नादान परिंदे, घर आजा


मागच्या काही दिवसांत 'झिरो' आणि 'मोहल्ला अस्सी' हे दोन चित्रपट पाहिले आणि पाहिल्यानंतर काही गोष्टी प्रकर्षाने जाणवल्या.

भलं बुरं, कसंही असो, नव्वदचं दशक कोळून प्यायलेली जमात आपली. त्या काळात आलेला, गेलेला कोणताही चित्रपट पाहणे हा आपला धर्म असल्यासारखे सिनेमे पाहिलेत. शाहरुख खान आणि सनी देओल या दोघांचाही नव्वदच्या दशकावर तितकाच प्रभाव आहे.

शाहरुख खान! लवर बॉय म्हणून एस्टॅब्लिश होण्याआधी, होत असताना आणि काहीसा त्यानंतरही, त्याने एक अभिनेता म्हणून खूप काही दिलं. सर्कस आणि फौजीमध्ये दिसणारा छोकरा, जेव्हा चित्रपटात आला, तेव्हा कुणाला वाटलं असेल की तो पुढचा सुपरस्टार होईल? पण त्याने ते स्वतःच्या मेहनतीने घडवून दाखवलं. अनेक जण रोमँटिक शाहरुख खानच्या प्रेमात असतील. शाहरुख म्हटलं की हात फैलावून उभा राहणारा राज किंवा राहुल बॅकग्राऊंड म्युझिकसहित दिसेल त्यांना, पण अभिनेता म्हणून तो नव्वदच्या दशकातील 'कभी हा कभी ना' चा सुनील, 'राजू बन गया जेंटलमन'चा राजू, 'यस बॉस' चा राहुल, 'दिल से' चा अमरकांत म्हणूनच अधिक भावला (यात जाणूनबुजून बाजीगर, डर, अंजामचे उल्लेख टाळले आहेत, ती एक वेगळीच लेव्हल आहे). नव्वदचं दशक संपल्यानंतर तो पूर्णतः रोमँटिक चित्रपटांकडे वळल्यात जमा असतानाच 'हे राम' मध्येही त्याने चकित केले.

त्यानंतर आला 'स्वदेस', ज्याने पुन्हा एकदा सुपरस्टार शाहरुख नव्हे तर अभिनेता शाहरुखची ओळख करून दिली. स्वदेस किंवा मोहन भार्गव यांचा उल्लेख झाला तरी स्वदेसची सिग्नेचर ट्यून कानात वाजत राहते. नासाचा सायंटिस्ट म्हणून त्याची एक छबी डोळ्यासमोर उभी राहते. संपूर्ण चित्रपटात एका साध्यासुध्या शाहरुखची छाप जाणवते, जी त्या व्यक्तिमत्त्वाच्या अजूनच मोहात पाडते.

सनी देओल! तसा त्याचा उगम ऐंशीच्या दशकातला. ऐंशीच्या दशकात अन्यायाला वाचा फोडणारी तरुणाई पडद्यावर हळू हळू दिसू लागली होती. 'अर्धसत्य' मधला अनंत वेलणकरने याचा पाय रचला. राहुल रवैलचा 'अर्जुन' त्याचंच एक्शटेन्शन म्हणता येईल. पुढे, एन. चंद्राने 'अंकुश' आणि 'तेजाब'मध्ये आणि रामुने 'शिवा'तही हा वारसा पुढे चालवला.

'बेताब', 'सनी', 'सोहनी महवाल' वगैरे चित्रपटानंतर सनीला 'अर्जुन' मध्ये त्याची खरी वाट गवसली. यातला शांत, संयमी आणि केवळ डोळ्यांनी बोलणारा अर्जुन मालवणकर लोकांना आवडला.

नव्वदचे दशक सुरू झाल्यानंतर, अमिताभ बच्चनची जादू ओसरत आलेली असताना, अँग्री यंग मॅन ही खुर्ची रिकामीच राहते की काय अशी शंका येत असतानाच, 'घायल'च्या अजय मेहराने त्याच्या दणदणीत आवाजाने ती कसर भरून काढली. तीही अशी की नव्वदच्या दशकात बालपण गेलेल्या प्रत्येकाच्या कानात अजूनही 'बलवंत राय' घुमत आहे, प्रत्येक संवाद तोंडपाठ आहे.

राहुल रवैलने ज्या सनीला डोळ्यांनी बोलायला शिकवले त्याला राजकुमार संतोषीने, 'घायल'मध्ये डोळ्यांसोबत आवाजही दिला, 'दामिनी'मध्ये ढाई किलोचा हातही दिला, आणि 'घातक'मध्ये दिला काशीसारखा जिगरा, जो कातीयाच्या कंपूत जाऊन त्याला चॅलेंज करू शकत होता. आजही आमच्या पिढीत असे अनेक जण आहेत ज्यांच्यासाठी घातकचा काशी एक इमोशन आहे आणि अखंड राहील.

पण, काय दुर्दैव! आपणच अजरामर केलेल्या पात्रांना काही वर्षांनी त्यांनी स्वतःच्या हातानेच गालबोट लावावं. योगायोगाने झिरोमध्येही शाहरुखचं पात्र स्वदेसप्रमाणे स्पेसशी रिलेटेड आहे, पण ज्या इमानदारीने, साधेपणाने त्याने मोहन भार्गव उभा राहिला, झिरोमधील पात्र त्याच्या अगदीच विरुद्ध म्हणता येईल. चित्रपटभर बालिश चाळे करणारा शाहरुख आणि कथाही लॉजिकली आणि लिटरली शून्य, असा प्रयत्न. नाही म्हणायला शाहरुखची मेहनत आहे, पण तरीही पात्र प्रभावहीन.

असाच योगायोग मोहल्ला अस्सीमध्येही आहे. यातही सनी देओलचं पात्र गंगेच्या किनारी राहणारं असतं, ब्राह्मण, संस्कृत शिकवणारं, तरीही सनीपाजीच्या व्यक्तिमत्वाला अजिबात न शोभणारं. तो जेव्हा **डीके म्हणतो, तेव्हा असह्य वाटतं. सनीला कुणाला शिवी द्यायची गरजच काय? एक जळजळीत नजर किंवा जास्तीत जास्त एक बोट दाखवून 'ओये' आणि गरज पडली तर आरडाओरड आणि मारामारी, बस्स.

जसा, नासामध्ये सायंटिस्ट असणारा तरीही आपल्या मातीशी, जवळच्या नात्यांशी नाळ जोपासणारा मोहन भार्गव हा हृदयाच्या खूप जवळचं व्यक्तिमत्व आहे, तसाच गंगेच्या किनारी राहणारा, बापाची स्वतःच्या जिवापेक्षाही काळजी करणारा काशीही. ही फोन पात्रे अजरामर आहेत आणि सदैव राहतील.

सांगायचा मुद्दा हा की, प्रत्येक गोष्टीचं एक वर्तुळ असतं, आणि ते पूर्ण होत आलं की देव एक संकेत देतो. एखादी गोष्ट जिथून सुरू होते कालांतराने तिथेच येऊन थांबते. तीच गोष्ट कधी तुमच्यासाठी सर्वस्व घेऊन येऊ शकते, तर काही काळाने सगळं काही नाहीसं देखील करू शकते. काळाचा रथ चालू राहतो, त्यातले प्रवासी बदलत राहतात, आपण कितीही अट्टाहास केला तरी एक वेळ अशी येते की काळ आपल्याला बाहेर फेकून देतो. त्याआधी आपणच आपला मुक्काम ठरवावा आणि स्वतःहून स्वखुशीने उतरावं. प्रवास किती वेळ झाला यापेक्षा, किती आनंदी झाला, याला जास्त महत्व आहे.  जबरदस्तीने कंटाळवाणा प्रवास करण्यापेक्षा, झाल्या तेवढ्या प्रवासाच्या सुखद आठवणी सोबत घेऊन वेळीच प्रवास थांबवावा.

- राज जाधव (१२-०३-२०१९)

Comments

Popular Posts