जख्मचा कुणाल देवगण


जख्म, अजयच्या इंटेन्स करियरचा पाया भक्कम करणारा चित्रपट. तिथून त्याने ट्रॅक बदलला आणि त्याच्या टाईपकास्ट झालेल्या, कदाचित संपतही आलेल्या करियरला नवसंजीवनी मिळाली. कामाचं कौतुक झालं, राष्ट्रीय पुरस्कारही मिळाला. त्याला हम दिल दे चुके सनम मधील 'वनराज'चा रोल मिळण्यात जख्मचा कुठेतरी मोठा वाटा असावा असं मला सतत वाटतं.

पूजा भट्टने साकारलेली मुस्लिम आई, हीदेखील तिच्या अगदीच मोजक्या चांगल्या रोलपैकी एक. दुसरी बाई असल्याची अगतिकता तिच्या चेहऱ्यावर सदैव दिसत राहते. आपल्या मुलाला त्याचा हक्क, बापाचे नाव मिळावे ही वेडी आशा लावून बसलेली आई तिने नेमकी उभी केली आहे. 'रात सारी बेकारारी में गुजार दी' आणि  'गली में आज चाँद निकला' या गाण्यांत तिचे एक्सप्रेशन्स कमाल आहेत, नवरा (म्हणावा का?) येत नसल्याची निराशा-दुःख, येत असल्याचा आनंद, रोमांच आणि त्याचबरोबर गोंधळलेली अवस्था हे सर्व तिच्या नजरेत आणि चेहऱ्यावर एकत्र दिसत राहते.

महेश भट्टच्या दिग्दर्शनात अजय देवगणने मिळालेल्या संधीचं सोनं केलं, यात शंकाच नाही, पण अजय देवगणच्या पात्राचा भूतकाळ तितक्याच ठळकपणे उभा करतो, तो कुणाल खेमु. चित्रपट नॉन लिनीयर नॅरेटिव पद्धतीने आपल्या समोर येत असूनही कुणालच्या अप्रतिम नैसर्गिक अभिनयामुळे अजय देवगणचा परफॉर्मन्स कंविन्सिंग वाटतो.

चर्चमध्ये मदर मेरीकडे आपल्या बापाला मागणारा, भेटायला न आल्याने, दुसरे लग्न केल्याने हतबल होऊन, चिडून, स्टुडिओची तोडफोड करणारा, आपल्या आईला तिचा हक्क न मिळाल्याने तिला रखेल म्हटलं जातं याची जाणीव असल्याने आपल्या बापाला जाब विचारणारा, वयाच्या आधीच मॅच्युअर झालेला मुलगा कुणाल खेमुने अक्षरशः जिवंत उभा केला आहे.

अजयला मिळालेला राष्ट्रीय पुरस्कारात कुणाल खेमुचा अर्धा वाटा आहे, असे म्हटले तर ती अतिशीयोक्ती वाटणार नाही.

खरं तर, मासुममधील जुगल हंसराज आणि जख्ममधील कुणाल खेमु हे दोन कॅरेक्टर एकाच नाण्याच्या दोन बाजू वाटतात. जणू काही दोघांनीही त्यांच्या आयुष्यभराचं नैसर्गिक अभिनयाचं कौशल्य एकाच चित्रपटात पणाला लावलं. दोघेही अशी जादू पुन्हा दाखवू शकले नाहीत, पण या भूमिकांसाठी कायम स्मरणात राहतील, हे नक्की. जमलंच तर या दोघांवर लिहावं काहीतरी, कधीतरी निवांत.

- राज जाधव (२५-०५-२०१८)

Comments

Popular Posts