हे राम - रावणातील साकेत 'राम'


साधारण नव्वदीतला साकेत 'राम' मृत्यूशय्येला कंटाळून निपचित पडलेला आहे. त्याचा नातू आणि समवयीन तरुण डॉक्टर, दोघे मिळून त्याची देखभाल करत आहेत. नातू आजोबांकडून लहानपणापासून बर्याच गोष्टी ऐकत आला आहे, त्यातलीच एक आहे 'साकेत राम' ची. तो एक लेखक असल्याने, त्यावर एक पुस्तक लिहायचा त्याचा मानस आहे.

कथा सुरू होते १९४० च्या दशकात, स्वातंत्र्यपूर्व काळात. साकेत राम (कमल हसन) आणि अमजद अली (शाहरुख खान) पुरातत्व विभागात कार्यरत आहेत, फाळणीपूर्व सिंध भागात मोहोंजोदारो येथे. हळूहळू फाळणीचे वारे वाहू लागलेले आहेत, साकेत आणि अमजद दोघांचाही फाळणीला विरोध आहे. फाळणीनंतरही अमजदलाही भारतातच रहायची इच्छा आहे.

मोहोंजोदारोचे काम संपवून साकेत कलकत्त्याला, त्याच्या बायकोकडे, अपर्णाकडे जातो. कलकत्त्यात त्याला रस्त्यावरच मो. अली जिना यांच्या 'डायरेक्ट ऍक्शन डे' चे पडसाद उमटलेले दिसतात. अशाच एका प्रसंगात एका शीख मुलीला मुस्लिम समूहापासून वाचवून तो घरी परतल्यावर त्याच्या घरी काही मुस्लिम लोक हल्ला करतात आणि त्याच्या बायकोवर अत्याचार करून तिला जीवे मारून टाकतात. आधीच, फाळणी या विषयाने व्यथित झालेला साकेत, आता या प्रसंगाने अजून पेटून उठतो. रागाच्या भरात तो एका मुस्लिम युवकाचा पाठलाग करतो आणि त्याचा खून करतो.

इथे त्याची ओळख होते ती श्रीराम अभ्यंकर (अतुल कुलकर्णी) याच्याशी. अभ्यंकर एका राष्ट्रीय हिंदू गटाचा सक्रिय कार्यकर्ता आहे. या सगळ्या प्रकाराला कसे प्रत्यक्षपणे मुस्लिम आणि अप्रत्यक्षपणे गांधी जबाबदार आहे, हे साकेतला पटवून हिंदुत्वाचा हवाला देत, अभ्यंकर साकेतच्या विझलेल्या वैयक्तिक प्रतिशोधाला वैश्विक बनवतो आणि साकेत त्यांच्या या लढाईत सामील होतो.

दरम्यान कुटुंबाच्या हट्टापायी तो मैथिली (वसुंधरा दास) हिच्याशी लग्न करतो. वसुंधरा ही गांधीवादी परिवारातील आहे. सुरुवातीला अपर्णाला न विसरू शकलेला साकेत, हळूहळू तिच्याही प्रेमात पडतो. अभ्यंकरच्या बोलावण्यावरून तो मैथिलीसह महाराष्ट्रात, गांधीला मारण्याच्या मिशनवर येतो आणि काही कारणास्तव अभ्यंकरला सोपवलेली ही जबाबदारी साकेत रामच्या खांद्यावर येते.

चित्रपटात नाते संबंधावर आधारित काही हळवे धागेही आहेत. साकेत-अमजद यांच्या मैत्रितील धागाही असाच. साकेत आणि अमजदमधील सोडा फॅक्टरीतील प्रसंग तर जेवढा अंगावर येतो तितकाच भावूक करून जातो. शाहरुख ने साकारलेला अमजद हा देखील चित्रपटाची एक हाईलाईट आहे.

असाच एक धागा आहे, साकेत आणि ललवाणी (सौरभ शुक्ला) यांच्या भेटीचा. रेल्वे फाटकावर फेरीवाला बनून फिरणारा ललवाणी आणि साकेतची भेट हा अजून एक इमोशनल मोमेन्ट आहे चित्रपटातला. सौरभ शुक्लाने जीव ओतलाय या सीनमध्ये.

साकेतला जागोजागी दिसणारी एक अंध मुस्लिम मुलगी सुद्धा अंगावर येते, शहारा आणते. तसाच साकेत राम दुसऱ्या लग्नानंतर परत कलकत्त्याला जातो, जुन्या घरात आलेले नवीन लोक पाहतो आणि सोहरावर्दी आणि गांधी यांच्या विरोधात निदर्शने करणाऱ्या मॉबच्या घोळक्यात उभे राहून गांधी आणि सोहरावर्दीला जाब विचारतो, तो सीनही आपली छाप पाडून जातो.

कमलने सर्व आघाड्यांवर बाजी मारली आहे, स्वातंत्र्यपूर्व काळातील दुवे जोडून लिहिलेली कथा, चित्रपटाच्या गरजेला साजेसं इलाईया राजाचं संगीत आणि बॅकग्राउंड स्कोर, पिरियड ड्रामाला सूट व्हावे असे सेट्स, नजर मोहावणारं कॅमेरावर्क, कुठेही पकड न सोडलेली पटकथा, काही भडक प्रसंग टाळता केलेलं संयत दिग्दर्शन आणि या उपर एकाहून एक कसलेल्या अभिनेत्यांचा तोडीस तोड अभिनय, हे सगळंच जमून आलेलं आहे.

आपल्या बायकोवर झालेल्या अत्याचाराचा बदला घेण्यासाठी एका मुस्लिम युवकाला मारणारा साकेत राम, ते फाळलीला आणि या सर्व मृत्यूच्या तांडवाला गांधीच जबाबदार आहे हे पटल्यानंतर ज्याला संपवण्याची जबाबदारी घेणारा साकेत राम, ते अंततः 'सत्याची खरी ओळख' झाल्यानंतर पश्चात्ताप करणारा, गांधीजींच्या पुढे आपण करू घातलेल्या गुन्ह्याची कबुली देण्यास कसलाही संकोच न वाटणारा, आपल्यातल्या रावणावर मात करून खरोखर 'राम' ठरलेला साकेत राम, हा सर्व प्रवास म्हणजे..'हे राम..!'.

आपल्यामध्ये असणाऱ्या आदर्श 'गांधी'ला मारून रावण व्हायचं की रावणाला मारून 'राम', हे ज्याच्या त्याच्या हाती असतं.

"देख तज के पाप रावण, राम तेरे मन में हैं
मन से रावण जो निकाले, राम उसके मन में हैं.."

- राज जाधव (०७-११-२०१७)

Comments

Popular Posts