अर्जुन रेड्डी - एका उध्वस्त प्रेमाची गोष्ट


तेलुगू सिनेमा म्हटल्यावर नजरेसमोर काय येतं? बहुतांश वेळा शहरी- निमशहरी भागात घडणारं कथानक, एक सामान्य दिसणारा तरीही अतिसामान्य कला अवगत असणारा प्रोटोगोनिस्ट हिरो, त्याच्यासोबत केवळ छान दिसायला नाचायला आणि अंगप्रदर्शन करायला गोरीगोमटी हिरोईन, तिचं प्रकाश राज, सयाजी शिंदे, प्रदीप रावत, मुकेश ऋषी व तत्सम विलेनसोबत असणारं कनेक्शन, या एका कारणामुळे हिरोने त्या विलेन आणि त्याच्या कंपूशी वैर घेणे, त्यांना भौतिकशास्त्राचे बहुतेक सर्व नियम लिटरली 'हाणून पाडून' लोळवणे, अश्यात अधेमधे एखाद्या कोमेडियनची (९९.९९ % ब्रम्हानंदम) चित्रपटात नसलेल्या स्टोरीशी पॅरलल स्वतःची काहीतरी स्टोरीलाईन आणि रेल्वेवर डान्स किंवा सॉंग सिक्वेन्स यांची ठिगळे जोडत, मारधाड करत शेवट करून अडीच तीन तासांची फुल मसाला भेळ, म्हणजे तेलुगू सिनेमा.

साधारण, २८ वर्षांपूर्वी, १९८९ मध्ये 'सिवा'ने तेलुगू सिनेमाची व्याख्या बदलल्याचे दाखले भूतकाळात सापडतात. मध्यंतरी पुन्हा भरमसाठ ट्रेडीशनल तेलुगू सिनेमे आले, चालले, अजूनही चालत आहेत, लोकांना आवडतही आहेत. मग प्रॉब्लेम काय आहे? प्रॉब्लेम हा की तेलुगू सिनेमा पुन्हा एकदा टाईपकास्ट झाला आहे. पण नुकताच याच ट्रेडीशनला छेद देणारा एक जबरदस्त सिनेमा तेलुगुत दाखल झाला आहे. 'अर्जुन रेड्डी'!

अर्जुन रेड्डी (विजय देवराकोंडा) हा एक मेडिकलचा विद्यार्थी, रादर एक निष्णात सर्जन होण्याचे सर्व गुण अंगी असलेला मेडिकलचा विद्यार्थी, शिवाय कॉलेज टॉपर. प्रॉब्लेम फक्त एक, रागावर नियंत्रण नाही, प्रचंड शीघ्रकोपी.

सिनियर असल्याने कॉलेजमध्ये त्याचा बोलबाला आहे, वट आहे. स्वतःच्या हेकेखोर स्वभावामुळे एका घटनेचा माफीनामा देण्यापेक्षा तो कॉलेजमधून रेस्ट्रीकेट होण्याला प्राधान्य देतो, पण निघण्याआधी त्याची नजर फ्रेशर प्रीती (शालिनी पांडे) वर पडते आणि तो थांबतो. एकतर्फी वाटत जाणारं अर्जुनचं प्रेम हळूहळू प्रीतीच्याही मनात घर करतं. ते दोघे, कॉलेज संपवून लग्न करायच्या बेतात असताना, एका गैरसमजामुळे आणि अर्जुनच्या रागामुळे दोघे दुरावतात.

अर्जुनचे कॅरेक्टर बऱ्याच अंशी देव डी मधल्या मॉडर्न देवदासशी मिळतेजुळते वाटते. हा समान धागा केवळ अर्जुनचं प्रेमातलं नैराश्य आणि व्यसनेच्या आहारी जाणे, इथवरच जुळतो, बाकी दोन्ही पात्रे स्वतःच्या लढाया स्वतंत्र लढतात. अल्कोहोल आणि ड्रग्ससोबतच तो शरीरसुखासाठीही एक्सट्रीम भुकेला आहे, पण त्यातही प्रेमाच्या आशंका दिसल्या की ते नातेही तो झिडकारतो.

चित्रपटातल्या काही गोष्टी अतर्क्य वाटतात, पण एकंदर बघण्याच्या ओघात पचून जातात, कारण त्या अर्जुनच्या विचित्र पात्राला जस्टीफाय करतात आणि त्याने त्या कन्वीक्शनने निभावल्याही आहेत.

खरे तर, विजयने ज्या इंटेन्सीटीने अर्जुन रेड्डी उभा केला आहे त्याला तोड नाही. वागण्या, बोलण्यातून, एक्सप्रेशन्समधून दिसणारी बेफिकिरी, जगाला फाट्यावर मारण्याची वृत्ती त्याने अगदी आत्मविश्वासाने निभावली आहे. तो इतक्या सहजतेने कॅरेक्टरमध्ये समरूप झाला आहे की ते आपल्या आसपासचं एक पात्र होऊन जातं. क्लीन शेव्ड कॉलेज युवक ते दाढी वाढवलेला सर्जन हे त्याचे ट्रान्सफॉर्मेशन जबरदस्त आहे. एकंदर विजय 'अर्जुन रेड्डी' हे पात्र जगला आहे.

राउडी, बेफिकीर, व्यसनाच्या-नशेच्या आहारी गेलेला, विरहाच्या आगीत जळणारा, तरीही आपल्या प्रेमाशी आणि प्रोफेशनशी प्रामाणिक असणारा 'अर्जुन', चीड आणणारा असला तरी त्यासोबत, सहानुभूती आणि कीव वाटावी असाही आहे.

प्रीतीपासून दुरावला आहे, तिने दुसरे लग्न केले आहे, बापाने घरातून हाकलले आहे, आई आणि भाऊ बापापुढे हतबल आहे, त्याच्या आज्जीलाही त्याचा कळवळा आहे, पण तिला वाटतेय, 'हे दुःख त्याचे आहे, हे त्याला भोगलेच पाहिजे', म्हणून तीही शांत आहे.

अशा परिस्थितीत, बाकीचे उद्योग करता करता तो एका हॉस्पिटलमध्ये सर्जन म्हणून काम करतोय. या सगळ्यात आवर्जून उल्लेख करावा अश्या मित्राची, शिवा (राहुल रामकृष्णा) ची त्याला साथ आहे. प्रत्येक सुख-दुःखात, चुकीच्या निर्णयात शिवा त्याच्यासोबत खंबीरपणे उभा आहे. कधी आंधळेपणाने त्याला मदत करण्यात, तर कधी त्याला शहाणपणाचे डोस पाजत, याच्या बदल्यात त्याचा अपमान झाला, मार खावा लागला तरीही. अर्जुननंतर खरोखर कुणी दखल घ्यावी असं काम केलं असेल तर ते शिवा यानेच.

प्रीतीचं कॅरेक्टर अर्जुनच्या अगदी कॉन्ट्रास्ट आहे तरीही त्यांची बॉंडिंग सहज वाटते. पहिल्याच चित्रपटाच्या मानाने तिचं कामही उल्लेखनीय आहे. पण हा चित्रपट केवळ 'अर्जुन रेड्डी'चा आहे, बाकी पात्र, संदर्भ दुय्यम वाटावेत इतका खोल प्रभाव तो एकटा पाडून जातो.

सबटायटल्ससोबत पाहत असतात बऱ्याच मर्यादा येतात. अश्यात प्रादेशिक टच / इसेन्स काही अंशी हरवतो, कित्येकदा पूर्ण संवाद फॉलो होतातच असेही नाही, अश्याने फ्लो आणि संवादाचा कथेतील नेमका रेफरन्स लक्षात येत नाही. त्यामुळे काही सीन्स अगदी फ्लॅट वाटून जातात, जे की अत्यंत महत्वाचे असू शकतात आणि जे दुसऱ्या, तिसऱ्या पाहण्यात क्लिक होऊन जातात. सबटायटल्ससोबत चित्रपट पाहण्याचा अजून एक मोठा तोटा म्हणजे प्रत्येक फ्रेम, त्याचे कथेतील संदर्भ, प्रत्येक एक्सप्रेशन्स, पडद्यावरच्या नेमक्या हालचाली टिपता येत नाहीत. अश्या काही गोष्टींसाठी मनाची तयारी केली किंवा त्या ओव्हरकम करण्यासाठी काही उपाय शोधले तर बराच फरक पडू शकेल.

चित्रपट वास्तववादी असला तरी वेगळा आहे. काही भडक दृश्ये, केवळ तरुणांना अपील करू शकतील (पण प्रौढांच्या डोक्यात जातील, सेन्सिबल वाटणार नाहीत) असे अर्जुनचे उद्योग बर्याच जणांना न पचण्याची दाट शक्यता आहे. देव डी किती जणांना झेपला होता? मलाही 'अर्जुन रेड्डी' तुकड्या तुकड्यात बोअर झाला, काही ठिकाणी पटलाही नाही, पण संपल्यावर ओव्हरऑल इम्पॅक्ट जाणवला.

तुम्ही केवळ मनोरंजन म्हणून पाहणार असाल तर हा तुमच्यासाठी नाहीये, प्लिज पाहू नका. पण, एका नवख्या दिग्दर्शकाचा (संदीप रेड्डी वंगा) वेगळा, प्रामाणिक, ब्रेव्ह आणि बोल्ड प्रयत्न, विजयने पूर्ण जीव ओतून साकारलेले अर्जुनच्या पात्राचे विविध शेड्स शिवाय सपोर्टींग रोलमध्ये शिवाची हळवी आणि मजबूत साथ, या गोष्टींसाठी  पाहायचा असेल तर नक्की पहा.

© राज जाधव (१८-११-२०१७)

Comments

Popular Posts