खिळवत ठेवणारा 'अंधाधून'


बऱ्याच दिवसात एक जबरदस्त थ्रिलर पहायला मिळाल्याचं समाधान 'अंधाधून' देतो.

श्रीराम राघवन डिटेलिंगवर प्रचंड मेहनत घेतो, ज्याचा पडद्यावर एकत्रित परिणाम भन्नाट दिसतो. लोकेशन असो, बिल्डिंग्स, रस्ते, लिविंग-नॉन लिविंग एलीमेंट्स, मेटाफर्स असोत, एखाद्या महत्वाच्या गोष्टीकडे जाण्याकरिता वापरलेले छोट्या छोट्या घटनांचे, संवादाचे बांधलेले पूल असोत, चपखलपणे वापरलेले आणि कुठेही अतार्किक न भासणारे धक्कातंत्र असो, त्या सोबतीला आणि एकंदरच संपूर्ण चित्रपटात प्रभावीपणे वापरलेले बॅगराऊंड म्युझिक आणि साउंड डिझायनिंग असो, सत्याशी जवळीक साधणारी पात्रे आणि त्यांचे अनप्रेडिक्टेबल वागणे असो. या सर्व पात्रांना घेऊन डार्क कॉमेडी आणि कॉम्पॅक्ट थ्रिलर या दोन्ही जॉनरची तारेवरची कसरत करत, हे सारे निओ न्वारचे रंग एका मर्डर मिस्टरीच्या पॅलेटवर घेऊन राघवन कधी हलक्या, कधी गहिऱ्या तर कधी ग्रे शेड्सच्या रेघोट्या मारत जातो; फ्रेममध्ये फायनली कोणतं चित्र चितारलं जाणार आहे, याची आपल्याला कसलीही कल्पना न देता.

पण उत्सुकता ताणत अखेरीस काहीतरी भन्नाट पाहायला मिळणार याची प्रचिती तुकड्या तुकड्यात जोडलेले संदर्भ शेवटी एका फ्रेममध्ये आपसूक फिट होतात तेव्हा येते. यातही तो त्या फ्रेममधील संपूर्ण चित्र आपल्याला दाखवत नाहीच. त्याने आधीच ठरवलेले असते की समोरच्याला काय दाखवायचे, शिवाय कोणत्या गोष्टी उलगडून सांगायची गरजच नाहीये, तर कुठल्या गोष्टी प्रेक्षकांच्या कल्पनाशक्तीवर तरंगत सोडून द्यायच्या.

अभिनयाबद्दल बद्दल बोलायचं तर ट्रेलर पाहिल्यापासून तब्बूच्या पात्राकडून ज्या अपेक्षा होत्या, ती त्याच्याही पलीकडे जाऊन चकित करते. हैदरनंतर ती पुन्हा एकदा एक जबरदस्त परफॉर्मन्स देते. पहिल्या सीनपासून ती तुमच्यावर ताबा मिळवते आणि चित्रपट संपता संपता एक वेगळीच उंची गाठते. ही जुनी वाईनची बॉटल दिवसेंदिवस अधिक नशीली आणि स्वास्थ्यासाठी पहिल्यापेक्षा अजूनच अपायकारक होत चालली आहे.

दुसरे नाव, अर्थातच आयुषमान खुराणा. हा स्वतःच्याच परफॉर्मन्सला ओव्हरटेक करत, प्रत्येक येणाऱ्या चित्रपटागणिक पहिल्यापेक्षा अधिक सरस होत चालला आहे, असे वाटते. अंधाधूनमधील हा रोल दीर्घकाळ स्मरणात राहणारा आणि त्याच्या कारकिर्दीतील एक उल्लेखनीय रोल म्हणून नक्कीच गणला जाईल. अंध व्यक्तीच्या रोलसाठी आणि पियानो शिकण्यासाठी घेतलेली त्याची मेहनत दिसून येते.

स्वतःच्याच प्रेमात पडलेल्या प्रमोद सिन्हाचे अनिल धवनने रंगवलेले, तब्बूच्या नवऱ्याचे पात्र हेही तितकेच नॉस्टॅलजीक वाटते. त्याला खऱ्या अनिल धवनच्या ७० च्या दशकातील चित्रपट, गाणी आणि रेफरन्सेसचा दिलेला तडका चित्रपटाला अजून रंजक बनवतो. अनिल धवनला या रोलसाठी कास्ट करणे म्हणजे खरोखर एक मास्टरस्ट्रोक आहे.

मानव कौल या दमदार अभिनेत्याची एन्ट्रीही तितकीच दमदार आहे. पण कालांतराने, जसा चित्रपट पुढे सरकतो तसे त्याचे पात्र काही भागांत काहीश्या कॉमेडीच्या अंगाने जाते त्यामुळे त्याचा सुरुवातीचा दबदबा टिकून राहत नाही. शिवाय शेवट येईपर्यंत तब्बूच्या पात्रापुढे तो अधीकच फिका पडत जातो.

राधिका आपटेसाठी, दुर्दैवाने काहीही विशेष काम नाहीये. त्या जागी इतर कुणीही अभिनेत्री चालून गेली असती, इतका साधारण तो रोल आहे.

जाकीर हुसेन आणि अश्विनी काळसेकर यांचे छोटेसे पण महत्वपूर्ण रोल आहेत, ज्यात ते अर्थातच मजा आणतात. आयुषमानच्या घराशेजारचा छोटा मुलगा, मावशी (छाया कदम), रिक्षावाला यांच्यासोबतच मांजर आणि ससा ही देखील महत्वाची पात्रे आहेत आणि आपापली कामे, योग्य वेळी चोख बजावतात, शिवाय अमित त्रिवेदी नेहमीप्रमाणे त्याच्या संगीताने जादू भरतो.

डार्क कॉमेडीची झालर असलेला एक उत्तम थ्रिलर पहायचा असेल तर 'अंधाधून' चुकवू नका. हा चित्रपट श्रीराम राघवनच्या कारकिर्दीत आणि एकंदरच थ्रिलर चित्रपटांच्या यादीत वरच्या स्थानावर राहील.

- राज जाधव (८-१०-२०१८)

Comments

Popular Posts