प्राजक्ताप्रमाणे दरवळणारा ऑक्टोबर


'ऑक्टोबर' हा प्रामाणिक प्रयत्न तुम्हाला निरागस आणि निरपेक्ष प्रेमाची नवी परिभाषा शिकवतो. प्रेम, जे अव्यक्त आहे. प्रेम आहे म्हणावे तर त्याचा कुठेच उल्लेख नाही आणि नाही म्हणावे तर प्रत्येक फ्रेम, प्रत्येक नजर, समोरच्या व्यक्तीसाठी कोणत्याही अपेक्षेशिवाय मनापासून केलेला प्रत्येक अटेम्प्ट, चित्रपटभर प्रेमाचीच साक्ष देत राहतो.

डॅन आणि शिऊली त्यांच्या इतर सहकाऱ्यांसोबत हॉटेल मॅनेजमेंटच्या इंटर्नशिपला आहेत. डॅन, हा सुरुवातीपासूनच सदैव इरिटेटेड, आयुष्य आणि करियरच्या बाबतीत बिनधास्त आणि निष्काळजी आहे. विशेष रस नसल्याने तो कामाच्या बाबतीतही बेजबाबदार आहे. याच कारणांमुळे त्याचे सहकारी आणि वरिष्ठांसोबत संबंध अधेमध्ये बिघडत राहतात.

शिऊली, त्याच्या अगदीच उलट. शांत, समंजस, समजूतदार, कामाच्या बाबतीत प्रॉम्प्ट आणि प्रामाणिक. ती करत असलेल्या कामात तिला आनंद मिळतो. तसं पहायला गेलं तर दोघेही परस्परविरोधी. दोघांत कसलीही ओढ, घट्ट मैत्रीदेखील नाहीये. दोघेही एकमेकांसाठी केवळ एका कलीगपेक्षा जास्त नसावेत. मग, असं काहीतरी घडतं की, डॅनसाठी ही सर्व गणितं बदलून जातात.

एका पार्टीच्या वेळी शिऊली टेरेसवरुन पडते आणि कोमात जाते. पार्टीच्या वेळी उपस्थित नसलेल्या डॅनला ही बातमी दुसऱ्या दिवशी कळते. डॅनदेखील, इतर सहकाऱ्यांसोबत तिला वेळ मिळेल तसे पहायला जात राहतो. 'शिऊलीला हॉस्पिटलला पहायला जाणे' ही डॅनसोबत सर्वांसाठीच हळूहळू एक औपचारिकता बनत जाते. मग, एके दिवशी, टेरेसवरुन पडण्याआधी तिने 'डॅन कुठे आहे?' विचारले असल्याचे डॅनला कळते आणि तो या प्रश्नाचा माग घेऊ लागतो, अस्वस्थ होऊन जातो, याबद्दल न सांगितल्याबद्दल सहकाऱ्यांवर चिडतोदेखील. 'तिने माझ्याबद्दल का विचारले असेल?' याचा शोध घेण्यात तो दंग होतो.

कामाला दांड्या मारून तो वेळ, काळ न पाहता हॉस्पिटलला जाऊ लागतो, जास्तीत जास्त वेळ तिच्यासोबत राहू लागतो, शिऊलीच्या आवडीची प्राजक्ताची फुले आणून तिच्या उशाशी ठेवतो, शिऊलीची आई आणि तिच्या परिवाराला मोरल आणि ऐपतीप्रमाणे शक्य होईल तिथे आर्थिक मदत करतो. त्याचे हॉस्पिटलमधील रुटीन किती सेट झाले आहे, हे अधोरेखित करणारे काही सीन्स (रिसेप्शनिस्ट, डॉक्टर्स, नर्ससोबत शिवाय कोरीडोअर-वेटिंग रुम मधील सीन्स) अप्रतिम आहेत.

गीतांजली रावने साकारलेली, आतून तुटलेली असूनही मुलांसमोर खंबीर, जबाबदार, मॅच्युअर्ड आणि तरीही प्रॅक्टिकल आई, ही देखील चित्रपटाची हायलाईट आहे. प्रोफेसर असल्याने ती तिचा वेळ काढून क्लासेस अटेंड करते, हॉस्पिटमध्ये मुलीला अभ्यासासाठी कोपरा शोधते शिवाय मुलाने त्याच्या ट्युशन्स चुकवू नयेत, ही काळजीदेखील घेते. ती कितीही प्रॅक्टिकल असली तरी आपल्या मुलीची लाईफ सपोर्ट सिस्टीम काढावी, इतका प्रॅक्टिकल विचार ती करत नाहीये, एका नातेवाईकाच्या हजारदा सांगण्यावरूनही. तिला तिचे आयुष्य जगण्याचा अधिकार आहे, हे डॅनसोबत तिलाही वाटते.

बऱ्याच दिवसात, एका अनामिक नात्यावर इतकी हळवी, आत प्रचंड कोलाहल असूनही समुद्रासारखी निश्चल मुव्ही पाहिल्याचे आठवत नाही. शुजित सरकार आणि जुही चतुर्वेदी यांनी पुन्हा एकदा काळजात हात घातलाय, असे म्हणणे वावगे ठरणार नाही.

वरुण धवनचे डॅनच्या रोलमध्ये पूर्णता ट्रान्सफॉर्मेशन झालेले दिसते, बेसलेस कॉमेडी चित्रपट करणारा, हाच का तो वरुण धवन? असा प्रश्न पडावा, इतपत. आधीचा बेजबाबदार आणि निष्काळजी डॅन, ते नंतरचा हळवा आणि समजूतदार डॅन हा प्रवास त्याने खूपच परिपक्वतेने साकारला आहे. दोन्ही फेजमधील, वेगवेगळ्या मानसिकतेतील डॅन पडद्यावर दाखवताना त्याने जीव ओतून काम केले आहे, हे स्पष्ट दिसते. शिऊलीला अभिनयाच्या बाबतीत सुरुवातीला थोडाच स्क्रीन प्रेझेंस आहे, तरीही ती गोड आणि निरागस वाटते. त्यानंतर पूर्ण चित्रपटभर ती बेड अथवा व्हीलचेयरवर दिसली आहे. अपघातापूर्वी ती संवादाने कमी बोलली आहे आणि अपघातानंतर डोळ्यांनी असंख्य वेळा संवादली आहे, असे वाटत राहते.

आणि अखेरीस सर्वात महत्वाचा टिपिकल प्रश्न, 'शिऊलीचे डॅनवर प्रेम होते का'? एकाच पठडीतले चित्रपट पाहून आपण इतके सरावलेले असतो की वेगळे काही दाखवले की ते सहजासहजी आपल्या पचनी पडत नाही. हा प्रश्नही तसाच. याचे उत्तर शोधण्यासाठी चित्रपट पाहणार असाल, तर कृपया पाहू नका. याचं उत्तर त्या दोघांनाही माहीत असेल की नाही, शंकाच आहे. चित्रपटही यावर भाष्य करत नाही, म्हणूनच तो जास्त परिणामकारक वाटतो.

या प्रश्नाचे उत्तर ज्याचे त्याने ठरवायचे आणि आपापल्या मनात ठेवायचे. आपल्या मनात, आपल्या आयुष्यातील एखाद्या डॅन किंवा शिऊलीसोबत व्यतीत केलेल्या क्षणांची खिडकी अर्धीशी उघडून, त्या नात्याला कसल्याही परीपूर्णतेचे गालबोट न लागू देता, फक्त खिडकीबाहेरच्या आठवणींचा प्राजक्त सामावून घ्यायचा श्वासात, मनात, खोल हृदयात आणि तो सुगंध शरीरभर साठवून, ती खिडकी पुन्हा बंद करायची, बस्स..!

© राज जाधव (०२-०५-२०१८)

Comments

Popular Posts