एक प्रसंग, तीन परिणाम


प्रसंग - १, चित्रपट - द्रोही, वर्ष १९९२, पूर्वार्ध

एक स्त्री, स्वतःच्या घरात काम करणाऱ्या लहान मुलाला, राघवला (लहानपणीचा नागार्जुन) चोरीचा आरोप ठेऊन, पोलीस स्टेशनला घेऊन येते. तिच्या सांगण्यावर विश्वास ठेवून पोलीस इन्स्पेक्टर त्याला विचारपूस करतात, मारतात, गुन्हा कबूल करायला भाग पाडतात. थोड्या वेळात त्या स्त्रीचा नवरा, 'आपला गैरसमज झाला आहे आणि आपल्याच मुलानेच ते किमती सामान लपवून ठेवले आहे', असे म्हणतो. मुलाला सोडण्यात येते. त्याच्यावर झालेल्या अन्यायाची माफी ती स्त्रीही मागत नाही आणी तो पोलीस इन्स्पेक्टरही. तो पुन्हा त्या घरात जात नाही, पण ही घटना आणि सोबत तो इन्स्पेक्टर त्याच्या डोक्यात पक्का बसतो.

प्रसंग - २, चित्रपट - कंपनी, वर्ष - २००२, पूर्वार्ध

चंद्रकांत उर्फ चंद्रु (विवेक ओबेरॉय) नुकताच मलिकसोबत कंपनीच्या कामावर रूजु झालाय. रस्त्याच्या कडेला एक डील करता करता नेमकी पोलिसांची जीप येते आणि चंद्रु आणि त्याचे साथीदार विखुरतात. एक पोलीस इन्स्पेक्टर चंद्रुला अडवतो, प्रश्न विचारतो. उलटसुलट उत्तरे ऐकून त्याला एक लगावून देतो. पोलीस स्टेशनमध्ये नेऊनही चंद्रुच्या कानाखाली लावून, टूथपिकने दातात अडकलेली घाण काढून त्याच्या गालावर लावतो आणि मोठमोठ्याने हसत त्याची मजा घेतो. चंद्रुचे डोळे आग ओकत हे सर्व पाहत असतात.

प्रसंग ३, चित्रपट - डी, वर्ष - २००५, पूर्वार्ध

दुबईत मेकॅनिकचे काम करणारा देशु (रणदीप हुडा), आईच्या निधनानंतर मुंबईला आलाय. वडील रिटायर्ड पोलीस कॉन्स्टेबल आहेत. एके दिवशी मांगलीचे काही गुंड एकाचा पाठलाग करता करता देशूच्या घरात शिरतात, देशुच्यासमोर त्याला मारतात. पोलीस इन्वेस्टीगेशनला देशूला घेऊन जातात. ओळख परेडच्या आधी मांगली देशूला बोलवून तोंड बंद ठेवण्याची धमकी देतो. त्याप्रमाणे देशू कोणालाही ओळखत नाही आणि तिथल्या इन्स्पेक्टरचा पारा चढतो. तो देशूला शिव्या देत एकसलग बदडत राहतो. देशू शांततेने त्याच्या नजरेत नजर घालून पाहत राहतो.

या तिन्ही प्रसंगात इथपर्यंत कमालीची समानता आहे. पण पुढे हे तीन नायक वेगवेगळ्या पद्धतीने आपला बदला इन्स्पेक्टरशी घेतात.

प्रसंग - १, चित्रपट - द्रोही, वर्ष १९९२, उत्तरार्ध

त्या मुलाला पकडून आणून, मारल्यापासून, ते तो निर्दोष साबीत होईपर्यंतचा सगळा खेळ जेलमध्ये कैद असलेला सेठीसाब (डॅनी) बघत असतो. सेठीची बेल झाल्यानंतर तो राघवला स्वतःसोबत घेऊन जाऊन एका हॉटेलमध्ये नोकरी देतो. एके दिवशी त्या हॉटेलमध्ये तोच इन्स्पेक्टर येतो. सेठी राघवला चहा घेऊन यायला सांगतो. राघव आल्यावर तो गरम चहा त्या इन्स्पेक्टरच्या तोंडावर फेकतो.

प्रसंग - २, चित्रपट - कंपनी, वर्ष - २००२, उत्तरार्ध

सईद आणि अनिसला ठोकल्यानंतर मलिक आणि चंद्रु शर्माकडे येतात. शर्माला ही बातमी कळताच मलिक शर्मालाही उडवतो. तिथेच चंद्रुला सोडण्याच्या बदल्यात पैसे घ्यायला आलेला, तोच इन्स्पेक्टर असतो. मलिकने शर्माला ठोकल्यानंतर चंद्रु मलीकभाईला, मला याला आत्ता उडवायचं आहे म्हणून सांगतो. मलिक काही सेकंद याला मारल्यानंतर होणाऱ्या संभाव्य धोक्यांचे कॅलल्यूलेशन करत बसतो, तसा त्या इन्स्पेक्टरचा पारा चढतो शिवाय भितीही वाढत राहते. पुढे मलिककडून ग्रीन सिग्नल मिळाल्याच्या पुढच्याच सेकंदाला चंद्रु तीन गोळ्या इन्स्पेक्टरच्या आरपार करतो.

प्रसंग ३, चित्रपट - डी, वर्ष - २००५, उत्तरार्ध

मांगलीचा बदला घेण्यासाठी देशु त्याच्याविरुद्ध असलेल्या हाशिमभाईच्या गँगमध्ये सामील होतो, मांगलीला धडा शिकवतो. नंतर इन्स्पेक्टरलाही, पण थोड्या वेगळ्या प्रकारे. एका प्रसंगात भक्ती भटनागर देशूला, 'तूला कुठलेच मनोरंजन का आवडत नाही', असे विचारते तेव्हा तो सांगतो, 'ज्या इन्स्पेक्टरने मला, मी एक क्षुल्लक माणूस असताना त्रास दिला, त्याला आता मी डॉन देशु झालो असल्याचे माहित झाले आहे. तो कदाचित वाटही पाहत असावा की कधी मी गाठून त्याला ठार मारेल, पण मी असे करणार नाही. त्याची जी ही भीती आहे, तेच माझे एंटरटेन्मेंट आहे'. त्यावर भक्ती त्याला, 'तू राक्षस आहेस' म्हणते. हा त्यावरही हलकेसे क्रूर हसतो.

एकाच घटनेचे, पात्राच्या स्वभावानुसार आणि परिस्थितीनुसार हे असे तीन वेगवेगळे पडसाद उमटलेले दिसतात आणि तिन्ही सीन्स तेवढाच इम्पॅक्ट पाडतात. या बाबतीत रामूची विशेष तारीफ करायला हवी. तसा 'डी'चा दिग्दर्शक विश्राम सावंत होता, तरी त्यात रामुदेखील निर्माता म्हणून इनवोल्व्ह होता, शिवाय चित्रपटावर रामुच्या शैलीची छाप आहेच.

- राज जाधव (०१-०६-२०१८)

Comments

Popular Posts