'जख्म'चे निखळलेले धागेदोरे, 'जनम'


महेश भट्ट यांनी अनेक चित्रपटांमधून त्यांचे आयुष्य पडद्यावर मांडले आहे, अगदी 'अर्थ' पासून 'जख्म'पर्यंत. त्यांची कहानी भट्ट कॅम्पमधील 'वो लम्हे', 'हमारी अधुरी कहाणी' या इतर दिग्दर्शकांच्या चित्रपटातही दाखवली गेली. पण या सर्व चित्रपाटांच्या यादीत एक नाव कुठेही येत नाही, ते म्हणजे 'जनम'.

ऐंशीच्या दशकात, 'अर्थ' आणि 'सारांश' सारख्या चित्रपटांनी महेश भट्ट यांनी स्वतःचे वेगळेपण पटवून दिले होते. १९८५ मध्ये 'जनम' ही (टेली)फिल्म, दूरदर्शनवर रिलीज झाली असल्याने आणि मेन लिड कुमार गौरवच्या ढासळत्या कारकीर्दीमुळे असेल कदाचित, याचा आज कुठेही आवर्जून उल्लेख आढळत नाही.

महेश भट्ट यांच्या या ऑटोबायोग्राफीत कुमार गौरव त्यांची मध्यवर्ती भूमिका करताना दिसला. अजून एक आश्चर्याची गोष्ट म्हणजे हाच रोल १९९८ मध्ये आलेल्या जख्ममध्ये अजय देवगणने साकारला होता. मूळ कथेचा बेसिक प्लॉट तोच असल्याने तुलना आपोआप होतेच. दोन्ही चित्रपट काही अंशी एकमेकांचे प्रिक्वेल आणि सिक्वेल होऊ शकतात. जख्म बऱ्याच जणांनी पाहिला असल्याने, त्या अनुषंगाने सांगणे सोपे जाईल. जख्मची स्टोरी घटनाक्रमाच्या अनुसार समोर ठेवली तर, कुणाल खेमुचा पार्ट संपल्यानंतर आणि अजय देवगणचा पार्ट सुरू होण्याच्या मध्ये 'जनम' घडतो (अर्थात, जख्ममध्ये बापाचा, नागार्जुनचा अपघात होऊन तो मरतो, मुख्यत्वे हा पार्ट आणि काही सिनेमॅटिक लिबर्टीज ग्राह्य न धरता). दोन्ही चित्रपटाचा गाभा एक असला तरी महेश भट्ट यांनी, काही काळापर्यंत समांतर पातळीवर नेऊन, दोन्हीं चित्रपटांचे मुक्काम बदलले आहेत.

जख्म, हा आई आणि मुलाच्या नाजूक नात्यांवर अधिक भाष्य करतो. आयुष्यभर आपल्या अधिकारासाठी आणि आपल्यासाठी झगडत राहिलेल्या आईसाठी लढणाऱ्या मुलाची ही कहाणी. जनममध्ये केवळ हा एकच विषय अधोरेखित होत नाही. जख्ममधल्या कुणाल खेमुची घुसमट इथे कुमार गौरवच्या वागण्यातही दिसते, पण त्याचे रूपांतर आता काहीसे द्वेषात झाले आहे. बापावरच्या रागाव्यतिरिक्त जनमच्या नायकाला अपयशाच्या आणि न्यूनगंडाच्या कोषातून बाहेर येऊन स्वतःला एक प्रस्थापित दिग्दर्शक म्हणून सिद्ध करायचे आहे. जगासमोर बापाने आईला तिचा अधिकार आणि मुलाला त्याचा नैतिक हक्क द्यावा, अशीही त्याची इच्छा आहे.

तिन्ही पात्रांची तुलना केली तर, कुणाल खेमुच्या पात्राच्या वागण्याचेच पडसाद पुढे कुमार गौरवच्या स्वभावात दिसतात, अजय तसा बराच शांत, संयमी आणि इंटेन्स वाटतो, अर्थात जख्मची तीच आवश्यकता होती. शिवाय, जख्ममध्ये बाप म्हणून नागार्जूनचा खरोखर नाईलाज झाला आहे असे वाटते, तर जनम मध्ये अनुपम खेरच्या कॅरेक्टरला ग्रे शेड्स आहेत. तो कधी काळजीवाहू बाप वाटतो, कधी अय्याशीसाठी अनैतिकपणे दुसरं घर बसवणारा, तर कधी आपली आणि आपल्या जायज परिवाराची नाचक्की होऊ नये म्हणून आपल्या नाजायज मुलाला धमकवणारा स्वार्थी वाटतो. जख्ममधील पूजा भट आणि जनममधील अनिता कंवर या दोघींनी उभी केलेली आई एकाच पातळीवरची आहे. मुलासाठी लढणाऱ्या, पण आपल्या अधिकाराची मागणी न करणाऱ्या, आपल्या हिस्स्याला येईल तेवढाच तो आपला नवरा आहे हे स्वीकारणाऱ्या. दोन्ही चित्रपटात दोन्ही घरातील मुख्य पात्रे वगळता, गरजेनुसार वेगवेगळे सपोर्टींग कास्ट आहेत.

ऐंशीच्या दशकाच्या मानाने, स्वतःच्या व्यथित आणि वादग्रस्त जीवनावर चित्रपट बनवणे हा निर्णय तसा खूपच बोल्ड. म्हणजे याला कुणी आपल्या घरातले वाद चव्हाट्यावर मांडणे म्हणो किंवा स्वतःच्या दुःखाचा बाजार मांडून पैसे कमावणे म्हणो. कोणत्याही परिस्थितीत हे करायला हिम्मत लागते, जी महेश भट यांनी वेळोवेळी दाखवली, तेही केवळ स्वतःला ग्लोरिफाय न करता, याचे विशेष कौतुक करायला हवे. या चित्रपटाबद्दल शोधताना तीन चार वर्षांपूर्वीची एक बातमी वाचली, 'जनम'च्या स्टेज अडोप्शनची, पण पुढे काही झाले नाही.

ज्यांना जख्म आवडला असेल त्यांनी जनम आवर्जून पहावा.

- राज जाधव (२७-०५-२०१८) 

Comments

Popular Posts