जगण्याचा आणि अस्तित्वाचा प्रवास, कारवाँ


'Karwaan' could have been far better. 

अपेक्षेच्या मानाने चित्रपट बराच सरळसोट आणि प्रेडिक्टेबल वाटला. पडद्यावरील प्रवासाने मनोरंजन झाले, शिवाय पात्रे, अभिनय आणि काही प्रसंग खूप आवडलेही, पण प्रवासात अजून काहीतरी घडायला हवे होते असे वाटले. कारवाँ, एक फिल्म म्हणून नक्कीच सुंदर आहे, मुख्य तिघांचे आणि इतर सहकलाकारांचे अभिनयही ज्या त्या जागी उत्तम, पण सर्वांचं एकत्र मिळून एक भन्नाट प्रॉडक्ट बनता बनता राहुन गेलं. अभिनयासोबतच दिग्दर्शन, छायांकन आणि संगीत यातही चित्रपट सरस आहे. पहायला हरकत नक्कीच नाही, पण खूप अपेक्षा नको.

प्रमुख तीन पात्रांबद्दल बोलायचे झाले तर, इरफानचा शौकत, हा मुळातच ह्युमरस असल्यामुळे जवळपास प्रत्येक संवाद हा त्याच्या टिपिकल आवाजातील पंच होऊन जातो. इरफानची सध्याची शारीरिक आणि मानसिक परिस्थिती पाहता त्याने आत्मविश्वासाने आणि तितक्याच ऊर्जेने केलेला हलकाफुलका रोल अजूनच आवडून जातो. इरफान खानचा प्रेमाचा अँगल मात्र थोडासा रिळकाढू वाटला, शिवाय तो कॉमेडीच्या अंगाने न जाता इमोशनली डेव्हलप झाला असता, तर वेगळी मजा आली असती. पण, इरफानचा पडद्यावरचा वावर, त्याची बोलण्याची शैली आणि डायलॉग डिलिव्हरी पाहणे ही नेहमीच एक ट्रीट असते.

दुलकर सलमान, मल्याळम सिनेमातील एक अग्रगण्य नाव असल्याने त्याला पाहण्याची उत्सुकता जास्त होती. दुलकरने साकारलेला अविनाशही चांगला जमून आला आहे. तरीही त्याची सध्याची मल्याळममधील फिल्मोग्राफी आणि त्याची क्षमता पाहता, त्याला हिंदीत पदार्पणासाठी यापेक्षा अजून चांगला प्लॅटफॉर्म मिळाला असता. एक इमोशनल अँगल सोडला तर, दुलकरचा त्याच्या वडिलांसोबतचा ट्रॅक हा तर बऱ्याच अंशी 'थ्री इडियट्स'मधील फरहानच्या (आर माधवन) ट्रॅकशी साधर्म्य दाखवणारा आहे. दुलकर अभिनयात कुठेही कमी पडला नाहीये. शांत, सुस्वभावी, कमी हसणारा, मोजके  बोलणारा आणि आवडत्या क्षेत्रात करियर करण्याची आवड असूनही वडिलांच्या इच्छेखातर नोकरी करणारा अविनाश त्याने देहबोलीतून नेमका उभा केला आहे. एकंदर या सगळ्यांचंच फ्रस्टेशन कायम त्याच्या चेहऱ्यावर दिसत राहतं.

मुरांबात न आवडलेली मिथिला पालकर, इथे खास वाटते. बिनधास्त आणि इंडीपेंडेंट टिनएजरच्या भूमिकेत ती सूट होते. तिचे, आई आणि आज्जीसोबतचे नाते अधिक खुलून यायला अधिक वाव मिळाला नसला, तरीही काही प्रसंगातून तिचा टिपिकल बेफिकीर युथ एटिट्युड दिसून येतो, ज्यामुळे कधी कधी, या स्वभावाच्या विरुद्ध असणाऱ्या अविनाशशी तिचे छोटे मोठे खटके उडतात, पण अखेरीस दोघांनाही एकमेकांच्या बाजू पटतात.

मुळात, ज्या उद्देशासाठी ही रोड ट्रिप आखली जाते, तो उद्देश पाहता, यात एन्जॉयमेंट अपेक्षित नव्हतीच. अर्थात, प्रत्येक रोड ट्रिप एक्सायटिंगच असायला हवी, हा अट्टहास बाजूला ठेवूनही चित्रपट इमोशनली अजून एक्सप्लोर व्हायला हवा होता, हे चित्रपट संपता संपता जाणवते. याला काही अपवादही आहेत. क्रिती खरबंदा हे एक सरप्राईज पैकेज आहे, दुलकर आणि तिचे जे काही मोजके सीन्स आहेत ते हळवे करून जातात. दिग्दर्शकाने ज्या नजाकतीने हा अँगल पडदयावर दाखवला आहे, त्यासाठी विशेष कौतुक. असाच इम्पॅक्ट पूर्ण चित्रपटाचा पडायला हवा होता. चित्रपटाच्या शेवटी वडिलांची दुसरी बाजू दुलकरला कळते तो सीनही जमून आलाय.  

काही प्रवास पूर्णता आनंददायी नसले तरीही, प्रवासातील काही टप्पे सुखावणारे आणि अखेरचा मुक्काम आठवणीत राहण्यासारखा असतोच, नाही का? एकदा हा अनुभव घ्यायला हरकत नाही. Give it a try..!

- राज जाधव (१४-०८-२०१८)

Comments

Popular Posts