विक्रमातला वेताळ आणि वाईस वर्सा


एक काळ होता, ज्या वेळी चित्रपट नायकप्रधान होते. नायक गरीब असला तरी सभ्य, शिवाय आदर्श आणि स्वाभिमानीही असायचा. त्यानंतर नायक थोडासा स्टाईलबाज झाला, गुंडा मवालीछाप दिसू लागला, तरीही तो मनाने प्रामाणिकच, 'अमीरों से लुटके गरिबो में बाटनेवाला' मसिहा वगैरेही त्यातच आले.

खलनायक मात्र शत प्रतिशत वाईट अशीच संकल्पना होती. बलात्कारी, स्मगलर, डॉन याच कॅटेगरीत तो बरीच वर्षे सडला. कालांतराने जराशी बढती होऊन त्यालाही स्वतःचा एक ऑरा आला. दिसण्यात टापटीपपणा, बोलण्यात अदब, बोलण्याची विशिष्ट शैली, दमदार डायलॉग्स, बऱ्याच वेळा नायकाच्या ताकदीचा खलनायक समोर येऊ लागला. पण या खलनायकाने पिच्चरभर कितीही फुशारक्या मारल्या, तरी फायनल बाजी नायकच मारणार, हे गृहीत धरून आपण आजवर सिनेमे पाहत आलो होतो.

नव्वदच्या दशकात ही गणिते बदलायला हळूहळू सुरूवात झाली. 'सत्या' हा अनेक बाबतीत माईलस्टोन आहे, तो अश्याच कारणांसाठी. मग कालांतराने फक्त नायकावर केंद्रित असणाऱ्या चित्रपटांपेक्षा, असामान्यतेचा कोणताही आव न आणता खरीखुरी पात्रे वाटावीत, जिवंत अभिनय दिसावा असे चित्रपट येऊ लागले, लोकांना आवडू लागले. राम गोपाल वर्मा, त्याचे इतर सहकारी, अनुराग कश्यप, श्रीराम राघवन ही काही नावे पुढे अस्तित्वात आली, जम बसवू लागली. एक डार्क थीम असलेल्या क्राईम / अंडरवर्ल्ड बेस्ड फिल्म्सची लाट सुरू झाली, जी आजतागायत आहे.

या चित्रपटांची मांडणी, हाच त्याचा आत्मा. सर्व पात्रे आपल्या आसपासची, अगदी नावासकट. मध्यमवर्गीयांशी जुळलेली नाळ, हा समान धागा असल्याने, ती अधिकच जवळची वाटायची. यात कुणी एखादा, एकटा नायक असा नसतोच, प्रत्येक पात्र महत्वाचं, तितकंच ताकदीचंही. कोण प्यादा कुठला डाव टाकेल आणि एखाद्या राजाला चित करेल, याची कल्पना करणे अशक्यच.

नायक आणि खलनायक यांतील सर्व पायंडे मोडणाऱ्या आणि अलिखित नियम हाणून पाडणाऱ्या चित्रपटात 'बदलापूर' आणि 'रमण राघव', हे चित्रपट मला प्रकर्षाने आवडतात. चित्रपट पाहण्यापूर्वीचे आपण आणि आपली मांडलेली गृहीतकं, चित्रपट संपल्यानंतर कोलमडून पडतात, असे हे चित्रपट.

हाच टाईपकास्टचा फॉर्म्युला मोडणारा अजून एक चित्रपट म्हणजे, 'विक्रम वेधा'.

विक्रम - पोलीस ऑफिसर, वेधा - डॉन. विक्रम - नायक, वेधा - खलनायक, हा नियम इथे लागू होत नाही, हीच याची खासियत.

वेधा या डॉनच्या मागावर असलेला विक्रम, एक एन्काऊंटर घडवतो. वेधा तर सापडत नाही, पण त्या प्रसंगात, अतिआत्मविश्वासाच्या भरात विक्रमकडून एक निरपराध मारला जातो, जे त्याला बरंच उशिरा कळतं.

विक्रम, वेधाला शोधण्यासाठी पुढच्या प्रयत्नात असताना वेधा आश्चर्यकारकरित्या स्वतः सरेंडर करतो आणी 'ओरु कधा सोल्लटा सर' (एक गोष्ट सांगू का सर) म्हणत विक्रमला, स्वतःची कहाणी सांगायला सुरुवात करतो. कहाणी संपवून वेधा राजा विक्रमादित्यप्रमाणे, या विक्रमलाही कथेशी निगडित एक प्रश्न विचारतो. असा प्रश्न की जो विक्रमला त्याच्या चुकीची जाणीव तर करून देतोच पण अजून कोड्यातही टाकतो. कारण, त्याने विचारलेला प्रश्न आणी त्याचे आपण दिलेले उत्तर, याचा सध्याच्या परिस्तिथीनुसार अर्थ लावणे, तो डिकोड करणे आणी पुढे होणारी घटना टाळणे, हे एक मोठे आव्हान आता विक्रमपुढे असते. पुढच्याच क्षणी वेधाला बेल मिळते आणि तो तिथून निघून जातो.

नंतर वेळोवेळी विक्रम-वेधा समोरासमोर येतात, वेधा त्याची कहाणी टप्प्याटप्प्याने पुढे नेतो, प्रत्येक वेळी एक प्रश्न विचारतो, विक्रम त्याचे योग्य उत्तर देतो आणि त्या प्रश्न-उत्तराचा आजच्या परिस्तिथीनुसार अंदाज लावत येणारे प्रत्येक कोडे सोडवायचा प्रयत्न करतो. प्रत्येक उत्तरादाखल विक्रम आणि वेधा यांच्यातील चांगले आणि वाईट दर्शवणारी रेषा पुसट होत जाते आणि काही क्षणासाठी दोघेही एकाच प्रवृत्तीचे असल्याचे भासतात. हे ट्रान्सफॉर्मेशन पडद्यावर पाहत असतानाची अनुभूती खरेच ग्रेट आहे.

पुष्कर-गायत्री, या नवरा-बायको असलेल्या दिग्दर्शक जोडीने कमाल केली आहे. फास्ट आणि मुव्हिंग स्क्रीनप्ले असल्यामुळे, कथेवरची पकड कुठेही सैल पडत नाही, ही अजून एक जमेची बाजू. आर माधवन आणि विजय सेतुपती, यांनी विक्रम वेधा यांच्या कॅरेक्टरमधील अनेक शेड्स उत्तमरीत्या वठवल्या आहेत, त्याबद्दल दोघांना फुल्ल मार्क्स. विक्रमच्या बायकोच्या भूमिकेत श्रद्धा श्रीनाथ ही अभिनेत्री (जी वेधाची वकीलही आहे), हे सहाय्यक पात्र म्हणून ठीकठाक.

चित्रपट क्लायमॅक्सपर्यंत येऊन पोचेपर्यंत चांगल्या-वाईट संकल्पना पूर्णपणे बदलून जाऊन वाईटातल्या चांगल्या आणि चांगल्यातल्या वाईट प्रवृत्ती आपल्याला चकित करतात. कोणतीही गोष्ट कनल्युड न करता दाखवलेला चित्रपटाचा शेवटही अगदी समर्पक असाच आहे.

विक्रम वेताळ या पात्रांची आजच्या युगात घातलेली ही सांगड, खरोखर जमून आली आहे. विक्रम-वेधा, हा एका हटके विषयावरचा सिनेमा, त्याच्या वेगळ्या हाताळणीसाठी नक्की पहावा, असाच आहे. हायली रेकमेंडेड!

© राज जाधव (१३-०१-२०१८)

Comments

Popular Posts