आपल्या अस्तित्वाची जाणीव करून देणारा वाघ. सर्व छोटे मोठे सपोर्टींग रोल्सही दाद देण्याजोगे असले तरी हा चित्रपट फक्त आणि फक्त हुडाचाच आहे. जाट असल्याचा त्याला भाषेसाठी नक्कीच फायदा झाला असेल, तरीही चित्रपट संपल्यानंतरही हे पात्र हुडा ऐवजी इतर कुणी करू शकेल हे इमॅजिन करवत नाही.

पण ट्रेजेडी ही आहे की अश्या भूमिका आणि असे नायक अंडररेटेड राहतात, यासारखी कितीतरी उदाहरणं आहेत. नवीन दिग्दर्शक, वेगळा विषय, नॉर्मल माणसांसारखी दिसणारी ऍक्टरमंडळी, कुठलाही प्रस्थापित स्टार, दिग्दर्शक नाही, असं काही समीकरण असलं की आपण जरा चाचरतोच चित्रपट बघायला.

आता हे सगळं वाचून, हा चित्रपट बघण्याचा विचार करून, बघेपर्यंत (काही न पाहताही) तुम्हीसुद्धा नक्कीच मला म्हणाल, "बावळा हो गया के? हा चित्रपट कोण बघणार".

- राज जाधव (२५-०५-१७)

Comments

Popular Posts