मेरी प्यारी बिंदू - एक नॉस्टॅलजीक सफर


आर. डी., गुलजार, लता, रफी, किशोर कुमार, बप्पीदा, ओपी, आशा आणि त्या वेळेतले बरेचशे कॉम्बिनेशन्स यांनी मिळून एक काळ गाजवला, एकाहून एक अजरामर गीते दिली. काही धून तर आपल्या रक्तात इतक्या भिनलेल्या आहेत, की आजही एखादे गाणे सुरू जरी झाले तरी पहिल्या सेकंदात आपण ते पीक करतो आणि त्या दुनियेत हरवून जातो. 

अशीच एक नॉस्टॅलजीक कहाणी आहे, 'मेरी प्यारी बिंदू' या चित्रपटाची. 

ऍस्पायरिंग लेखक अभिमन्यू 'बुबला' रॉयच्या व्हॉइसओव्हरमध्ये, १९८३ पासून सुरू होणारा फ्लॅशबॅक हळूहळू त्याची, मैत्रीण कम ऍस्पायरिंग गायिका 'बिंदू'सोबतची प्रेमकथा साकारत, २०१७ पर्यंत पोचतो, तो प्रत्येक काळातील गाण्याची सफर घडवत.

बुबलाला लहानपणी दिसलेली, त्याच्या घराशेजारी राहायला आलेली मैत्रीण, त्यांचं तेव्हापासून जमलेलं बॉंडिंग, मैत्रीसाठी केलेले अतरंगी प्रकार, एकमेकांचं जवळ येणं, दुरावणं पुन्हा प्रेमात पडणं आणि एक अनपेक्षित तरीही जस्टीफाईड गोड शेवट (काही प्रमाणात 'ती सध्या काय करते'शी मिळते जुळते), या सर्व पार्श्वभूमीवर हलक्या फुलक्या प्रसंगात एकेक गाणी वाजत राहतात.

बिंदूच्या घराच्या छतावर असलेली एक अडगळीची खोली म्हणजे यांचा अड्डा. तिथल्या बऱ्याच गोंडस आठवणी जपलेल्या असतात दोघांनी आणि तिथं पोचायचा बुबलाचा रस्ताही ठरलेला, झाडावर चढून खिडकीतून आत यायचं. अश्याच एका वेळी, काही कारणांसाठी बिंदू घरापासून दूर राहत असताना बुबला त्या छतावरच्या खोलीत येतो आणि त्याला त्यांनी रेकॉर्ड केलेली एक जुनी कॅसेट सापडते, ज्यात त्यांची फेवरीट दहा गाणी सापडतात, सॉरी फेवरीट नाही 'त्यांच्या आयुष्याशी जुडलेली' दहा गाणी. 

अभी ना जाओ छोडकर..
सून सून सून सून जालीमा..
आईये मेहेरबान..
दो नैना एक कहानी..
देखा एक ख्वाब..
मेरे सपनो की रानी..
याद आ रहा हैं, तेरा प्यार..
ये कहा आ गये हम..

आणि अशी बरीच.. 

अशी गाणी सिनेमात वाजत राहतात आणि प्रत्येक वेळी आपण नॉस्टॅलजीक होतो. ते शब्द, ती धून, तो काळ आठवत राहतो आणि वाटतं याहून परफेक्ट काहीच असू शकत नाही.

चित्रपटात एक संवाद आहे. जेव्हा बुबला एक जुनी कैसेट दुरुस्त करायला म्हणून एका दुकानात जातो तेव्हा तो दुरुस्त करणारा म्हणतो..

"कुछ कॉम्बिनेशन ना इतना कमीना किस्म का होता हैं, अलग अलग मजा देता हैं मगर साथ में फाटाफाटी, मॅजिक सा हो जाता हैं..

संभालकर रखना, ऐसें कॉम्बिनेशन्स ना आजकल नही बनते"

'कमीना किस्मका कॉम्बिनेशन' काय सही उपमा दिलीये.

हा नॉस्टॅलजीक पार्ट सोडला तर चित्रपट एकदा पाहण्यासारखा आहे. आयुषमानने कमाल केली आहे (पाहायचा परिणीतीसाठी होता, तरीही). वयाच्या वेगवेगळ्या फेजेसमधला अभी पडद्यावर छान साकारला आहे. परिणीती गोड दिसते, बिंदू या कॅरॅक्टरला शोभते, चुलबुले रोल्स ती छान निभावते, पण तरीही 'छा गयी' असे वाटत नाही. 

जुन्या गाण्यांचा तडका सोडला तर ओरिजिनल गाण्यांत 'माना के हम यार नही' आणि 'अफिमी हैं तेरा मेरा प्यार' गुणगुणत राहावी अशी आहेत.

काही नात्यांचे आपल्या मनात, आयुष्यात एक अढळ स्थान असते, मग भले ते आपल्या आयुष्याचा भाग असो किंवा नसो. आपण आनंदी झालो की ती व्यक्ती आठवते, दुःखी झालो की तिचा खांदा शोधतो. 

काही नात्यांना नावे नसतातच, नसावीतच, फक्त हळव्या भावना जुडलेल्या असाव्यात. जसे बिंदू एकदा अभीला म्हणते, 'तू मेरा छतवाला कमरा हैं यार', अगदी तसेच.

© राज जाधव (३०-१०-२०१७)

Comments

Popular Posts