सिद्धार्थ- दी प्रिझनर


सिद्धार्थ. एक टिपिकल विस्मरणात गेलेला (अयशस्वी म्हणावा इतपत) लेखक, बेजबाबदार नवरा, नालायक बाप आणि इथंवरच न थांबता आता एक प्रिझनर, आरोपी. जेलमध्ये जाऊन आलेला.

अशी चित्रपटाची सुरुवात होते आणि आपण अस्वस्थतेतच जागेवर पुन्हा स्थिरावतो, पुढे काय मांडून ठेवलंय हे बघायला.
जेलमधून सुटल्या सुटल्या अपेक्षेप्रमाणे तो आपल्या सासरी, जिथे बायको त्याच्या मुलाला घेऊन राहते आहे, तिथे जातो. भेटणे तर दूर त्याच्या सावलीपासूनही त्याच्या बायकोला आणि मुलाला दूर ठेवलं जातं. त्याची हताशता नजरेत दिसतेय पण त्याला जबाबदारही तोच असावा म्हणून तो इतरांना दोष देत नाहीये. तो तिथून निमूट निघून जातो. त्याच्या जेलमध्ये जाण्याचं कारण कुठंही दाखवलं, सांगितलं नाहीये पूर्ण चित्रपटात. हा प्रश्न सतावत राहतो चित्रपटभर.

आपल्याच बायको आणि मुलाला भेटण्याचे दरवाजे बंद होतात तरी तो बायकोच्या घरातल्या मोलकरणीला पैसे देऊन पार्कमध्ये त्याच्या मुलाला काही वेळ भेटत राहतो, अर्थात बायको आणि सासूच्या अपरोक्ष.

त्याच्याकडे एक ब्रिफकेस आहे, ज्यात एका पुस्तकाची एकुलती एक स्क्रिप्ट आहे. याचं पुस्तक झालं तर लेखक म्हणून स्थिर तर होता येईलच शिवाय नवरा आणि बाप म्हणून नव्याने जगायचा मार्ग मिळेल ही भाबडी अपेक्षा घेऊन, एका पब्लिशरला मेल करण्यासाठी तो सायबर कॅफेमध्ये जातो आणि कॅफेच्या मालकाकडे एका गुंडाने दिलेल्या पैश्याच्या बॅगेसोबत स्क्रिप्टची बॅग बदलली जाते. तिकडे पैश्यांची बॅग मिळवण्यासाठी कॅफे ओनर 'मोहन'च्या मागे गुंडांचा ससेमिरा सुरू होतो.

कॅफे ओनर मोहनला पैश्याची बॅग हवी असते आणि सिद्धार्थला स्क्रिप्टची बॅग असं सरळसरळ समीकरण दिसत असलं तरी माणसाच्या मेंदूतील सर्वच मिळवू इच्छिणारे किडे इथे वळवताना दिसतात.

पैश्याने भरलेली बॅग हातात आल्यावर सिद्धार्थ एकवेळ भांबावतो. एकीकडे त्याच्या नव्या बुकची स्क्रिप्ट आणि दुसरीकडे पैश्याने भरलेली बॅग. त्याच्यातला लेखकही जागा होतो, बापही आणि इच्छा-अपेक्षांनी भरलेला हावरट माणूसही. त्याला पैसे, स्क्रिप्ट आणि मुलगा सर्वच हवं असतं आता.

सिद्धार्थ नकली नोटा मिसळून मोहनकडून स्क्रिप्ट मिळवतो आणि पार्कमध्ये भेटायला आलेल्या मुलाला घेऊन पळून जायच्या बेतातही असतो. तिकडे मोहन गुंडापासून वाचण्यासाठी पैसे (?) घेऊन बहिणीला घेऊन निघून जायच्या प्रयत्नात आहे, त्याने सिद्धार्थला दिलेली स्क्रिप्टही अर्धवट आहे. जाळली गेल्यामुळे त्यातली बरीचशी पाने मोहनने झेरॉक्स काढून लावली आहेत. दोघेही एकमेकांना फसवतायेत आणि दोघांनाही याचा गिल्ट आहे, पण दोघांचाही नाईलाज आहे.

दोघे रेल्वे स्टेशनला आले आहेत, आपापल्या परीने पळून जाण्यासाठी. दोघांना वाटतंय आपल्याकडे पैसा आहे आणि तो जगण्यासाठी पुरेसा आहे.

तिथे दोघांची नजरानजर प्लेटफॉर्मवर होते. मोहन कुठल्याश्या ट्रेनमध्ये बसून बहिणीला घेऊन गावी चालला आहे, त्याच्याकडे असलेल्या बॅगेतल्या खोट्या पैश्याच्या भरवश्यावर.

एका प्रसंगात सिद्धार्थची अर्धवट स्क्रिप्टही हरवून जाते आणि त्याला हेही जाणवते की मुलाला पळवून नेऊन आपण खूप मोठी चूक करतोय. तो पैश्याची बॅग सोडून देतो आणि गुपचूप माघारी पार्कमध्ये त्याला मोलकरणीकडे सुपूर्द करून निघून जातो. आता त्याच्याकडे काहीच शिल्लक नाहीये, ना स्क्रीप्ट ना मुलगा आणि ना पैसा.

सिद्धार्थ रॉयचा रोल रजत कपूरने जगल्यासारखा निभावलाय. लेखकाची निराशा आणि बापाची हतबलता त्याने फक्त एक्सप्रेशन्सने दाखवून दिली आहे. सचिन नायकचा शांत, संयमी, हतबल आणि काहीसा आक्रमक मोहनही ठीकठाक आहे.

प्रयास गुप्ताचा दिग्दर्शनाचा पहिला प्रयत्न नक्कीच स्तुत्य आहे. चित्रपट छोटा आहे म्हणून कंटाळवाणा वाटत नाही. एंटरटेनमेंटच्या अपेक्षेने पाहणार असाल तर पाहू नका. पण, एक वेगळा प्रयत्न, हटके विषय, रजत कपूरची जादूई नजर आणि एक्सप्रेशन्स आणि माणसांची इच्छांच्या मृगजळाच्यापाठची धावपळ यासाठी एकदा हा फास्ट कॉम्पॅक्ट थ्रिलर (म्हणता येईल) नक्कीच पाहण्यासारखा आहे.

- राज जाधव (१४-०७-२०१७)

Comments

Popular Posts