स्पिकिंग फ्रेम्स: सुनता है मेरा खुदा..


मेजर जयदेव (अनिल कपूर) एक महत्वाचं मिशन फत्ते करून आपल्या शहरात परत आला आहे. शहर त्याच्या स्वागताला सज्ज आहे. सगळ्या लोकांच्या घोळक्यात अंजली (माधुरी दिक्षित) त्याची वाट पाहतेय, पण त्याला गर्दीने वेढलेले आहे. अंजली त्याला हातवारे करत आहे, हाका मारत आहे, पण त्याचे लक्ष नाहीये. त्याच संध्याकाळी त्याच्या सन्मानार्थ एक छोटासा कार्यक्रम कम पार्टी (ज्यादा 🙊 sorry, couldn't resist) आयोजित केली आहे. तिथं अंजली एक डान्स परफॉर्मन्स करते. तिची नजर जयवर अनेकदा खिळते. तिच्या चेहऱ्यावर दिसणारा आनंद, मोजदाद करता येईल याच्या पलीकडचा आहे. जय! तिचं लहानपणीपासूनचं प्रेम. एकत्र खेळले, वाढले, एकाशिवाय दुसऱ्याचं पान हलत नाही, अशी परिस्थिती. जयच्या आई-वडिलांनी तर तिला केव्हाच सून मानलं आहे. पण... हा 'पण' असल्याशिवाय, कुठलीच प्रेमकहाणी पूर्ण होत नाही. असो.

पण... या सगळ्यांपासून अनभिज्ञ असणाऱ्या जयची नजर मात्र त्या पार्टीत खिळली आहे ती पुजावर (नम्रता शिरोडकर). पूजा, एका रिटायर्ड आर्मी ऑफिसरची मुलगी, तिच्यावर सदैव तिच्या इनसेक्युर आईचा पहारा. मॉडेलिंगमध्ये आवड असणारी, देखणी आणि मोहक पूजा. का कुणी तिच्या प्रेमात पडू नये? जय आणि तिची ओळख होते, मैत्री वाढते, मैत्रीचं प्रेमात रूपांतर होतं आणि एक दिवस तो त्याच्या आई-वडिलांना त्यांच्या लग्नाच्याबाबतीत पुसटसं बोलून टाकतो. आई-वडील, ती मुलगी अंजली असल्याचे गृहीत धरतात आणि 'जयने तुमच्या लग्नाविषयी आमच्याकडे विषय काढलाय' हेही अंजलीला सांगतात. जे स्वप्न ती आयुष्यभर पाहत होती, ते आता सत्यात उतरतंय, हा विचार करूनच ती वेडी होते. नेमके, याच वेळी तिकडे जय, पूजाला त्यांच्या लग्नाबद्दल तो आई-वडिलांशी बोलला असल्याची खुशखबर सांगतो.

ही सगळी प्रस्तावना देण्याचं कारण म्हणजे त्याशिवाय जे सांगणार आहे त्याची लिंक लागणार नाही. या पार्श्वभूमीवर सुरू होतं.. 'सुनता है मेरा खुदा..' हे बेमीसाल गाणं. मजरूह साहेबांचे शब्द आणि रहमानचं जादुई संगीत याला स्पेशल बनवतंच, पण या गाण्यात सगळ्यात जास्त काही मनमोहक काही असेल तर ते म्हणजे माधुरीचे स्लो मोशन मध्ये घेतलेले कलरफुल आणि सिनेमॅटिकली ब्रिलियंट मोंटाजेस आणि त्याच्या बॅकग्राऊंडमध्ये एकसंध वाजत राहणारा एक आलाप. ती धुन, तो स्लो मोशनचा इफेक्ट आणि त्यावर कहर म्हणजे माधुरीच्या चेहऱ्यावर उमटलेली असीम आनंदाची अनुभूती आणि त्याला सुटेबल तिची बॉडी लँग्वेज. तिला त्या बातमीने दिलेला आनंद या सगळ्यात परफेक्टली सम-अप झाला आहे. या सगळ्याचा एकत्रित इफेक्ट इतका भन्नाट झाला आहे की त्याला तोडच नाही.

तसं पाहिलं तर हे गाणं जय आणि पुजाचं आहे, म्हणतातही तेच, शिवाय शब्दही त्यांनाच अनुसरून आहे. पण, गाणं सुरू होतं आणि संपतंही मुळात माधुरीवर आणि प्रत्येक कडव्यानंतर आपल्याला तीचं दर्शन होत राहतं. जणू काही गाण्याचा आत्मा तीच आहे. ज्याने हे गाणं पाहिलं नाहीये त्यांना माधुरीचा पार्ट एडिट केला तर गाण्यात काहीतरी मिस आहे असं वाटण्याची अजिबात शक्यता नाहीये, असंही एक वेळ म्हणता येईल. पण, खरं तर त्या मधल्या पार्टसमध्ये दिसणारी माधुरी, तिचे एक्सप्रेशन्स आणि त्यातून ओसंडून वाहणारा तिच्या अत्युच्च आनंदाचा सोहळा हे सगळं पाहताना त्या गाण्यात तिच्या निखळ आणि नैसर्गिक सौंदर्याचा अर्क उतरतो, जो गाण्याला एका अफाट उंचीवर नेऊन ठेवतो.

- राज जाधव (१२-०७-२०१९)

Comments

Popular Posts