मैं, मेरी पत्नी और इन्फेरियरीटी कॉम्प्लेक्स


कधी कधी सामान्य गणले जाणारे, महत्वाच्या आणि मोठ्या लांबीच्या भूमिकेसाठी दुर्लक्षित ठरलेले चेहरे, एखाद्या चित्रपटात पडद्यावर असा काही कमाल करून जातात, की त्या व्यक्तीला कास्टिंग करणाऱ्याला मनोमन सॅल्युट ठोकू वाटतो. सेहरमधील 'अर्शद वारसी' आणि सोनू की टिटू की स्वीटीमधील 'आलोक नाथ' व तत्सम कलाकारांच्या यादीत आज अजून एक नाव समाविष्ट करावे लागेल, 'मैं, मेरी पत्नी और वो' मधील 'राजपाल यादव'.

दिग्दर्शक चंदन अरोराला जो राजपाल यादव गवसला, तो क्वचितच कुणाला सापडला असेल. 'मैं, मेरी पत्नी और वो'च्याही आधी चंदनने त्याची नस 'मैं माधुरी दिक्षित बनना चाहती हुं' मध्ये पकडली होती. त्यातही तो अंतरा माळीच्या पात्रासमोर तेवढ्याच ताकदीने उभा राहिला. हाच सिलसिला पुढे 'मैं, मेरी पत्नी और वो'मध्ये दिसला.

मिथिलेश शुक्ला उर्फ छोटे बाबू, लखनऊ विद्यापिठात लायब्ररीयन आहे. मिथिलेश मध्यमवयीन, मध्यमवर्गीय, शांत, सुसंस्कारी, वक्तशीर, कामाच्या बाबतीत प्रामाणिक आणि शिस्तप्रिय आहे. एके दिवशी, स्वतःच्या इच्छेविरुद्ध तो आई आणि मामाच्या हट्टापायी बरेलीला लग्नासाठी स्थळ पहायला जायला तयार होतो. मुलीला नकार द्यायचा किंवा तिच्याकडून नकार घ्यायचा आणि माघारी यायचं, हे ठरवून तो जातो, पण वीना त्याला पहिल्या नजरेत आवडते. नाकीडोळी सुंदर असणारी वीना मिथिलेशपेक्षा बऱ्यापैकी उंचही असते. सर्वच बाजूने सरस असूनही आणि नकाराची अपेक्षा असताना, वीनाकडून होकार येतो. दोघांचे लग्न ठरते आणि पुढे होतेही.

पण इथून पुढे सुरू होते, स्वतःच्या ठेंगणेपणाबद्दल आणि बायकोच्या तुलनेत साधारण दिसण्याबद्दलची मिथिलेशची असुरक्षितता. ही असुरक्षितता कधी इतर लोकांच्या बोलण्या, वागण्यातून मिथिलेशला जाणवते तर कधी स्वतःच्या न्यूनगंडातून तयार होते आणि त्यातून बाहेर पडण्यासाठी मिथिलेश एकसे एक 'पैंतरे' आजमावतो.

सुरुवातीला, स्कुटरच्या सीटची हाईट वाढवून घेणे, दूधवाला, भाजीवाला, रिक्षावाला ही मंडळी बायकोशी जरा जास्तच हसतखेळत बोलत आहेत हे पाहता हळूहळू प्रत्येकाला पर्याय उपलब्ध करवून देणे, अश्या काही प्रसंगातून हलकेफुलके विनोदी वाटणाऱ्या मिथिलेशच्या करामती हळूहळू जेलसीपर्यंत पोचू लागतात. स्वतःच्या जिवलग मित्राबद्दल, सलीमबद्दलही तो असाच विचार करू लागतो आणि सलीमही बायकोपासून कसा दूर राहील यासाठीही शक्कल लढवतो.

पण, पुढे परिस्थिती अजूनच बिकट होणार असते, याची त्याला कल्पना नसते. या सर्व छोट्या छोट्या प्याद्यांना पटावरून हळू हळू दूर करत असताना, अचानक एके दिवशी मिथिलेशसमोर आकाश उभा राहतो, वीनाचा जुना मित्र. आकाश प्रत्येक बाबतीत मिथिलेशपेक्षा उजवा असतो. आकाश, दिसायला अगदी राजबिंडा नसला तरीही देखणा म्हणावा असा नक्कीच असतो. याशिवाय कॉन्फिडंट, स्टाईलबाज, फॉरेन रिटर्न्ड, चांगले कमवणारा आणि कमालीचा सेन्स ऑफ ह्युमर असणारा माणूस, ज्यावर कुणीही स्त्री आपला जीव ओवाळून टाकेल, असा. एकंदर, मिथिलेशला इन्फेरियरीटी कॉम्प्लेक्स देऊ शकेल, असा प्रत्येक गुण आकाशकडे असतो. तसा मिथिलेश, आकाशची स्टाईल कॉपी करण्याचा सर्वोतोपरी प्रयत्न करतो, पण तिथेही 'खुजा' वाटतो. अर्थात मिथिलेशचं सौंदर्य त्याच्या स्वभावात होतं, हे विसरून तो बाहेरच्या बेगडी दिखाव्याला भुलत असतो, हे फार उशिरा लक्षात येतं त्याच्या. अखेरीस इनसिक्युरिटी आणि जेलसीची जागा संशय घेतो आणि त्याचा संसार तुटण्याच्या मार्गावर येऊन उभा राहतो. शेवट थोडासा प्रेडिक्टेबल असला तरीही असाच हवा. तो काय आहे, हे पाहणेच योग्य ठरेल.

आकाशच्या रोलमध्ये केके मेनन उत्स्फूर्त आणि एनर्जेटिक वाटतो. रितूपर्णाही वीनाच्या भूमिकेत शोभून दिसली आहे.
अभिनयाच्या बाबतीत बोलायचे झाल्यास, हा चित्रपट पूर्णपणे राजपाल यादवचा आहे. त्याने साकारलेला मिथिलेश शुक्ला खूप संयत आणि नैसर्गिक वाटतो. परिस्थितीने आणि जबाबदारीने आयुष्य व्यापून टाकलेल्या, शिवाय लग्नाचे वय जवळपास ओलांडून गेलेल्या मिथिलेशला लग्नात काहीही स्वारस्य नसते. अश्यात वीनाचा होकार आल्यानंतर त्याला झालेला आनंद, लग्न ठरल्यानंतर कळत नकळत 'हूर के गले में अंगुर' टाईप मिळणारे टोमणे पचवताना जाणवणारी अगतिकता, लग्नाच्या फोटोत, स्कुटरवर आणि सोबत बाहेर जाताना आपण तिच्यासमोर ठेंगणे दिसू नये यासाठी तो करत असलेली धडपड, एरव्ही जास्त न बोलणारी माणसे आता केवळ आपल्यासोबत बायको आहे म्हणून बोलत आहेत ही तगमग, मित्र सलीम यांच्याबाबतीतही जेलसीची भावना आणि अखेरीस आकाश आयुष्यात आल्यावर बायकोला त्याच्यापासून दूर ठेवण्यात चाललेली त्याची घालमेल शिवाय आकाशसारखे वागण्याची त्याची केविलवाणी धडपड या सगळ्यात राजपाल यादवने कमाल केली आहे.

एका अतिसामान्य माणसाची असामान्य ही कथा, हलक्याफुलक्या पद्धतीने साकारली आहे, हे विशेष. आजवर अतरंगी आणि टिपिकल विनोदी भूमिका करणारा राजपाल यादव पाहिला असेल, फॉर अ चेंज, अभिनेता राजपाल यादवसाठी हा सिनेमा नक्की पहा.

- राज जाधव (१८-०८-२०१८)

Comments

Popular Posts