गर्दीश - नशिबाच्या चक्रव्यूहात अडकलेले एक स्वप्न


'हम न समझें थे बात इतनी सी
ख्वाब शीशे के, दुनिया पत्थर की'

किती व्यापक आहेत या जावेद साहेबांच्या ओळी, सर्व समावेशक.

आपण पाहिलेली स्वप्ने वास्तवात उतरवणे, यासारखे स्वप्नवत अजून काहीही नसेल. कारण, आपल्यातल्या किती जणांना हे शक्य होतं?

प्रत्येकाची काही ना काही स्वप्ने असतात, करियर निवडीबद्दल, पार्टनरबद्दल, स्वतःचं घर, चांगली नोकरी, कुटुंबासाठी निवांत वेळ, अशी असंख्य आणि अगणित स्वप्ने आपण आपल्या हृदयाशी कवटाळलेली असतात, अगदी जन्मापासून.

पण प्रत्यक्षात त्यातली किती पूर्णत्वास येतात? कधी आपली परिस्थिती, कधी पारिवारिक जबाबदाऱ्या, कधी हुकलेली संधी, तर कधी योग्य वेळी न सुचलेलं शहाणपण अशा किती तरी गोष्टींमुळे ही स्वप्ने बेवारशी राहतात. पण खरा अडथळा होतो तो या समाजाचा. समाज, तसं पाहिलं तर भौतिक अस्तित्व आणि चेहरा नसलेली एक संस्था. तरीही, हा समाज तुमच्या प्रत्येक निर्णयापुढे का वासून उभा असतो.

अशा या समाजाने भिरकावलेल्या दगडांमध्ये कधी आपली काचेची स्वप्ने विखरून जातात, ते आपल्यालाही कळत नाही.

असेच एक स्वप्न जगणारे शिवा आणि त्याचे बाबा. 
हेड कॉन्स्टेबल पुरुषोत्तम साठे यांचे स्वप्न आहे, त्यांच्या मुलाला, शिवाला इन्स्पेक्टर बनवण्याचे आणि नोकरीतून रिटायर होण्याआधी त्याला सलाम ठोकून निवृत्त होण्याचे. बापाच्या या स्वप्नात शिवाची तोलामोलाची साथ आहे, तोही हे स्वप्न जगतोय, ते साकार करण्यासाठी मनापासून झटतोय. 

सगळं काही आलबेल आहे, असे वाटत असताना, एक घटना घडते आणि त्याच्या स्वप्नाला वेगळीच कलाटणी मिळते. एके दिवशी शिवा, बिल्लानामक गुंड आपल्या बापाला शहराच्या मध्यवर्ती भागात भर चौकात मारतोय हे पाहतो आणि बेभान होऊन, आवेशात बिल्लाचा सामना करतो. इतकेच नाही तर अनवधानाने रागाच्या भरात त्याला जवळपास जिवानिशी मारतो. त्यातून बिल्ला वाचतो पण तो हॉस्पिटलच्या बाहेर येईपर्यंत, बिल्लाच्या जाचाला कंटाळलेले लोक शिवाला त्याच्या तोडीचा गुंड आणि स्वतःचा मसीहा ठरवून मोकळे होतात, तो बिल्लापासून त्यांची रक्षा करेल, या वेड्या आशेत.

जे काही झाले ते रागाच्या उद्वेगात झाले याची जाणीव झाल्यावर शिवा जितका या सगळ्यापासून दूर जाऊ पाहतो, तितका त्याचा पाय अधिकच या दलदलीत खोल रुतत जातो. त्याच्यासमोर, त्याच्या बापासोबत पाहिलेलं इन्स्पेक्टर बनण्याचं स्वप्न तर धुळीत मिळतंच पण त्याची स्वतःची गुन्हेगार म्हणून बापाच्याच पोलीस स्टेशनमधल्या कोठडीत रवानगी होते.

शेवटी सगळं काही रेतीप्रमाणे हातातून सुटतंय हे उमगल्यावर, शिवा घरच्यांपासून आणि बिल्लापासूनही दूर जातो, पण नियती त्याला पुन्हा बिल्लाच्या पुढे उभी करते. सुडाने पेटलेला बिल्ला शिवाला जीवे मारण्याच्या बेतात असतो. बापाला दिलेला शब्द राखण्यासाठी त्याच्या हातून निमूट मार खाणाऱ्या शिवाला पाहून, एक असहाय्य बाप  शिवाला शस्त्र हाती घेऊन बिल्लाला संपवण्याचे सांगतो आणि शिवा तो ते करतोही.

अखेरीस, शिवा आपल्या बापाला जिवाच्या आकांताने ओरडून सांगतो, की मला कधीही गुन्हेगार बनायचे नव्हते, तेव्हा आपलाच जीव तुटतो. हे शस्त्र तुम्ही हातात घ्यायला लावले. का? तर तुमच्या मुलाला कुणी मारत असताना तुम्हाला पहावले नाही म्हणून? मग माझे काय चुकले बाबा, जर मी माझ्या बापाला मारणाऱ्याच्या अंगावर धावून गेलो, त्याला मारले तर? 

शिवाचे 'मैं मुजरीम नही बनना चाहता था बाबा' हे शब्द कानात घुमत राहतात, काळीज चिरत राहतात. मित्र, परिवार, न्याय व्यवस्था आणि समाजाने मला गुन्हेगार बनवले हे तो बापाला ओरडून सांगतो. या सर्व प्रवासात शिवाच्या काचेच्या स्वप्नांचा चक्काचूर झाला असला तरी, त्याचापासून सर्व संबंध तोडणारा बाप, शेवटी त्याने केलेल्या कामगिरीबद्दल त्याला सॅल्युट ठोकतोच.

जॅकीने साकारलेला सुरुवातीचा शांत, संयमी, अजातशत्रू, गरीब स्वभावाचा आणि नंतर परिस्थितीने पिचलेला, कष्टी, हतबल झालेला आणि पेटून उठलेला शिवा, हा नक्कीच त्याच्या करियरमधला बेस्ट परफॉर्मन्स असेल. 

तितक्याच संवेदनशीलतेने अमरीश पुरी यांनी साकारलेला बापही. हा असाच बाप त्याने घातक मध्येही साकारलेला (त्यातला गळ्यात कुत्र्याचा पट्टा घातलेला सीन पाहताना दर वेळी डोळे पाणावतात).

जॅकी श्रॉफ आणि अमरीश पुरी यांच्या उत्तम अभिनयाने सजलेला, बाप आणि मुलाच्या नातेसंबंधावर नेमके भाष्य करणारा प्रियदर्शनचा 'गर्दीश' हा एक मनाच्या नाजूक कप्प्यात जपून ठेवावा आणि अधेमधे डोकावून पहावा, असा सिनेमा नक्कीच आहे. 

© राज जाधव | २६.१०.२०१७ | 

Comments

Popular Posts