तितली - सुरवंटापासून फुलपाखरापर्यंतचा प्रवास


'दिल्ली का ठग' हा शब्द सर्वश्रुत आहे. यावर फार पूर्वी किशोरदा आणि नूतन यांचा एक चित्रपटही येऊन गेला. तुम्ही जर दिल्लीला किमान एकदा तरी जाऊन आला असाल, तर या शब्दाचा खरा अर्थ कळेल. मला स्वतःला दिल्लीबद्दल खूप वाईट अनुभव आलेले आहेत. दिल्लीमध्ये प्रत्येक जण तुम्हाला फसवायला बसलेला असतो, बकरा शोधत. रिक्षा, टॅक्सी, हॉटेल-दुकानवाल्यापासून ते अगदी बिसलेरी विकणारा एखादा हाफ तिकीट मुलगाही त्याच बेतात असतो.

दिल्लीतल्या लोकसंख्येचा आणि प्रदूषणाचा प्रश्न तर नेहमीच ऐरणीवर असतो. जसे कामाच्या शोधात माणसाचे लोंढे मुंबईत दाखल होतात, तसेच ते दिल्लीतही येतात. आत्ता दिल्लीचा आवाका, दिल्लीच्या सीमेबाहेर गुडगाव, नोएडा, फरिदाबाद, गाझियाबाद इथंपर्यंत वाढलेला आहे. अश्याच कारणांसाठी हातावर पोट असलेले परिवार दिल्लीत दाखल होतात आणि हाती मिळेल ते व्यवसाय करतात. पण प्रत्येकाला पोटापाण्यासाठी काही करायला मिळेलच, असे नाही किंवा मिळाले तरी ते पुरेसे असेल, असेही नाही.

असाच एक परिवार आहे, एक बाप (ललित बेहल) आणि तीन मुले. उपजीविकेचे साधन म्हणून केवळ नावाला छोटी मोठी कामे करणारे विक्रम (रणवीर शौरी) आणि प्रदीप उर्फ बावला (अमित सियाल) ही मोठी दोन मुले रात्री गश्तवर जात असतात. एखाद्या निर्मनुष्य रस्त्यावर गाडी अडवायची, त्यातल्या लोकांना मारहाण करायची आणि मिळेल तो ऐवज लुटायचा हे त्यांचे उद्योग.
'हमें जिंदा रहने के लिये कुछ ना कुछ करना पडता हैं' असे म्हणत, त्यांचे हे उद्योग ते जस्टीफायही करतात. 'तितली' (शशांक अरोरा) हा सर्वात छोटा मुलगाही त्यांना यात सामील असतो, पण नाईलाजास्तव. त्याला या सगळ्यातून बाहेर पडायचं आहे, त्यासाठी तो प्रयत्न करतोय आणि घरच्यांच्या अपरोक्ष काही पैसेही जमा करतोय. घरी कुणालाच, विशेषतः विक्रमला यातले काही कळायच्या आधी त्याला गाशा गुंडाळून पसार व्हायचंय. अश्याच एका 'गश्त'मध्ये प्रदीप आणि तितली पोलिसांना भिडतात आणि तितलीने साठवलेले सर्व पैसे चोरले जातात. विक्रमला, परिवार आणि या दहशतीच्या जीवनापासून दूर जाणाऱ्या तितलीचे इरादे कळतात आणि प्रदीपच्या सांगण्यावरून तो त्याचे लग्न करण्याचे ठरवतो. आपल्या 'टीम'मध्ये एक मुलगी आली तर धंद्यात फरक पडेल, शिवाय तितलीही बांधील राहील, कुठे जाऊ शकणार नाही, हा प्रदीपचा युक्तिवाद विक्रमला पटतो.

पूर्ण परिवार सभ्यतेचा आव आणत तितलीचे लग्न नीलू (शिवानी रघुवंशी) सोबत ठरते, होते. तिला या गश्तवाल्या उद्योगांबद्दल काडीमात्रही कल्पना नसते. याची कल्पना न देता जेव्हा हे तिघे एका गश्तला तिला सोबत घेऊन जातात तो प्रसंग अक्षरशः अंगावर येतो. त्यावेळेस तिची जी हालत प्रसंगात होते तीच आपली पाहत असताना.

नीलूला तिचा एक भूतकाळ आहे, ज्यासाठी तितली दोघांत एक प्रॅक्टिकल डील ठरवून तिची मदत करण्यास तयार होतो. अखेर आपली फॅमिली, यातून बाहेर पडण्यासाठी तो पाहत असलेले स्वप्न आणि नीलू यात त्याला एकाची निवड करावी लागते. दोघांचे अलगदपणे जुळणारे ऋणानुबंध हाही चित्रपटाचा एक नाजूक धागा आहे.

रणवीर शौरी हा एक असामान्य ताकदीचा अभिनेता आहे. त्याने रंगवलेला मोठा भाऊ चीड आणणारा तर आहेच, पण त्याची किळस यावी, तिरस्कार वाटावा असा आहे. पहिल्या प्रसंगात कारपेंटरशी भांडणारा, बायकोचा छळ करणारा, प्रसंगी बापालाही सुनावणारा, दोन्ही भावांना धाकाखाली ठेवणारा, गरज पडल्यास कानाखाली लगावणारा मोठा भाऊ दहशत वाटेल असाच आहे. प्रदीपने रोल थोडासा अंडरप्ले केला आहे, तरीही तो छाप पाडतो. तसाच ललित बेहल हा मोस्टली शांतपणे जे आसपास घडतंय ते पाहणारा, गरज वाटल्यास एखादा सल्ला देणारा आणि आपल्याच गोष्टीत मश्गुल असणारा दाखवलाय. एका सीनमध्ये घरात भांडण चालू असताना तो शांतपणे चहात बिस्कीट बुडवून खाताना दाखवला आहे. या सगळ्याचा पाया त्यानेच रचला असल्याचा स्पष्ट उल्लेख नसला तरी ते जाणवते.

पूर्ण चित्रपटभर वावरताना शशांकच्या चेहऱ्यावर अश्या जगण्याला कंटाळलेले, फ्रस्टेशनचे भाव दिसत राहतात. तो एकाही फ्रेममध्ये हसल्याचे आठवत नाही किंवा हसला असेलही तरी त्यामागचा भेसूर चेहरा लपत नाही. यावरून त्याला किती प्रकर्षाने या सगळ्यांपासून दूर जायचंय हे अधोरेखित होतं.

ओये लकी आणि एल एस डी मध्ये दिबाकर बॅनर्जीसोबत काम केल्यानंतर, कनू बेहल (ललित बेहलचा मुलगा) चा हा पहिला स्वतंत्र प्रयत्न. मन हेलावून टाकणाऱ्या या प्रयत्नाबद्दल त्याला नक्कीच दाद द्यायला हवी. दिल्लीमधल्या एका कारचोराच्या बातमीवरून कनू आणि शरत कटारियाला ही कथा सुचली.

छोट्या छोट्या नाल्यातून जाणाऱ्या गल्ल्या, दुर्गंधी आणि घाणीचे साम्राज्य असणाऱ्या कुजकट वस्त्या, त्यात त्याच लायकीचं त्यांचं घर या गोष्टी पाहायलाही असह्य होतात, जवळपास चौघांनीही दात घासताना काढलेल्या किळसवाण्या आवाजाइतक्याच. कार शोरूमच्या एका सीनमध्ये तितली घराचा अड्रेस सांगताना इतक्या कॅज्युअली 'नालीके पास' सांगतो, की त्या घाणीचं अस्तित्व त्यांच्या जगण्याचाही अविभाज्य घटक आहे हे लक्षात येतं.

पूर्ण चित्रपट तितली या मध्यवर्ती भूमिकेभोवती फिरतो. तितली नाव ठेवण्याची स्टोरीही इंटरेस्टिंग आहे, ती चित्रपटात येते, पण खऱ्या अर्थाने ते एक रूपक आहे.

सुरवंटाला जशी आस आहे फुलपाखरू होऊन भरारी घेण्याची, तशीच तितलीलाही आहे. कारण एकदा सुरवंटाचं फुलपाखरू झाल्यावर त्याला कुणी अडवू शकत नाही. तसाच शशांकचा सुरवंटापासून फुलपाखरु बनण्याचा प्रवास, म्हणजे तितली.

 © राज जाधव (०२-११-२०१७)

Comments

Popular Posts