बेचैन करणाऱ्या एका चेनची गोष्ट


सिनेमाच्या पूर्वापार चालत आलेल्या पद्धतींना छेद देणारे अनेक अभिनव प्रयोग करण्यात मल्याळम सिनेमा अग्रेसर आहे. हिंदीतही असे सिनेमे येत आहेत, यात शंका नाही, तरीही, काही ठराविक प्रेक्षकवर्ग सोडला, तर हिंदीमध्ये दिसणाऱ्या टिपिकल लव स्टोरीज, रिवेंज ड्रामा आणि इतर मसालापटात ते काहीसे हरवून जातात.

'महेशिंटे प्रतिकारम' या आपल्या पहिल्याच दिग्दर्शनाच्या प्रयत्नात एका वेगळ्याच पद्धतीच्या हाताळणीची ओळख करवून देऊन, राष्ट्रीय पुरस्कारासोबत स्वतःच्या कामाचीदेखील दखल घ्यायला लावणाऱ्या दिलीशने, पुढच्याच 'तोंडीमुदलम् द्रिक्सशियुम् (Thondimuthalum Driksakshiyum)' मध्ये पुन्हा एकदा सर्वांना चकित केले. नुकत्याच पार पडलेल्या या वर्षीच्या राष्ट्रीय पुरस्कारावरही या चित्रपटाने आपली मोहर उमटवली.

एका छोटयाशा गावात आणि पोलीस स्टेशनमध्ये अधिकांश चित्रपट घडतो. प्रसाद (सुरज वेंजरामोडू) आणि श्रीजा (निमिशा) नुकतेच प्रेमात पडलेले एक जोडपे. काही भेटीत, ते लग्न करण्याचा निर्णय घेतात. इंटरकास्ट असल्याने, घरच्यांचा अर्थातच त्यास विरोध असतो, म्हणून ते पळून जाण्याचा निर्णय घेतात. नवीन गावी जाऊन, श्रीजाच्या गळ्यातील चेन विकून किंवा गहाण ठेवून नवीन काम सुरू करण्यासाठी पैसे उभे करण्याचा त्यांचा मानस असतो. प्रवासात नेमक्या त्याच बसमध्ये एक निनावी चोर झोपेत असलेल्या श्रीजाच्या गळ्यातील चेन चोरण्याचा प्रयत्न करतो. तो जवळपास सफल होत असतो, नेमकं तेव्हाच श्रीजाला जाग येते आणि पकडले जाऊ या भीतीने तो चोर ती साखळी गिळून टाकतो, जे फक्त श्रीजा पाहते. यानंतर बस पोलीस स्टेशनकडे वळवली जाते, त्यानंतर पुढे काय होते, याचा प्रवास म्हणजे हा चित्रपट.

प्रसादचे कॅरेक्टर अगदी डाऊन टू अर्थ वाटते. पोलीस स्टेशनचे प्रसंग सुरू झाल्यापासून त्याच्या वागण्या बोलण्यात आणि बॉडी लँग्वेजमध्ये एक प्रकारची असहाय्यता येते. फहाद पळून जाऊ नये, यासाठी वेळोवेळी त्याच्यावर नजर ठेवणे, त्याचा पाठलाग करणे, तो दिसला नाही तर अस्वस्थ होणे, हे सर्व, त्याला आणि श्रीजाला चेन मिळणे किती गरजेचे आहे, हेच अधोरेखित करते. श्रीजाच्या रोलमध्ये नवोदित निमिशाचे कामदेखील संयत आणि नॅचरल वाटते. चेन परत मिळावी आणि चोराला शिक्षा व्हावी यासाठी तिची चालू असलेली तगमग स्पष्ट दिसते.

पण सर्वात जास्त लक्षात राहतो तो फहाद फासीलने साकारलेला चोर. मोठा स्टार घेऊन त्याला अगदी सपोर्टींग, त्याच्या स्टार इमेजला न साजेसा रोल देणे, हे आपल्याकडे क्वचितच पहायला मिळते. फहाद फासिलसारखा स्टार इथे चोराची भूमिका कंविक्शनने करतो आणि आपले मन जिंकतो, हे विशेष उल्लेखनीय. चित्रपट जसा पुढे सरकतो तसे फहादच्या रोलचे अनेक पदर उलगडत जातात. आधी पक्का मुरलेला वाटणारा चोर, नंतर परिस्थितीने पोळलेला आहे हे पुसटसे जाणवते. चोरी करण्यामागे त्याची स्वतःची फिलॉसॉफी आहे, त्याच्या दृष्टीने ती एक कला आहे. जेलमध्ये एका सहकाऱ्याला तो 'गळ्यातील चेन समोरच्याला समजू न देता कशी पद्धतशीरपणे काढायची' याची शिकवणी देताना एक सीन आहे, त्यावरून तो किती मनापासून हे काम करतो हे कळते. चोरी, त्याच्यात इतकी भिनलेली आहे की जेव्हा पोलीस प्रसादनंतर त्याला त्याचे नाव विचारतात, तेव्हा तो स्वतःलाही प्रसाद म्हणवून घेतो, तो प्रसादचे नावही चोरतो. फहादने साकारलेला चोर हळू हळू मनाचा ठाव घेतो, हलकासा उल्लेख सोडला तर त्याची कुठलीही बॅकस्टोरी आपल्यासमोर येत नाही. अट्टल वाटणारा, मनापासून स्मित करणारा, मित्रासारखा ग्रीट करणारा, थँक यु-सॉरी म्हणणारा हा चोर चित्रपट संपताना अनेक प्रश्न उभे करतो, फहादने त्याची पकडलेली बेयरिंग आणि बॉडी लँग्वेज अफाट आहे.

दिग्दर्शकाइतकीच सिनेमॅटोग्राफी देखील चित्रपटाला चार चाँद लावते. विशेषतः, एक सुरुवातीला पोलिसांसोबत बोलत हातात पाण्याने भरलेली बादली आणि घागर घेऊन जाताना सुधाकरन नावाच्या कॅरॅक्टरसोबत एक लॉंग शॉट सिक्वेन्स, तोच पुढे जाऊन बस पोलीस स्टेशनमध्ये येते, तिथपर्यंत एकसलग चित्रित केला गेला आहे. दुसरा सर्वात महत्वाचा, फहाद पोलीस स्टेशनच्या बाहेरून पळून जाताना पाठलाग करतानाच सिक्वेन्स आणि त्यानंतर येणारा कॅनल चेसिंगचा सीन अफाट आहे.

हा चित्रपट तुमचं मनोरंजन करणार नाही, पडद्यावर काहीतरी खूप रोमांचक घडतंय, असंही काही दिसणार नाही. पण मानवी वृत्ती, स्वभावविशेष, परिस्थितीनुसार बदलणारी वागणूक आणि मानसिकता यावर हा चित्रपट भाष्य करतो. पडद्यावर दिसणारी सर्व पात्रे, (अगदी महत्वाची तीन धरून) सहकलाकार आहेत असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही, कारण चित्रपटाची स्क्रिप्टच हिरोचा रोल प्ले करते आणि त्याला साथ देतात, नॅचरली क्राफ्टेड आणि अभ्यासपूर्वक लिहिले गेलेले सर्वच कॅरेक्टर्स.

'चेन स्नॅचिंग' या विषयावर हिंदीत जास्तीत जास्त एखादा क्राईम पॅट्रोलचा एपिसोड होऊ शकतो, तोही भडक आणि हिंसा याने ओतप्रोत भरलेला. इथे तोच विषय घेऊन एक, कोणत्याही एका विशिष्ट प्रकारात मोडता येणार नाही असा सिनेमा करण्यात आला आहे. विशेष म्हणजे, एका ओळीत स्टोरी सांगावी असे कथानक. अर्थात त्या कथानकाभोवती गुंफलेली पटकथा, संवाद, रिलेटेबल कॅरेक्टर्स आणि सीन्स, दिग्दर्शकाची स्टोरीटेलिंगची वेगळी पद्धत आणि सर्वांचाच नैसर्गिक अभिनय याच्या जोरावर चित्रपट सरतेशेवटी आपली छाप पाडून जातो.

©राज जाधव (०८-०५-२०१८) 

Comments

Popular Posts