७० एम एम चा इडियट बॉक्स


चित्रपट हे एक खूप प्रभावी माध्यम आहे. यात जे दाखवले जाते, ते खूप खोलवर रुतून बसते, वर्षोनवर्षं साठवून ठेवले जाते, आठवले जाते, आचरणातही आणले जाते, म्हणून याचे फायदेही आहेत आणि दुष्परीणामही.

शाळेत शिकण्यापूर्वीच हिंदी चित्रपट पाहून हिंदी शिकणारी पिढी आपली. हिरोची पर्सनॅलिटी, त्याच्या अफाट करामती, हिरोईनला भुरळ आणि गुंडांना जमिनीवर पाडणारे त्याचे कारनामे पाहून आपण प्रेरीत झालो नसतो, तर नवलच. मग, कपड्यांची-हेयरस्टाईलची नक्कल, त्याच्या चालण्या बोलण्याची लकबी आपोआप आत्मसात होणार, त्याचे टाळ्या खाणारे डायलॉग्स, एखादी पंचलाईन लगे हाथ पाठ होणार. या सगळ्यांतून आपण नक्कीच गेलेलो आहे. आता या गोष्टी बालिश वाटत असतील पण तरीही चित्रपटातील इतर काही सेन्सिबल गोष्टी अजूनही भुरळ पाडत असतीलच.

काही ठराविक आणि स्तुत्य, अमोल पालेकर - फारूक शेख टाईप अपवाद सोडले तर एव्हरेजली अधिकांश प्रेक्षकांना सदैव एक असामान्य ताकदीचा हिरो पाहायची सवय झाली आहे (अर्थात सध्याचा प्रेक्षक बऱ्यापैकी सुज्ञ होतोय हे त्यातल्या त्यात बरे). तो कितीही रद्दड दिसत असला, त्याची परिस्थिती कितीही गरीब असली तरी तो बडे सेठकी बेटीला सहज पटवतो, तिच्या बापाच्या नाकासमोर टिच्चून तिच्यासोबत फिरतो, तिला नाचवतो. काही हिरो, हिरॉइन्सचा पाठलाग करतात, त्यांना सळो की पळो करून सोडतात, त्यांच्या नाकी नऊ आणतात, तरी अखेर त्यांना तेच आवडतात. 'दिवाना', 'डर', 'अंजाम' हे प्रकार सगळे पडद्यावर दिसायला कसे थ्रिलिंग वाटतात. पण खऱ्या आयुष्यात असे कुणी केले तर?

कुणी एखाद्याला कितीही प्रेम करत असले तरी, मुलींच्या विरोधानंतरही, कॉलेजमध्ये त्यांचा पाठलाग करणे, चिठ्ठ्या लिहिणे, चारचौघात मस्करी करणे, समजावून सांगूनही एकतर्फी प्रेम करत राहणे, याचे समर्थन करायला हवेय का? विचार केला तर किती गंभीर बाब आहे ही आणि ही चित्रपटात किती सोयीस्करपणे दाखवली जाते. आपण ती आनंदाने हसत खेळत पाहतो हा तर वेगळाच चर्चेचा विषय.

गुन्हेगारी प्रवृत्तीच्या नायकांना लार्जर दॅन लाईफ दाखवणे आणि त्यांच्या भोवती एक सहानुभूतीपूर्वक वलय आखणे, हाही त्यातलाच एक प्रकार. मध्यंतरी अशा सिनेमांची लाटच आली होती. तरी 'सत्या', 'वास्तव' अश्या चित्रपटांत किमान यांचा शेवट वाईटच असतो हे अधोरेखित केले आहे हे नशीब, तरीही त्यांच्या फॅसिनेटेड लाईफने अनेकांना भुरळ पाडलीच की.

नुकत्याच आलेल्या 'दंगल'मध्येही मला एक गोष्ट मेजर खटकते, दर वेळी ती डोळ्याआड करत राहतो, पण मनातून काही जात नाही.

महावीर सिंग फोगाट तसा लढवैया माणूस, आयुष्यात खूप झगडलेला, स्वतःच्या परिवारावर अफाट प्रेमही असणारा, तरीही स्वतःच्या हट्टापायी पोटच्या मुलींना त्यांचे खेळण्या बागडण्याचे वय, स्वातंत्र्य, निरागसता लिटरली मातीत मिसळायला लावून त्यांच्या मनाविरुद्ध कुस्ती करायला भाग पाडणे, हा किती मोठा स्वार्थ आहे.

'हानिकारक बापू' हे गाणं जरी पडद्यावर गमतीशीरपणे दाखवण्यात आले असले तरी, त्यातील गीता-बबिताचं दुःख, असहाय्यता लपत नाही. मनाजोगतं खाण्यास बंदी, मुलींचं पूर्ण आयुष्य स्वतःच्या ध्येयापायी पणाला लावणे, इच्छेविरुद्ध केस कापणे, मुलांशी कुस्ती खेळायला लावणे, एका अर्थी विचार केला तर हा एक प्रकारचा छळच आहे, टॉर्चर आहे. फरक इतकाच की कालांतराने बापाची इच्छा म्हणून म्हणा किंवा अजून काही, पण गीता बबीतानेही बापाच्या स्वप्नाला आपलेसे मानून ते पूर्ण केले म्हणून आपल्याला त्यातली दाहकता दिसत नाही.

याच आमीरने 'तारे जमीन पर' आणि 'थ्री इडियट्स'मध्ये 'मुलांना जे हवे ते करू द्या' असा युक्तिवादही मांडला आहे, हाच संदेश पुढे 'सिक्रेट सुपरस्टार'मध्येही आहे. ही अशी चित्रपटांची जमेची बाजूही असते.

प्रत्येक गोष्टीच्या दोन बाजू असतात, एक चांगली आणि एक वाईट. फक्त समोर कोणती दाखवली जाते, यावरून महत्वाची कोणती, हे सोयीस्कररीत्या आपल्यावर बिंबवले जाते, आपल्याही नकळत.

काय घ्यायचे ते आपण ठरवायला हवे आहे.

© राज जाधव (११-१२-२०१७)

Comments

Popular Posts