मानगरम, एका शहराची जगण्याची धडपड


'For every action, there is an equal and opposite reaction'.

न्यूटनचा तिसरा नियम.

प्रत्येक क्रियेच्या बदल्यात तितक्याच ताकदीची प्रतिक्रिया अपेक्षित असते. हेच, बहुतांशी माणसांनी केलेल्या कृतीबद्दलही लागू होते. आपण केलेल्या एखाद्या कृतीचे परिणाम एखाद्याच्या दैनंदिन जीवनात, तो घेत असलेल्या निर्णयात शिवाय कधी कधी पूर्ण आयुष्यावरही पडू शकतात. कारण आपल्या सर्वांचे जीवनमान एकमेकांच्या जगण्याशी आणि एकमेकांनी घेतलेल्या निर्णयांशी संलग्न आहे.

नेमकी हीच बेसिक थीम पकडून 'मानगरम' ची कथा पुढे सरकते. 'मानगरम' म्हणजे महानगर, शहर. ही एका शहराची गोष्ट आहे, चेन्नई शहराची. शहरातल्या अनेक पात्रांची जी एकमेकांशी निगडीत आहेत, काही प्रत्यक्ष तर काही अप्रत्यक्षपणे आणि त्यामुळेच त्यांच्या कृतीचा परिणाम त्यांच्या आणि इतर पात्रांच्या आयुष्यावर होत असतो.

चार महत्वाची पात्रे आहेत, ज्यांच्याभोवती कथा फिरत राहते. एक, लहान शहरातून चेन्नईमध्ये एका सॉफ्टवेयर कंपनीत नोकरीसाठी आलेला युवक (श्री). नोकरी मिळवून सेटल झाला तर तो त्याच्या प्रेयसीच्या बापाच्या नजरेत लायक बनू शकेल. तो ज्या कंपनीत इंटरव्ह्यूसाठी आला आहे तिथे एक एच आर मॅनेजर आहे, हे दुसरं पात्र (रेजिना). तिच्या मागे, तिच्यासाठी वेडा असणारा दुसरा एक तरुण, जो केवळ टवाळक्या करत फिरत असतो, ते तिसरं पात्र (सुदीप). तिलाही तो आवडत असतो पण त्याच्या बेजबाबदार वागण्यामुळे ती त्याला टाळत असते. त्याच सॉफ्टवेअर कंपनीत नव्यानेच जॉईन झालेला एक कॅब ड्रायव्हर, चौथं पात्र (चार्ले). ही कॅब पी.के.पी. ट्रॅव्हल्सकडून भाड्याने घेऊन तो चालवत आहे. पी.के.पी हा चेन्नईतील बलाढ्य गुंड आहे, त्याच्या नावानेच भले भले गारद होतात.

रेजिनावर नजर ठेवणारा एक गुंड सुदीपला तिच्यावर ऍसिड टाकण्याची धमकी देतो आणि त्याबदल्यात सुदीप त्याची धुलाई करतो. बदला घेण्याच्या इराद्याने तो गुंड, बारमध्ये बसलेल्या सुदीपला मारण्यासाठी अजून चार टाळकी बोलावतो, पण गैरसमजाने श्री ला बदडण्यात येते, त्याचा मोबाईल चोरून, सर्टिफिकेटची बॅग हिसकावून नेण्यात येते. एका दिवसात सर्टिफिकेट जमा केले नाही तर त्याची नोकरी जाणार हे पक्के असते. रेजिनावर ऍसिड टाकण्याची धमकी देणाऱ्या गुंडावर सुदीप ऍसिड फेकतो आणि अप्रत्यक्षपणे त्याची मदत केली म्हणून पोलीस श्रीला त्याचा साथीदार समजून पकडतात.

तिकडे श्रीला बारच्या बाहेर बदडणारे तिघे, एका नवीन साथीदाराला घेऊन एका श्रीमंत बापाच्या पोराला किडनॅप करायचा प्लॅन करतात, पण गैरसमजुतीने पी.के.पी.च्या मुलाला किडनॅप करतात.

या सगळ्या गोंधळात प्रत्येक पात्र दुसऱ्या एका पात्राशी कोणत्या ना कोणत्या मार्गाने कनेक्ट होत शेवटी हा गुंता सुटतो, चित्रपट संपतो पण चित्रपटातील पात्रांचा संघर्ष संपत नाही.

सर्वात महत्वाची आणि अनोखी गोष्ट म्हणजे या चारही मुख्य पात्रांची नावे पूर्ण चित्रपटात समोर येत नाहीत. हे थोडेसे विचित्र वाटत असले तरी एक अभिनव प्रयोग आहे आणि चित्रपटाचा विषय लक्षात घेता उत्तम प्रकारे जमूनही आला आहे. कारण प्रत्येक जण शहरात वावरताना रोज अनेक व्यक्तींशी संपर्कात येतो, त्यातील प्रत्येकाचे नाव आपल्याला माहीत असतेच असे नाही.

पात्रे, कथा, त्याची मांडणी आणि एकंदर हाताळणी पूर्णता वेगळी असली तरी 'शहराशी जुळलेली नाळ' हा चित्रपटाचा गाभा आहे आणि हाच एक समान दुवा यापूर्वी आपण 'शोर इन दि सिटी' मध्ये पाहिला आहे. तो आवडला असेल तर हाही नक्कीच आवडेल.

- राज (२८-१२-२०१७)

Comments

Popular Posts