इस्त्रायल-पेलेस्टाईन वादावर नेमके भाष्य करणारी सिरीज, फौदा


'इस्रायल - पेलेस्टाईन वाद' हा इतिहास पूर्णपणे स्वतंत्र अभ्यासाचा विषय आहे. या विषयावर अगदीच जुजबी माहिती असल्याने मी सुरुवातीला आंतरजालावरून काही  माहिती गोळा केली, जी इथे देत आहे. बऱ्याच ठिकाणी घटनाक्रम वेगवेगळे असल्याने याबद्दल साशंकता असल्यास मला दुरुस्त करावे.

आता मूळ मुद्दा, ही माहिती वाचण्याचे कारण. कारण आहे, इस्रायल - पेलेस्टाईन वाद हा संघर्ष मध्यवर्ती ठेवून बनवण्यात आलेली नेटफ्लिक्सवरील एक सिरीज, 'फौदा' (Fauda). फौदा या अरेबिक भाषेतील शब्दाचा अर्थ आहे 'गोंधळाची परिस्थिती' (इंग्रजीत Chaos).

'फौदा'बद्दल बोलण्याआधी या वादाबद्दल नेटवर सापडलेले काही ठळक मुद्दे बॅकग्राऊंड म्हणून पाहूया.

१९१७ मध्ये बालफोर डिक्लेरेशनच्या अंतर्गत ब्रिटिश सरकारने पेलेस्टाईनमध्ये ज्यू समूहासाठी स्वतंत्र राष्ट्र असावे, असे घोषित केले. १९३० च्या दरम्यान हिटलरने ज्यू लोकांचा अमानुष छळ करून त्यांच्या कत्तली करण्यास सुरुवात केली होती. १९ व्या शतकातच झायोनिस्ट चळवळ सुरू झाली आणि ज्यू लोकांनी पेलेस्टाईनमध्ये स्थलांतर करून, स्थापित व्हायला सुरुवात केली. अखेर १९४८ मध्ये संयुक्त राष्ट्रसंघाने पेलेस्टाईनची फाळणी करून ज्युईश राष्ट्र (इस्त्रायल) आणि अरब राष्ट्र (पेलेस्टाईन) बनवण्याचे मत मांडले. अरबांचा याला प्रचंड विरोध होता, तरीही अखेर १४ मे, १९४८ ला इस्त्रायलचा उदय झाला.

पॅलेस्टाईन प्रदेशामध्ये स्थित इस्त्रायल हा एकमेव ज्यूईश देश आहे. याच प्रदेशात गाझा पट्टी व वेस्ट बँक हे दोन पॅलेस्टिनी भूभागही आहेत. या दोन भूभागात पेलेस्टिनी अरबी लोकांचे वास्तव्य आहे, ज्यांच्यातर्फे या भूभागांचे मिळून सार्वभौम पॅलेस्टाईन राज्य स्थापण्यात यावे, अशी मागणी गेले अनेक वर्षे करण्यात येत आहे. पॅलेस्टाईन राज्य म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या वादग्रस्त पॅलेस्टिनी राज्यावर सध्या पॅलेस्टिनी राष्ट्रीय समितीची सत्ता आहे.

इस्त्रायल देश स्वतंत्र होऊन ७० वर्षे उलटूनही, तो पेलेस्टिनी अरब आणि इस्रायली ज्यू यांच्यातील अंतर्गत संघर्षातून अजूनही भळभळत आहे. जेरुसलेम राजधानी, निर्वासितांचा प्रश्न, अधिकार आणि सार्वभौमत्वाचा मुद्दा हे प्रश्न अजूनही अनुत्तरीतच आहेत. हमास या सुन्नी इस्लामवादी आणि लष्करी दृष्ट्या ताकदवान असलेल्या जहालवादी संघटनेने गाझा पट्टीचा प्रदेश आपल्या ताब्यात मिळवला आणि इस्त्रायल सरकारच्या विरोधात आतंकवादी कारवाया सुरू केल्या. आजवर अश्या अनेक कारणांमुळे, इस्त्रायल आणि पेलेस्टाईन यांच्यामध्ये कायमच एक तणावाचं वातावरण राहिलं आहे.

या पार्श्वभूमीवर ही सिरीज सुरू होते.

डोरॉन (Lior Raz) हा इस्रायल डिफेन्स फोर्स (आय. डी. एफ.) मधून रिटायर होऊन आपल्या फॅमिलीसोबत वाईनयार्डचा व्यवसाय पाहत आहे. एके दिवशी त्याला खबर मिळते की, ज्या 'हमास'च्या म्होरक्याला, त्याने आणि त्याच्या टीमने अठरा महिन्यांपूर्वी ठार मारले आहे तो तौफिक हमद (Hisham Suliman) उर्फ पँथर उर्फ अबू अहमद अजूनही जिवंत आहे आणि आपल्या भावाच्या लग्नात सामील होण्यासाठी येणार आहे. त्याला पुन्हा जेरबंद करण्यासाठी डोरॉनची टीममध्ये वापसी होते आणि इथून पुढे सुरू होतो एक भन्नाट लपंडाव. सिरीज जसजशी पुढे सरकत जाते, एक एक पात्र नव्याने आपल्यासमोर येते आणि त्याभोवती कथा पुढे सरकत जाते. सिरीज कुठेही कंटाळवाणी वाटत नाही. सिरीज मोस्टली फास्ट पेस्ड आहे, जिथे ती संथ होते तिथेही सतत काहीतरी टेन्शन बिल्ट झालेले असल्याने, त्यावरची पकड कुठेही सैल होत नाही.

अबू अहमदबद्दल एक एक लीड मिळत जाणे, डोरॉन आणि टीमने त्याचा पाठलाग करत त्याच्या अगदी जवळ जाणे आणि हातातोंडाशी आलेला घास निघून जाणे, हे अनेकदा घडते आणि आपली उत्सुकता शिगेला पोहोचते. दरम्यान आय. डी. एफ. च्या तावडीतून वाचता वाचता अबू अहमद, आपल्या साथीदार वलीद (Shadi Mar'i) सोबत काहीतरी मोठी कारवाई करायच्या बेतातही असतो. पहिला सिझन हा अबू अहमदचा मागोवा घेण्याचा प्रवास आहे. तो त्याच्या इराद्यात सफल होतो की नाही, हे पाहणेच जास्त योग्य ठरेल.

दुसरा सिझन सुरू होण्याआधी, पहिला सिझनच्या फिनाले मध्ये काय झाले हे सांगणे जितके गरजेचे आहे, तितकेच चुकीचेही. स्पोईलर टाळण्यात मजा आहे, म्हणून इथे ते सांगत नाही. पण दुसरा सिझनही तितकाच उत्कंठावर्धक आणि नेल बाईटिंग झाला आहे. पहिल्या सिझनमध्ये असणारे चित्तवेधक कारनामे इथेही घडताना दिसतात. या सिझनमध्ये वलीदचे ट्रान्सफॉर्मेशन आणि अल मकदेसी या नवीन आतंकवाद्याचा शोध हा बेसिक धागा आहे, त्याभोवती अनेक घटना घडत राहतात. या सिझनमध्येही शेवटपर्यंत एज ऑफ दि सीट ड्रामा आहे. काही सरप्रायजिंग एलेमेंट्स असे आहेत, जे सांगण्यापेक्षा प्रत्यक्षात पाहिल्यास सिरीज अधिक रंजक वाटेल.

दोन्ही सिझनमधील थ्रिलर कंटेंट, उंदरा-मांजराच्या पाठलागीचा खेळ, काही शॉकिंग ट्रीटमेंट्स, डिफेन्स फोर्सच्या छुप्या कारवाया, सायकॉलॉजीकल टॅक्टिक्स, दोन्ही बाजूंचे परिवार, त्यांची घुसमट, इमोशनल ड्रामा, पेलेस्टाईनी आणि इस्रायली यांच्यातील अंतर्गत वाद-विवाद, राजकीय परिस्थिती आणि त्याचे ऑपरेशनवर होणारे परिणाम, या सगळ्याचा एकत्रित परिणाम अप्रतिम साधून येतो. आय. डी. एफ. टीमचा साथीदार, कॅप्टन अयुब (Itzik Cohen) या इसमाने शांत डोक्याने, समोर बसलेल्या माणसाला नेमक्या इमोशनल आणि मानसिक कात्रीत अडकवून, इंटेरोगेट करून माहिती गोळा करण्याचे कसब कमालीचे जमवले आहे. पहिल्या सिझनमध्ये डोरॉन, अबू अहमद, डॉक्टर शिरीन (Laetitia Eido) आणि कॅप्टन अयुब तर दुसऱ्या सिझनमध्ये अल मकदेसी (Guess Nassar) आणि वलीद ही पात्रे आपली छाप पाडतात

डोरॉन साकारणारा Lior Raz आणि Avi Issacharoff यांनी एकत्रितपणे ही कहाणी साकारण्याचं त्यांचं स्वप्न सत्यात उतरवलं. लिऑरने तरुणपणात आय.डी. एफ चा ऑफिसर असल्याने, यातला बराचसा कंटेंट त्याच्या आजूबाजूला घडलेला आहे. सर्वात महत्वाचे, ही इस्रायली सिरीज असूनही पेलेस्टाईन अरबी लोकांच्या भूमिकांनाही तितकाच न्याय देण्यात आला आहे. विशेषतः त्याचे परिवार आणि त्यांचा त्यांच्याशी असणारा इमोशनल कनेक्ट बऱ्याचदा अधोरेखित होतो, अर्थात तो त्यांना त्यांच्या उद्देशापासून परावृत्त करू शकत नाही, हा भाग वेगळा. यामुळेच कदाचित या सिरीजला इस्त्रायलइतकाच पेलेस्टाईन लोकांकडूनही पॉझिटिव्ह रिस्पॉन्स मिळाला आहे.

फाऊदाचा तिसरा सिझन २०१९ मध्ये येतोय आणि तोही तितकाच लाजवाब असेल याची खात्री आहे. आतुरतेने वाट पाहतोय. तूर्तास, पहिले दोन सिझन्स हायली रेकमेंडेड आहेत, नक्की पहाच.

- राज जाधव (१६-०६-२०१९)

Comments

Popular Posts