सत्याण्णवच्या डायरीतून


१९९७ हे सिनेमाच्या दृष्टीने एक महत्वाचे वर्ष होते आणि पर्सनली माझ्यासाठीसुद्धा. या वर्षी बरेच ब्लॉकबस्टर सिनेमे तर आलेच, पण याच वर्षांपासून मी सिनेमांबद्दल नोंदी ठेवायला सुरुवात केली होती, म्हणजे या आधीही ठेवायचो, पण अगदी लिहून वगैरे ठेवण्याची सुबुद्धी या वर्षापासून झाली. माझ्यासाठी अगदी '१९९७ पूर्वी' आणि '१९९७ नंतर' हे असे चित्रपटांचे वर्गीकरण आपोआप करता येईल, इतपत या वर्षातील सिनेमे लक्षात राहीले आहेत.

ऍक्शन चित्रपटांबद्दल बोलायचं झालं तर बॉर्डर आणि जिद्दी हे चित्रपट त्यावेळी आवडलेले. 'बॉर्डर' तुफान गाजलेला तर जिद्दीही चांगलाच हिट झालेला आणि लक्षात राहिलेला चित्रपट.

जे. पी. दत्ताचा 'बॉर्डर' हा मल्टीस्टारर असला तरी आपल्या नेहमीच्या दमदार आणि आगपाखड शैलीमध्ये छाप पाडून जातो तो सनीपाजीचा कुलदीप सिंग, याशिवाय स्मरणात राहतं ते अक्षय खन्नाचं सरप्राईज पैकेज. जावेद साब- अनु मलिक यांचं 'संदेसे आते हैं' ने त्यावेळी सर्व पुरस्कार पटकावले असले तरी मला कायम स्मरणात राहीले ते 'हमे जब से मोहब्बत हो गयी हैं' हे पूर्ण गाणं, त्याचं पिच्चरायझेशन, त्यातलं विशेषतः 'मैं खेतों में बनी पगडंडीयो पर' हे कडवं आणि कधी नव्हे ती यात आवडलेली पूजा भट्ट.

सनीपाजीचा 'जिद्दी'ही एक टिपिकल सनी ऍक्शन फिल्म. 'घायल'च्या अजय मेहरा आणि 'घातक'च्या काशीचा वारसा पुढे नेणारा देवा यात दिसला. त्यानंतरही गुड्डू धनोवा आणि सनी या दोघांनी त्याच ट्रॅकवर सलाखें, जाल, बिग ब्रदर देण्याच्या प्रयत्न केला पण, ती मजा आली नाही. चित्रपट सनीसाठी नक्कीच पाहण्यासारखा आहे, पण अनपेक्षितपणे तितकाच भाव खाऊन गेलाय तो आशिष विद्यार्थीचा एसीपी इंदर सक्सेना.

कॉमेडीच्या दृष्टीनेही हे वर्ष धमाल होतं. डेव्हिड धवनने 'दिवाना मस्ताना', 'हिरो नंबर वन', 'जुडवा' आणि 'मि. अँड मिसेस खिलाडी' च्या साहाय्याने एक जबरदस्त चौकार लगावला होता. डेव्हिड-गोविंदा त्यांच्या टॉप फॉर्ममध्ये होते, अगदी एखादा अपवाद सोडला तर त्यांनी फ्लॉप हा प्रकार पाहिलेला नव्हताच.

१९९५ च्या 'कुली नं. १' पासून सुरू झालेली ही सिरीज दोघांनी या वर्षी 'हिरो नं १' ने पुढे नेली. बराचश्या, ऋषीकेश मुखर्जींच्या 'बावर्ची' वर बेतलेलं कथानक डेव्हिड स्टाईलने फिरवून त्यात गोविंदाछाप तडका देऊन सादर केले गेले आणि एक जबरदस्त प्रॉडक्ट् तयार झाला.

त्याच बरोबर 'दिवाना मस्ताना' मध्ये गोविंदा आणि अनिल कपूरची जुगलबंदीने चित्रपटात जान आणली. आनंद बक्षी-लक्ष्मीप्यारे या जोडीचा बहुतेक शेवटचा चित्रपट असावा. यातली 'तेरे बिना दिल लगता नही', 'ये गया वो गया', 'ओ मम्मी डॅडी', 'तो हंगामा हो गया' ही गाणी अगदी श्रवणीय नसली तरी आवडतात, काळाचा महिमा, दुसरं काय!

डबल सलमानचा 'जुडवा' ही एक क्रेझ होती त्या काळात, लहान असल्याने एक टाईमपास म्हणून तेव्हा आवडलेला (नंतर बालिश वाटला हा विषयच वेगळा, असो). काहीही अर्थ नसलेली तरीही गुणगुणत रहायचो अशी गाणी, अनु मलिक पेटलेलाच होता जणू. 'टन टना टन' आणि 'उंची हैं बिल्डिंग' ही गाणी जणू एंथम होती त्या वेळी.

बाकी तीनच्या तुलनेत 'मि. अँड मिसेस खिलाडी' चालला नाही. कारण, तेव्हा अक्षय कुमार हा 'ए' क्लास बँकेबल स्टार नव्हता. त्याचं नशीब २००० ला त्याची वाट पाहत बसलेले होते, त्याला अजून वेळ होता. पण ही एक टिपिकल डेव्हिड धवन फिल्म असल्याने पाहिली होती.

या वर्षी कॉमेडीमध्ये सर्वात जास्त नावाजलेल्या दोन फिल्म्स होत्या, 'ईश्क' आणि 'चाची ४२०'. 'ईश्क'ने एक अविरत हास्याची लाट आणली, वीस वर्षे उलटूनही त्यातले काही आयकॉनिक सीन्स आजही अजरामर आहेत. आमिर-जुही आणि अजय-काजोलची केमिस्ट्री शिवाय रजाक खान-देवेन वर्मा, बँक मॅनेजर टिकू टलसानिया, छब्बीस, मरा मरा अश्या असंख्य मेमरीज कायम स्मरणात राहतील.

'चाची ४२०' ही आउट अँड आउट, सर्वेसर्वा श्रीयुत /श्रीमती कमल हसन उर्फ जयप्रकाश पासवान उर्फ लक्ष्मी गोडबोलेची मुव्ही असली तरी, जॉनी वॉकरचा दारुडा जोसेफ, परेश रावलचा लक्ष्मीवेडा घरमालक, अमरीश पुरीचा सुरुवातीचा कडक आणि नंतरचा पाघळलेला दुर्गाप्रसाद आणि या सर्वांवर कडी करणारा ओम पुरीचा क्लासिक बनवारी यांचाही तितकाच आहे.

राम गोपाल वर्माचा 'दौड' हाही याच वर्षीचा, रंगीला नंतर उर्मिला त्याच वेशात आणि आवेशात पुन्हा दिसली ती यात. दौड हा १९९३ च्या अरेस्टनंतर संजय दत्तचा पहिला मुव्ही असावा. चित्रपट चालला नाही, पण मला त्यातला कॉमेडी ट्रॅक आवडतो, विशेषतः नीरज वोराचा 'मेरे पिताजी जो बहोत बडे शिकारी थे' हा सीन आणि परेश रावलचे काही वन लायनर्स, अफाट.

पण, खऱ्या अर्थाने हे वर्ष कुणी गाजवलं असेल तर ते शाहरुखने. रोमॅंटिक 'दिल तो पागल हैं' आणि 'परदेस' सोबत ऍक्शन-इमोशनमिश्रित 'कोयला' आणि माझा ऑल टाईम फेवरीट 'येस बॉस'.

'दिल तो पागल हैं' च्या गाण्यांनी सर्वांना प्रेमात पाडलं, आजही त्यातली एखादी धून जरी वाजली की गुणगुणल्या शिवाय राहवत नाही. राहुल-पूजा-निशा आणि माया, कायम स्मरणात राहतील. सर्वात उल्लेखनीय म्हणजे 'माधुरी', तिचा स्क्रीन प्रेझेंस, तिचे टिपिकल सलवार-कुर्ती-ओढणीवाले सिग्नेचर ड्रेसेस, तिचं निखळ हास्य, डान्स करताना तिची एनर्जी, सगळंच एकंदर न विसरण्यासारखं.

मग आला 'परदेस'. सुभाष घई, आवर्जून उल्लेख करावा इतका मला कधीच आवडला नाही, कारण तो त्याच त्या पठडीत चित्रपट करत आला आहे असे मला वाटते. सुरुवातीचे कर्ज, कालीचरण ठीक, नंतर 'राम लखन' दिवारवरून उचललेला, 'कर्मा' शोलेवरून आणि पुढचेही एकाच साच्यातले प्रकार. 'परदेस'ही अगदी खास वाटला नसता, पण शाहरुखचा अर्जुन आणि नदीम-श्रवणचं श्रवणीय संगीत यांनी त्याला तारलं.

'येस बॉस' हा खूपच मनाजवळचा चित्रपट, यावर एकदा स्वतंत्रपणे मनसोक्त लिहिणार आहे. कभी हा कभी ना च्या सुनील इतकाच यातला राहुल जोशी आवडतो, तो त्याच्या साधेपणासाठी. जुही, आवडती या कॅटेगरीमध्ये कधी नव्हती, पण यात ती आवडून गेली. जावेद अख्तर आणि जतीन ललित यांची, किमान माझ्यासाठी तरी अजरामर गाणी. 'एक दिन आप युं', 'जाता हैं तू कहा', 'सुनिये तो', 'मैं कोई ऐसा गीत', 'चाँद तारे', सर्वच आवडती, नॉस्टॅलजीक आणि तोंडपाठ.

या सगळ्यामध्ये एक थ्रिलर 'गुप्त' आणि एक फॅमिली ड्रामा 'जुदाई' हे दोन चित्रपट वेगळ्या कंटेंटसाठी लक्षात राहिले. गुप्त, बॉबी एकंदर असह्य वाटण्या अगोदरचा असल्याने आणि एक उत्तम सस्पेन्स प्लॉट असल्याने शिवाय काजोलच्या परफॉर्मन्समुळे लक्षात राहिला होता. तसेच, जुदाईमध्ये, पैश्यासाठी आधी नवर्याला विकणारी आणि नंतर उर्मिलामुळे इनसिक्योर होणारी बायको श्रीदेवीने जबरदस्त वठवली आहे. सोबत परेश रावलची प्रश्नमंजुषा आणि जॉनी लिव्हर-उपासना सिंगचे अब्बा डब्बा चब्बा हे बोनस होतेच.

याच वर्षी प्रकाश झाच्या 'मृत्युदंड' आणि प्रियदर्शनच्या 'विरासत' मुळे दोन वेगळ्या प्रकारच्या मुव्हीजही पाहायला मिळाल्या, आवडल्या. मृत्युदंडमध्ये माधुरी आणि विरासतमध्ये अनिल कपूर आपली छाप पाडतात. कमल हसनच्या 'थेवार मगन' वर आधारित विरासतवरही एक विस्तृत लेख पेंडिंग आहे. जावेद-अख्तर आणि अनु मलिक यांच्या 'तारे हैं बाराती' आणि 'पायले छुनमुन' रचना कमाल आहेत. बाकी गुलाम ए मुस्तफा आणि यशवंतमध्ये नाना पाटेकरच्या डायलॉग्सने टाळ्या कमावल्या. काजोल, अरविंद स्वामी, प्रभुदेवाचा सपने चालला नाही, पण बऱ्याच प्रेक्षकांना आवडला, रहमानची गाणी गुणगुणली गेली.

तर, अश्या प्रकारे १९९७ म्हटले की या सर्व चित्रपटांची एक मालिकाच माझ्या नजरेसमोर सरकत राहते. माझ्यासाठी हे सर्वार्थाने संस्मरणीय वर्ष ठरले असल्याने हे ठराविक चित्रपट, चांगले-वाईट, जसेही असतील तसे, अगदी वीस वर्षांनंतरही, मनाच्या जवळ राहतील आणि कायम नॉस्टॅलजीक करत राहतील.

© राज जाधव (०१-१२-२०१७)

Comments

  1. उत्तम (आणि उपयुक्त) लेखाजोखा !
    धन्यवाद ! :)

    ReplyDelete

Post a Comment

Popular Posts