Story of The Wolf and The Lamb


चित्रपटाचा विशिष्ठ एखादा जॉनर आवडता म्हणून सांगायचे झाल्यास अवघड आहे, कारण मला कंटेंटवाईज उत्तम असेल तर कोणत्याही जॉनरचा चित्रपट पहायला आवडतो, मग तो कॉमेडी असो, रोमँटिक असो, ऍक्शन असो की ड्रामा. तरीही ज्यावर अगदी डोळे झाकून जीव टाकावा असा जॉनर आहे, शेवटपर्यंत बांधून ठेवणारा, उत्कंठावर्धक थ्रिलर. त्यातल्या त्यात क्राईम थ्रिलर हा तर अगदीच आवडीचा विषय.

सध्या, 'मिश्कीन' हा तमिळ दिग्दर्शक, भन्नाट स्टोरीटेलिंग आणि अफाट ट्रीटमेंटच्या जोरावर, मनावर आणि मेंदूवर अधिराज्य गाजवत आहे. कोणतीही अपेक्षा नसताना, सहज म्हणून त्याचा या वर्षीच्या 'थुपारीवालन' पाहिला आणि त्याने अक्षरशः भंडावून सोडले. साहजिकच त्याची फिल्मोग्राफी शोधायला घेतली, आणि पहायची ठरवली.

सुरुवात केली ती, 'Onayum Aattukkuttiyum' (The Wolf and The Lamb) याने.

चित्रपट सुरू होतो तो एका टॉप अँगल शॉटने. ब्रिजवर, गोळीने जखमी झालेला एक इसम धावता धावता कोसळतो आणि बेशुद्धावस्थेत पडून राहतो. येणारे जाणारे टिपिकल बघे लोक, थोड्या वेळ थांबून, काहीतरी बडबड करून, फेसबुकवर अपलोड करण्यासाठी फोटो क्लिक करून निघून जातात. त्याला मदत करण्याची कुणाचीही इच्छा नसते. अशात त्या वाटेने जाणारा चंद्रु (श्री), एक फायनल ईयर मेडिकल स्टूडेंट, त्याला स्वतःच्या बाईकवर बसवून, आधी हॉस्पिटल व नंतर पोलिसांकडे जातो. कुठूनही मदत मिळत नसल्याने तो त्याला स्वतःच्या घरी नेऊन, एका सिनियर डॉक्टरची फोनवरून मदत घेऊन ऑपरेट करतो, पण सकाळी पाहतो तर तो इसम निघून गेलेला असतो.

तो कुठे गेला याचा शोध लागेपर्यंत, चंद्रुच्या दारावर पोलीस उभे असतात. १४ खून करणाऱ्या एका अपराध्याला (वोल्फ) वाचवून, पळुन जाण्यासाठी मदत केल्याबद्दल चंद्रु आणि त्याच्या परिवाराला अटक केली जाते. स्वतःची आणि परिवाराची यातून सुटका करवून घ्यायची असेल तर चंद्रुपुढे वोल्फला मारण्याचा अल्टीमेटम ठेवण्यात येतो आणि इथून पुढे सुरू होते एक भन्नाट कथानक.

वोल्फला जीवे मारण्याची जबाबदारी असलेला चंद्रु वोल्फला भेटतो. चंद्रुला गनपॉइंटवर ठेऊन वोल्फ त्याला शहरभर फिरवत असताना, त्याची वागणूक पाहून, चंद्रुची खात्री होते की आपण एका गुन्हेगाराला वाचवून खूप मोठी चूक केली आहे. एक दोनदा पारडे चंद्रुच्या बाजूने झुकतेही, तो वोल्फला पकडून पोलिसांकडे देण्याच्या तयारीत असतोही, पण पुढे ज्या काही अनपेक्षित घटनांच्या मालिका घडत जातात, त्यामुळे त्याला वोल्फसोबत प्रत्येक वेळी पळ काढावा लागतो.

या दरम्यान वोल्फ त्याच्या परिवारातील सर्व सदस्यांना एकत्र एका सेमीटरीमध्ये जमवतोय, हे चंद्रुला कळतं. जसजसे हे दोघे एकमेकांच्या सोबत वेळ व्यतीत करत जातात, तसतसे एक वेगळेच सत्य चंद्रुच्या समोर येत जाते. अखेरीस, सेमीटरीमधील वोल्फने सांगितलेली 'The Wolf and The Lamb', ही कहाणी चित्रपटाचा संपूर्ण पर्सपेक्टिव्हच बदलून टाकते. हा इमोशनल मोमेन्ट चित्रपटाचा आत्मा आहे आणि हे प्रत्यक्ष अनुभवणेच जास्त योग्य ठरेल, म्हणून त्याबद्दल इथे काही लिहीत नाही.

पूर्ण चित्रपट रात्रीच्या काळोखात घडतो. रात्रीचा अंधार, स्ट्रीट लाईट्स, गाड्या-बाईक्स यांच्या हेडलाईट्स यांचा प्रत्येक फ्रेममध्ये केलेला वापर आणि इलयाराजाचं, कथेच्या स्पीडला आणि डार्क थीमला कॉम्प्लिमेंट देणारं बॅकग्राउंड म्युझिक, चित्रपटाच्या इंटेन्स वातावरणाला परफेक्ट सूट होतं.

दिग्दर्शक 'मिश्कीन' हा अफलातून स्टोरीटेलर आहे, यात त्याने स्वतः वोल्फ ही व्यक्तिरेखासुद्धा निभावली आहे. म्हणूनच कदाचित कमी आणि मोजकेच बोलणारा, शांत तरीही मनात असंख्य प्रश्नांनी ग्रासलेला वोल्फ त्याने उत्तम वठवला आहे. का कोण जाणे वोल्फ परफॉर्म करताना मला त्यात अनुराग कश्यपच्या छटा जाणवल्या, दिसण्यातही आणि बॉडीलँग्वेजमध्येही. हा हिंदीत आलाच तर तो रोल अनुरागने करावा असे वाटून गेले, उगाचच.

श्रीने साकारलेला चंद्रुही अफलातून आहे. चंद्रु हे
श्रीने 'मानगरम' मध्ये साकारलेल्या व्यक्तिरेखेचंच एक्सटेंशन वाटतं. त्यातही तो एका घटनेमुळे चुकीच्या परिस्थितीमध्ये अडकतो आणि रडत, पडत, अडखळत अखेरीस त्याच्याशी लढायला तयार होतो. इथेही, वोल्फला मदत करण्यासाठीची त्याची धडपड, पोलिसांसमोरची हतबलता, गुन्हेगाराला मदत केल्याचा उद्वेग त्याने नेमका दर्शविला आहे शिवाय अखेरचा संवेदनशील चंद्रुही लक्षात राहतो.

उत्कृष्ट दिग्दर्शन, फास्ट आणि बांधीव स्क्रीनप्ले, जिवंत अभिनय, रात्रीच्या फ्रेम्स आणि लाईट्सचा सुयोग्य वापर, या जोरावर एक इमोशनल टच असणारा हा थ्रिलर नक्कीच पाहण्यासारखा आहे.

© राज जाधव (१६-०१-२०१८)

Comments

Popular Posts