वेगळी वाट चोखंदळणाऱ्या तमिळ क्राईम मूवीज


मागच्या आठ-दहा दिवसात तीन जबरदस्त आणि रेकमेंड करता येतील असे क्राईम थ्रिलर पाहिले, योगायोगाने तिन्ही तमिळ.

'Dhruvangal Pathinaru' हा बऱ्याच दिवसांनी पाहिलेला एक उत्कृष्ठ फास्ट क्राईम थ्रिलर तर आहेच, शिवाय थ्रिलर जॉनरचा एक ठरलेला फॉर्म्युला यात दिसत नाही, ही अजून एक जमेची बाजू.

एका पावसाळी रात्री कोईम्बतुर शहरात वेगवेगळे गुन्हे / तक्रारी नोंदवल्या जातात, एक किडनॅपिंग, एक मिसिंग केस, एक एक्सिडेंट. तपास करता करता अनेक अतर्क्य धागे मिळत, शेवटी ते एकत्र गुंफले असल्याची खात्री होत जाते, पण ते कुणी, का आणि कसे केले, शिवाय मोटिव्ह काय, हे सर्व अंधारात असते. चित्रपट पाहत असताना प्रत्येक पात्राने सांगितलेले घटनाक्रम आणि चित्रपटातल्या इन्वेस्टीगेटिंग ऑफिसर्सच्या थियरीज 'रोशोमान'च्या मल्टिपल पर्सपेक्टिव्हने पुढे जाताना दिसतात. अशीच मल्टिपल पर्सपेक्टिव्हची मांडणी 'तलवार' मध्येही दिसली होती. पडदयावर आपल्याला पाहताना प्रत्येकाचा दृष्टिकोन पटतो, शिवाय कुठे कुठे आपलीही एक वेगळी थियरी बनते. पण अखेर या सगळ्याला छेद देत चित्रपट वेगळ्याच अनपेक्षित उंचीवर नेऊन संपतो. चित्रपट संपतो तेव्हा सर्व अर्धवट संदर्भांचा मेळ लागत, 'एव्हरी डिटेल काऊंट्स' ही टॅगलाईन सार्थक होते.

पोलीस ऑफिसर दीपकच्या भूमिकेत अभिनेता रहमान हे परफेक्ट कास्टिंग आहे, तो चित्रपटात अगदी सहज वावरलाय. तितकाच त्याचा असिस्टंट असलेला गौतम, 'दि मॅन विथ सिक्सथ सेन्स' देखील आपली छाप पाडतो. अंततः खरोखर कौतुक करायचे असेल तर ते डायरेक्टर 'कार्तिक नरेन' या अवघ्या २२ वर्षीय युवकाचे करायला हवे. कुठेही पकड ढिली न झालेला, धावता स्क्रीनप्ले, कसलीही अनावश्यक ना फ्रेम ना सीन, शून्य गाणी आणि अशा कथानकात अडथळा निर्माण करतात असे, आवर्जून टाळलेले इतर पॅरेलल कॉमेडी / रोमॅंटिक ट्रॅक, या सर्वांचा एकत्रित परिणाम म्हणून ही १०४ मिनिटे आपली छाप पाडून जातात.

Theeran Adhigaaram Ondru, हा एका सत्य घटनेवर आधारित आहे. १९९५-२००५ च्या दरम्यान तामिळनाडू, आंध्रप्रदेश आणि कर्नाटक मध्ये बावरीया गँगची दहशत होती. ही गँग नॅशनल हायवेवर असणाऱ्या बंगल्यावर गस्त ठेवायची आणि योग्य वेळ आली की हत्यारांनी भरलेली ट्रक घेऊन, अपघात झाल्याचा बनाव करत मदत मागण्याच्या बहाण्याने टोळक्यांनी घरात घुसायची; पैसा, दागदागिने, ऐवज तर लुटायचीच पण अत्यंत निर्घृणपणे घरातल्या प्रत्येक व्यक्तीचा खून पाडायची.

या गँगची इतकी दहशत होऊनही, जेव्हा एका डीएमके आमदार आणि काँग्रेस लिडरच्या घरावर दरोडा टाकून खून झाले, तेव्हा पोलीस आणि जयललिता सरकार खडबडून जागे झाले. या गँगचा पसारा दोन तीन राज्यांपुरता मर्यादित असला तरी, या तिन्ही व आजूबाजूच्या राज्यातल्या गुन्हेगारांच्या डेटाबेसमध्ये एकाशीही साधर्म्य असणारे कुणी सापडत नव्हते, म्हणून पूर्ण देशातल्या गुन्हेगारांचे रेकॉर्ड्स तपासण्यासाठी एक स्पेशल टास्क फोर्स तयार करण्यात आले. अशातच पोलिसांना एक धागा सापडला आणि त्यांनी त्या गँगपर्यंत पोचत, प्रत्येक सदस्याला नेस्तनाबूत केले.

जोशी-अभ्यंकर या पुण्यातील एकाच प्रकरणाची व त्यावरील आधारित 'माफीचा साक्षीदार' आणि 'पाँच' या चित्रपटांची दहशत आजही अनेकांच्या मनात दडपून आहे, त्या तुलनेत साधारण दहा वर्षे या टोळीने हायवेवर काय हाहाकार माजवला असेल, ही कल्पनाच केलेली बरी.

ही सर्व कामगिरी ज्याच्या नेतृत्वाखाली झाली त्या पोलीस ऑफिसरचा रोल 'कार्ति' ने उत्तम वठवला आहे. पण त्याहीपेक्षा लक्षात राहतो तो अभिमन्यू सिंगने साकारलेला त्या टोळक्याचा म्होरक्या. चित्रपटातील रोमँटीक ट्रॅक, अनावश्यक गाणी आणि काही टिपिकल साऊथ इंडियन ऍक्शन सिक्वेन्सेस टाळले असते तर हा अजून रियलिस्टिक, फास्ट आणि कॉम्पॅक्ट झाला असता.

'Thupparivalan' ही एक उत्कंठावर्धक क्राईम बेस्ड डिटेक्टिव्ह मुव्ही आहे. चित्रपटाच्या सुरुवातीला एका सॉफ्टवेयर इंजिनियरचा त्याच्या घराच्या टेरेसवर वीज पडून मृत्यू होतो. दुसऱ्या एका प्रसंगात एका एसीपीचा पोलीस कोंफरेन्स चालू असताना अचानक जागेवर कोसळून गूढरीत्या मृत्यू होतो. पुढच्याच सीनमध्ये डिटेक्टिव्ह 'कनियन' उर्फ 'कनी' मनाजोगती केस मिळत नाही म्हणून त्रागा करत असताना एक लहान मुलगा त्याच्या कुत्र्याला कुणीतरी गोळी घालून मारल्याची केस त्याच्याकडे आणतो आणि कनी तो आश्चर्यकारकरित्या ती स्वीकारतो. घटनास्थळावर गेल्यावर त्याला तिथे एक गळून पडलेला 'दात' सापडतो. त्याचा माग काढत कनी, त्याच्या मालकापर्यंत पोचायचा प्रयत्न सुरू करतो, तेव्हा सॉफ्टवेयर इंजिनियर, एसीपी आणि इतर बरेच प्रश्न सुटत जातात. यामुळे कथानकाचे एकेक नवीन पदर उलगडत जातात आणि एक अनपेक्षित सत्य समोर येतं. या सगळ्यात कनी या सर्व कृत्यात सहभागी असणाऱ्या एकेक टीम मेंबर्स पर्यंत पोचत अखेरीस डेव्हिल नामक त्यांच्या शांत डोक्याच्या संयमी तरीही तितक्याच खतरनाक म्होरक्यापर्यंत पोचतो आणि त्याला संपवतो.

एक डिटेक्टिव्ह मुव्हीचे सगळे फॉर्म्युले यात आपल्याला सापडतात. वेगवान कथानक आणि लहान सहान गोष्टीत काय झाले असेल किंवा होऊ शकते याबाबतीत कनीचे इंटरप्रिटेशन आणि उत्तम जमलेला क्लायमॅक्स यामुळे चित्रपट आपली पकड कायम धरून ठेवतो. मिस्किनच्या दिग्दर्शनात विशालने साकारलेली लहरी, रागीट, इंपेशंट तरीही सजग डिटेक्टिव्हची व्यक्तिरेखा जमून आली आहे.

हिंदी चित्रपट त्याच त्या पठडीत अडकत चालल्यामुळे, हे चित्रपट विषयाची वेगळी मांडणी, उत्कृष्ठ स्क्रीनप्ले, दमदार परफॉर्मन्स आणि दखलपात्र दिग्दर्शन या गोष्टींमुळे नक्कीच एक वेगळी वाट साकारताना दिसतात.

© राज जाधव (२७-१२-२०१७)

Comments

Popular Posts