मॉन्सून शूटआऊट - अतर्क्य शक्यतांचा खेळ


'जिंदगी में तीन रास्ते होते हैं, सही रास्ता, गलत रास्ता और बिच का रास्ता..!'

चित्रपटाच्या सुरुवातीला एका मध्यवर्ती पात्राच्या आईच्या तोंडून हे वाक्य येतं. साधंच, पण खूप महत्त्वाचं होतं हे वाक्य. मी खूपच दुर्लक्षितपणे तो संवाद ऐकून संपवला (जसं आपण आपल्या आईने सांगितलेल्या महत्वाच्या गोष्टींकडेही कानाडोळा करतो, तसा), पण जसजसा चित्रपट पुढे सरकत गेला, तेव्हा कळत गेलं की पूर्ण चित्रपट त्याच्याभोवतीच फिरतो आहे.

प्रत्येक क्रियेच्या बदल्यात तितक्याच ताकदीची प्रतिक्रिया अपेक्षित असते. हेच, बहुतांशी माणसांनी केलेल्या कृतीबद्दलही लागू होते. आपण केलेल्या एखाद्या कृतीचे परिणाम एखाद्याच्या दैनंदिन जीवनात, तो घेत असलेल्या निर्णयात शिवाय कधी कधी त्याच्या पूर्ण आयुष्यावरही पडू शकतात. कारण आपल्या सर्वांचे जीवनमान एकमेकांच्या जगण्याशी आणि एकमेकांनी घेतलेल्या निर्णयांशी संलग्न आहे.

मागे एकदा 'मानगरम' नावाच्या प्रादेशिक चित्रपटावर लिहिताना हे लिहिले होते, जे इथेही तंतोतंत लागू होतंय. परंतु, हा समान धागा सोडला तर दोन्ही चित्रपटांचा विषय आणि हाताळणी वेगळी आहे.

'मॉन्सून शूटआउट'चा कॅनव्हासच वेगळा आहे. केवळ दीड तासाचा चित्रपट आणि तरीही सर्वसमावेशक वाटावा असा. एका थीमभोवती फिरणारी कथा, घट्ट बांधीव पटकथा, सध्या पाहिलेल्या चित्रपटांच्या तुलनेतील उत्कृष्ट संकलन ('युवा'मध्ये काहीसे अश्या प्रकारचे संकलन होते, एकच घटना वेगवेगळ्या पात्रांच्या कथेतून वेगवेगळ्या प्रकारे समोर येते, इथे फक्त एक फरक आहे जो पडद्यावर पाहणे जास्त सुयोग्य होईल), कुठेही प्रेडिक्टेबल न वाटणारी लेखक-दिग्दर्शक अमित कुमारची स्टोरीटेलिंगची अफाट पद्धत, विजय वर्माचा नैतिकता आणि व्यवहारिकपणाच्या कचाट्यात सापडलेला नवीन रुजू झालेला ऑफिसर-त्याची घालमेल, नीरज काबीचा गुन्हेगारांची मानसिकता कोळून प्यायलेला आणि म्हणून परिणामांची पर्वा न करता, प्रॅक्टिकल विचार करून थंड डोक्याने आपली ड्युटी करणारा सिनियर ऑफिसर आणि शेवटपर्यंत चांगल्या की वाईट, नेमक्या कोणत्या कॅटेगरीत बसवावं हे ठरवणं अशक्य वाटावं, असा नवाजुद्दीन सिद्दीकी, या सर्व बाबींमुळे चित्रपट लक्षणीय ठरतो.

विजय, नीरज आणि नवाज हा त्रिकोण चित्रपटाची जान आहे. तिघांनी आपापली कामे चोख बजावली आहेत. विजय वर्माने सत्याच्या बाजूने राहण्याचा सर्वोत्तपरी प्रयत्न करणारा ऑफिसर उत्तमरीत्या उभा केला आहे. नीरज काबी हा एक प्रचंड ताकदीचा कलाकार आहे, प्रत्येक चित्रपटात तो चकित करतो, यातही त्याने सहजसुंदर अभिनय केलाय. माझ्यामते ही अभिनयाची केके मेनन, मनोज वाजपेयी किंवा इरफान खान कॅटेगरी आहे, एखाद्या वाईट चित्रपटातही ही मंडळी लक्षात रहावा असा अभिनय करून जातात, नीरज काबी याच पठडीतला एक दुर्लक्षित हिरा आहे. नवाजबद्दल तर बोलायलाच नको. बदलापूर, रमण राघवनंतर, त्याने यात साकारलेला शिवादेखील चीड आणणारा आहे.

मॉन्सून शूटआऊट, हा २०१७ मध्ये रिलीज झालेल्या चित्रपटांतील एक उत्तम चित्रपट म्हटल्यास अतिशीयोक्ती होणार नाही. शेवटपर्यंत खिळवून ठेवणारा हा उल्लेखनीय थ्रिलर, पकड ढिली न होऊ देता मांडलेली पटकथा, त्याला साजेसं अभ्यासपूर्ण संकलन आणि त्यासोबत तोडीस तोड अभिनय, यासाठी नक्की पहावा, असाच आहे.

- राज जाधव (०९-०३-२०१८)

Comments

Popular Posts