ग्रॅविटीच्या विरुद्ध धावणारा न्यूटन


भारतात राजकारण आणि त्या अनुषंगे मतदान यांना एक अनन्यसाधारण महत्व आहे. एखादी सीट मिळवण्यासाठी पक्ष, नेते आणि कार्यकर्ते कोणत्याही थराला जाऊ शकतात, हे आपण जाणतोच, मग त्यात मतदानाच्या वेळी पोलिंग बूथवर चालणारा गैरप्रकारही आला. कोणत्याही दहशतीशिवाय मोकळा श्वास घेऊ शकणाऱ्या शहरात / गावातही हे प्रकार सर्रास चालतात, मग मोजकी लोकसंख्या असलेल्या आदिवासी पाड्यात, नक्षलग्रस्त भागात काय होत असेल याची कल्पनाच केलेली बरी.

अशाच एका छत्तीसगढमधील नक्षलग्रस्त भागात वोटिंग बूथ मांडून केवळ ७६ लोकांच्या मतदानासाठी एक सामान्य, प्रामाणिक आणि आपल्या कामाशी एकनिष्ठ असा एक गव्हर्नमेंट क्लर्क 'न्यूटन'कुमार, प्रिसायडिंग ऑफिसर म्हणून जातो आणि त्याच्या तत्वांशी तडजोड न करता त्याला सोपवलेले काम, त्यात आलेले अडथळे शक्य त्या प्रकारे पार करत इमानदारीने करू पाहतो. हे इतकं साधं आणि सोपं कथानक.

राजकुमार रावच्या देहबोलीने 'न्यूटन' अत्यंत खुबीने पडद्यावर उभा केला आहे. त्याला तितक्याच ताकदीने साथ दिली आहे ती पंकज त्रिपाठी या भन्नाट अभिनेत्याने.

सध्या राजकुमार रावचे दिवस आहेत, विशेषतः हे वर्ष त्याने गाजवलंय. ट्रॅपड, बरेली की बर्फी, बेहेन होगी तेरी, न्यूटन आणि शादी में जरूर आना असे एकसे बढकर एक परफॉर्मन्स त्याने या वर्षी दिलेत. इथेही त्याचा 'न्यूटन' खूपच कंविन्सिंग वाटतो.

पंकज त्रिपाठीचा 'आत्मा सिंग' ही परफेक्ट जमलाय, लक्षात राहतो. सिस्टीम कोळून प्यायलेला पोलीस ऑफिसर, ही नस त्याने बरोबर पकडलीये. त्याचे कॅरेक्टर निगेटिव्ह किंवा कामाशी अप्रामाणिक नाहीये, तर तिथली परिस्थिती तो न्यूटनपेक्षा जास्त चांगल्या प्रकारे ओळखतो, त्यावरचे प्रतिबंधक उपायही त्याला माहिती आहेत, म्हणूनच त्याचे पडसाद त्याच्या निर्णयात दिसतात आणि नेमका यावरच न्यूटनचा आक्षेप आहे.

संजय मिश्राही इन्स्ट्रक्टरच्या छोट्याश्या भूमिकेत अगदी सहजतेने सामावला आहे. तो या रोलमध्ये इतका फ्लॉलेस वाटतो, की हा अभिनय आहे असे क्षणभरही भासत नाही. अंजली पाटीलची 'मल्को' आणि रघूबीर यादव यांचे सहाय्यक रोलही नेमके जमले आहेत. अंजलीच्या रोल जास्त महत्वपूर्ण आहे. रघूबीरच्या अभिनयक्षमतेच्या मानाने त्याचा रोल तसा कमी एक्सप्लोर झालाय, असं वाटतं. तो खूप ताकदीचा अभिनेता आहे, यात शंकाच नाही, पण मुळात इथे त्याला वाव कमी आहे.

एक मेजर ड्रॉबॅक म्हणजे त्याची ऑस्करसाठी झालेली निवड, या एका कारणासाठी आपण अपेक्षा उंचावून बघायला बसतो. अर्थात, तो निराश कुठेच करत नाही. चित्रपटाची लांबी अगदी पावणे दोन तास आहे तरीही सुरुवात स्लो वाटते. चित्रपटात वेळोवेळी, धक्कादायक असं काही घडतही नाही, पण तरीही तो हळूहळू परिणाम साधत जातो आणि शेवटी अत्युच्चबिंदू गाठतो.

न्यूटन, मला परफॉर्मन्स वाईज जास्त आवडला आणि त्यामुळेच तो एक कंम्प्लिट पैकेज म्हणून एक उत्तम चित्रपट झाला आहे. कंम्प्लिट पैकेज याचा अर्थ मनोरंजन नक्कीच नाही, कारण अश्या चित्रपटात ती अपेक्षा नसतेच. पण 'न्यूटन' एक छोटासाच तरीही असामान्य असा मेसेज नक्कीच देऊन जातो, 'मार्गात येणाऱ्या सर्व संकटांना तोंड देत, आपल्याला सोपावलेले काम प्रामाणिकपणे करणे' आणि तो इतक्या प्रखरतेने जाणवतो की चित्रपट संपला तरी तो आपल्या डोक्यात चालूच राहतो, विशेषतः अखेरचा सीन.

अमित मसुरकरचा नावाजलेला 'सुलेमानी किडा' पाहायचा राहिला आहे. आता न्यूटननंतर तो पहायची इच्छा द्विगुणीत झाली आहे. काहीतरी वेगळे आणी खास पाहायची इच्छा असणाऱ्यांनी 'प्रवाहाच्या विरुद्ध धावणारा न्यूटन', हा अनुभव चुकवू नये.

© राज जाधव (०७-१२-१७)

Comments

Popular Posts