फास्टर फेणे - नायकाचा की खलनायकाचा?


आपल्या इंडस्त्रीत एक पिढीजात परंपराच आहे, जे बहुतांश सिनेमात जाणवतं. खलनायकाला नायकांपेक्षा थोडंसं वरचढ दाखवायचं. त्याची एक शैली दाखवायची, सिनेमाभर त्याचा ऑरा जाणवायला हवा अशी. काही ठराविक पंच लाईन्स किंवा हसण्याची, बोलण्याची एक विशिष्ट सिग्नेचर स्टाईल डेव्हलप करायची. पैसा आणि टाळ्या वसूल करणारे डायलॉग्स, काळीज फाडणारं बॅकराऊंड म्युझिक द्यायचं, ज्यानेकरून त्याची दहशत जाणवायला हवी. 

याउलट आपला हिरो बऱ्याचदा सभ्यतेचा पुतळा, सरळमार्गी, प्रामाणिकपणा आणि डिसेंसी, त्यातल्या त्यात हीच त्याची स्टाईल. मग पूर्वार्धात आपोआप खलनायक अनेक कुरघोड्या करण्यात यशस्वी होतो, त्याची छाप पडत जाते आणि नायक मागे पडतो. याची छाप सिनेमाभर जाणवत राहते. अखेरीस, अर्थात नायक असल्यामुळे एक शेवटचा डाव त्याचा असतो, पण तोवर एकंदर इफेक्ट पाहता, आपण खलनायकाला नायक करून बसलेलो असतो.

म्हणून 'मि. इंडिया' म्हटलं की अनिल-श्रीदेवी इतकाच, कधी कधी त्यांच्याही आधी मोगँबो आठवतो. 'शोले'मध्ये जय, विरु, ठाकूर इतकाच गब्बर लक्षात राहतो. डर म्हटलं की फक्त आणि फक्त शाहरुख समोर येतो, सनीपाजी आणि जुही सारख्या तगड्या स्टारकास्टपुढेही. 'परिंदा'चा नाना पाटेकर ठळक उठून दिसतो. अग्नीपथ कितीही अमिताभचा असला तरी कांचा चिनाचा उल्लेख आल्याशिवाय राहणार नाही. 'दुश्मन' आणि 'संघर्ष' ही नावे जरी उच्चारली तरी केवळ आशुतोष राणा नजरेसमोर येतो.

असंच काहीसं झालंय फाफेचं. गिरीश कुलकर्णीचा आप्पा पहिल्या सीनपासून स्क्रीन काबीज करतो. त्याचे बोलणे, ओरडणे, डोळ्यांनी आग ओकणे आणि पुढच्याच क्षणाला जोरदार किंचाळत हसणे या सगळ्यांची एक दहशत जाणवत राहते. त्याच बरोबर त्याची विनोदबुद्धीही त्याच्या अजून प्रेमात पाडते. एकंदर फेणेपेक्षा त्याची इमेज, त्याचा वावर आणि इफेक्ट पडद्यावर मोठा वाटत राहतो. याचा अर्थ अमेय वाघचा फेणे कुठे कमी पडलाय असे नाहीये. फेणेनेही आप्पाच्या तोडीस तोड काम केलं आहे, केवळ ते आप्पाइतके ठळकपणे अधोरेखित होत नाही. कारण पुन्हा तेच, आप्पाची दहशत बसावी असं त्याला दिलेलं फुटेज. 

आप्पाच्या प्रत्येक चालीला फेणेने त्याच्या शैलीत, टेक्नॉलॉजी वापरून डिजिटली मात केली आहे, शेवट तर मास्टरस्ट्रोक आहे (अर्थात हा बघण्याच्या ओघात पचतो, पण कितपत शक्य आहे हा भाग वेगळा).

फेणे आणि आप्पा दोघांनीही उत्तम काम केलं आहे. फेणेसाठी अमेय परफेक्ट फाईंड आहे, हे पटते, त्याने त्याचे कामही चोख केले आहे, कुलकर्णीच्या तोडीचा तोड.

फरक इतकाच की, आप्पा त्याच्या ग्रे शेडच्या रोलमुळे उठून दिसतो, लक्षात राहतो, छाप पाडतो आणि म्हणूनच आपण त्याला 'खाऊन टाकलाय' या कॅटेगरीत, आपल्याही नकळत बसवून टाकतो. दोघांचीही पात्रे पाहता दोघांनीही आपापल्या जागी योग्य काम केले आहे, एखाद्याला अमेयचं पारडं जड वाटेल, एखाद्याला कुलकर्णींचं.

© राज जाधव ३१.१०.१७

Comments

Popular Posts