करन शेरगिल बनून जगताना


'लक्ष्य', मनाच्या जवळची एक खास फिल्म, हृतिकने साकारलेला करन शेरगिलही तितकाच प्रिय.

आयुष्यात कुठल्याही प्रकारचा उद्देश नसलेल्या, बापाच्या कमाईवर दिवस ढकलणाऱ्या, पण योग्य वेळेस, स्वतःचे लक्ष्य साकारणाऱ्या युवकाची गोष्ट.

आपले मित्र, जे नेहमी आपल्यासोबत होते, आपल्याइतकीच दंगा मस्ती करत होते, ते एक दिवस अचानक करियर वगैरेच्या गोष्टी करू लागतात. प्रत्येकाने स्वतःला काय करायचे आहे, हे आपापल्या परीने ठरवलेले असते आणि आपण दिशाहीन असल्यासारखे एकाच जागी आहोत, ही भावना आपल्याला खात असते. कमी अधिक प्रमाणात ही फेज प्रत्येकाच्या आयुष्यात येऊन गेलेली आहे.

अशीच परिस्थिती आपल्या घरातही असते. आपल्या पाहुण्यांमध्ये किंवा शेजारी आपल्याच वयाचा पण ज्याच्या आयुष्याची स्क्रिप्ट देवाने व्यवस्थित विचार करून लिहिली आहे, ज्याचं सगळं काही सुरळीत चालू आहे, अभ्यास, करियर, ग्रेड्स वगैरे वगैरे, असा एक सर्वार्थाने आदर्श मुलगा असतो, 'शर्माजी का लडका' टाईप. आपल्या नकळत आपल्या घरातले त्याच्यासोबत आपल्याला बॉक्सिंग रिंगमध्ये उभे करतात. प्रत्येक गोष्टीत तुलना करतात. एक दिवस त्याचा विस्फोट होतो किंवा कधीकधी नाहीही होत.

'लक्ष्य' चित्रपटातही, न दाखवलेलं पण अत्यंत महत्वाचं असं एक पात्र आहे, 'उदेश'. करनचा मोठा भाऊ, ज्याला सो कॉल्ड आयुष्याचं लक्ष्य मिळालंय आणि तो यूएसमध्ये वेल सेटल्ड आहे. करनची तुलना वेळोवेळी उदेशशी केली जाते. अनेकदा शांततेत ऐकून घेणारा करनही एक दिवस आईवर वैतागतोही, 'मैं उदेश नही हूँ', असं जीव तोडून सांगतोही.

खरेच, कुणीच कुणासारखा नसतो. जो अभ्यासात प्रवीण आहे, तो कदाचित इतर बाबतीत अगदीच मागास असू शकतो, बहुदा असतोच. सध्याच्या जगात कितीतरी लोक, केवळ दैनंदिन गरजा भागवण्यासाठी नोकरीधंदा करतात, खरंतर आतलं मन वेगळीच हाक देत असतं, पण पुढे दर महिन्याचं बजेटही डोकावत असतंच. त्यामुळे नाईलाजाने इतर गोष्टींवर पडदा टाकून, महिन्याचा खर्च कसा भागवायचा, हा विचार आपण करत राहतो. ज्या क्षेत्रात आवड आहे त्या क्षेत्रात करियर करायचं भाग्य फार कमी लोकांच्या नशिबी येतं.

खरं पाहता, उदेश ही एक प्रॅक्टिकल कॅटेगरी आहे. यांना वेळीच आपण अमुक नाही केलं तर काय होऊ शकतं याचं भान येतं आणि ते इतर गोष्टी कपाटात बंद करून केवळ करियर बनवणे आणि पैसा कमावणे, याच्या मागे लागतात. त्यांचीही काही स्वप्ने त्यांनी स्वतःच्या पायदळी तुडवली असण्याची शक्यता नाकारता येत नाही. पण अल्टीमेटली पैसा त्या दुःखावर सोनेरी मलम म्हणून काम करतो आणि ते दुःख कम्पेनसेट होऊन जातं.

प्रॉब्लेम 'उदेश' कॅटेगरी नाहीये, 'करन' कॅटेगरीही नाहीये. प्रॉब्लेम आहोत आपण, जी या दोघांना एकाच तराजूत तोलू पाहते. हे जोपर्यंत बदलणार नाही, तोपर्यंत कुठल्याही करनला लक्ष्य गवसणार नाही. कोणताही करन, उदेश बनू शकत नाही, आणि उदेश, करनही, हे जेवढ्या लवकर आपला समाज आत्मसात करेल, तेवढं त्यांना हवं ते लक्ष्य साधणं सोपं होईल.

- राज जाधव (०९-०२-२०१८)

Comments

Popular Posts