लुटेराची सहा वर्षे


"क्या लिख रही हो? कोई कहानी लिख रही हो?"

"हम्म.."

"क्या कहानी?"

"बस, कहानी है"

"लड़का है कहानी में..?"

".....!"

"और एक लड़की..?"

"हम्म.."

"दोनो प्यार करते है एक दूसरे से..?"

"नही.."

"प्यार में पड़नेवाले है..?

"पता नही..."
......
..

काही सिनेमे उगाचच मनात घर करून राहतात. त्यात काय विशेष जादू आहे, हे सहज सांगता येत नाही, शिवाय ते का आवडतात याचं नेमकं कारणही कळत नाही. पण त्याची प्रत्येक फ्रेम मनात कुठेतरी कोरलेली असते आणि प्रत्येक पाहण्यात ती अधिकच स्वच्छ आणि नितळ होत जाते.

'लुटेरा', हा असाच एक नितांतसुंदर अनुभव आहे. १९५० च्या आसपासचा काळ. बंगालच्या कुठल्याश्या भागात माणिकपूर नावाचं एक गाव. तिथला एक धनाढ्य जमीनदार. त्याची जीव की प्राण असलेली एकुलती एक मुलगी 'पाखी'. नावाप्रमाणे स्वच्छंदी, अल्लड अशी. एके दिवशी अचानक, अपघाताने तीचा सामना वरुणशी होतो. वरुण पुरातन खात्यातर्फे काही कामानिमित्त पाखीच्या जमीनदार बापाकडेच येतो आणि त्या दोघांत हळुवारपणे प्रेम फुलत जाते, पण नियतीला हे मान्य नसतं. सगळं काही एखाद्या परिकथेसारखं चालू आहे, असे वाटत असतानाच, कथा एक अनपेक्षित वळण घेते आणि त्या दोघांची ताटातूट होते. पुढे त्यांची पुन्हा भेट होते, पण मधल्या काळात पुलाखालून बरंच पाणी वाहून गेलेलं असतं. ओढ, अपेक्षा, प्रेम, धोका, विरह, आत्मीयता, निस्वार्थता आणि पुन्हा प्रेम अश्या वेगवेगळ्या कसोटींवर हे प्रेम फुलत जाताना आपल्याला दिसतं आणि आपण त्या प्रवासात इमोशनली स्तब्ध होतो, वेडावून जातो. या सिनेमात अश्या अनेक फ्रेम्स आहेत ज्यावर जीव ओवाळून टाकावासा वाटतो, रादर असंख्य.

आवडत्या लव स्टोरीजचा उल्लेख करायचा झाल्यास, माझ्यासाठी 'लुटेरा' सदैव वरच्या स्थानावर राहील. रणवीरने  साकारलेला वरूण श्रीवास्तव सुरुवातीला शांत, सुसभ्य आणि कुणीही प्रेमात पडावं असा राजबिंडा तरुण सेकंड हाफनंतर अचानक नाण्याच्या दुसरी अनभिज्ञ बाजू समोर यावी तसा भासतो. वरुण श्रीवास्तव हा त्याचा आजवरचा सर्वोत्तम परफॉर्मन्स असेल. तीच गोष्ट सोनाक्षीची. सुरुवातीला ती या गोष्टीत मिसफिट वाटेल, अशी शंका येत असताना, तिचा पडद्यावरचा सहजसुंदर वावर चकित करण्यासारखा आहे. पाखी हा रोल जणू तिच्यासाठीच लिहिला आहे, इतकी कंविन्सिंग ती वाटते.

ओ. हेन्रीच्या 'दि लास्ट लिफ' या लघुकथेवर आधारित असलेली ही तरल प्रेमकथा विक्रमादित्य मोटवानेने अत्यंत खुबीने पडदयावर साकारली आहे. रणवीर-सोनाक्षीसोबतच, अमिताभ भट्टाचार्यचे काळाला आणि विषयाला अनुसरून लिहिलेली गीते आणि अमित त्रिवेदीचं साजेसं संगीत, कथेला चार चाँद लावतात.

ही हळवी, निरागस फिल्म, एक अविस्मरणीय अनुभूती आहे. एक अनामिक अस्वस्थता आणि हुरहूर जाणवत असताना सुद्धा एखादी आनंदाची लकेर चेहऱ्यावर सोडून जाणाऱ्या काही मोजक्याच कलाकृती असतात, 'लुटेरा' अगदी तशीच फिल्म आहे.

- राज जाधव (०५-०६-२०१९)

#6_Years_Of_Lootera

Comments

Popular Posts