शिवा - क्राईम जॉनरचा गेमचेंजर


दिग्दर्शनाची कोणतीही पार्श्वभूमी नसलेला एक तरुण, सिनेमा बनविण्याच्या वेडाने या इंडस्ट्रीत दाखल होतो काय आणि इथे येऊन अधिराज्य गाजवतो काय. ही खुद्द एखाद्या सिनेमाची कहाणी वाटत असली तरी ही एक सत्यकथा आहे, एका सिनेवेड्या दिग्दर्शकाची, राम गोपाल वर्माची.

सिव्हिल इंजिनियरिंगचे शिक्षण घेत असताना क्लासेस बंक करून चित्रपट पाहणे, हे त्याचे आवडते काम. बऱ्याच वेळा, काही विशिष्ट सीन पाहण्यासाठी तो एकच चित्रपट अनेकदा पाहायला जायचा. यातूनच त्याला दिग्दर्शनाचे प्राथमिक धडे मिळाले, असे म्हणायला हरकत नाही. इंजिनियर झाल्यावरही, आपल्या स्वप्नांना फाट्यावर मारत, काही काळ त्याने साईट इंजिनियरचं काम आणि नंतर पैसे कमविण्यासाठी नायजेरियाला पलायन करत नॉर्मल आयुष्य जगण्याचा प्रयत्न केला. पण, चित्रपटाचं वेड त्याला शांत बसू देत नव्हतं. अश्यातच हैद्राबादमध्ये एका व्हिडीओ पार्लरमध्ये त्याने त्याचे मन रमवले आणि काही दिवसात स्वतःचे व्हिडीओ पार्लर सुरू करून त्यातून आपली सिनेमाची भूक भागवू लागला.

नाही म्हणायला, त्याने १९८७ मध्ये आलेल्या 'कलेक्टर गारी अब्बाई'मधून चौथा असिस्टंट डायरेक्टर , म्हणून काम पाहिले असले, तरी खरा प्रवास सुरु झाला तो १९८९ मध्ये आलेल्या तेलगू 'सिवा' पासून. हाच पुढे जाऊन, १९९० मध्ये हिंदीत 'शिवा' या नावाने, नव्याने बनवला गेला (डब नव्हे), बरेचसे महत्वाचे कलाकार तेच ठेवून, त्याच इम्पॅक्टसहित.

शिवाची कहाणीही खूप इंटरेस्टेड आहे. शिवाची स्क्रिप्ट रामूने मनापासून किंवा खूप अभ्यासपूर्वक वगैरे लिहिली नव्हती. त्याच्या मनात 'रात' च्या कथेने धुमाकूळ घातला होता आणि त्याला त्यात जास्त इंटरेस्ट होता. नेमके याच दरम्यान, वेंकट अक्कीनेनी निर्माता म्हणून आपल्या भावासाठी (नागार्जुना) एका वेगळ्या कहाणीच्या शोधात होते आणि त्यांनी रामुला एका युवकाला मध्यवर्ती नायकाच्या भूमिकेत धरून एखादी स्क्रिप्ट लिहायची मागणी केली. 

रामुने, त्यावर आधारीत शिवा नामक युवकाची कथा लिहिली. कॉलेजमध्ये शिकण्यासाठी दाखल झालेला एक सरळमार्गी नायक, शांत राहणं रक्तात नसल्यामुळे, अन्यायाच्या विरोधात उभा राहतो, त्यात गुंतत जातो आणि परिस्थिती बदलायच्या खेळामध्ये सर्व हरवून बसतो, अशी साधारण कहाणी होती. 

केवळ चित्रपट म्हणून नव्हे तर रामूच्या वेगळ्या शैलीसाठी, ब्रेथटेकिंग बॅकग्राऊंड म्युझिक, साऊंड डिझायनिंग, सिनेमॅटोग्राफी, स्टेडीकॅम या तोवर कधीही न वापरलेल्या नव्या टेक्निकसाठी आणि त्याच्या पॉवरफुल आऊटकमसाठी, पडद्यावर घडणाऱ्या आणि नाटकी किंवा अतिशीयोक्ती न वाटणाऱ्या प्रामाणिक आणि वास्तववादी अटेम्प्टसाठी आणि एका नवीनच प्रकारच्या ग्रीटी जॉनरसाठी, 'शिवा' हा एक नवा अध्याय होता.

पहिला सीन सुरू होतो तो कॉलेजसमोर एक गाडी येऊन थांबते इथून. कॉलेजवरचा कॅमेरा हळूहळू रस्त्यावर येणाऱ्या गाडीच्या चाकावर, गाडीतून उतरणाऱ्या गणेशच्या पायावर आणि नंतर, बिडी तोंडात टाकणाऱ्या बेरकी चेहरयावर स्थिरावतो. तीच बिडी नंतर पेटवत, चहाच्या टपरीवर 'जेडी'ची वाट पाहत तो थांबतो.

कट टू, कॉलेजमध्ये जेडी, लेक्चर संपायची वाट पाहतोय.

इथेही दोन बाकांच्या मधल्या पॅसेजमधून टॉप अँगलने कॅमेरा मागच्या बाकापासून पुढच्या बाकापर्यंत येत, लेक्चररवर स्थिरावतो आणि लेक्चर संपतं. 

सर्व स्टुडंट्स कॉलेजच्या बाहेर निघतात, जेडीही. बाहेर आल्यावर जेडी, गणेशला ज्या कामासाठी बोलावले आहे त्यासाठी इशारा देतो आणि त्यानंतर गणेश आणि त्याचे साथीदार जेडीच्या सांगण्यावरून एकाला, त्याचा साथीदारांसकट रस्त्यावर झोडपून काढतात. 

तो बेशुद्धावस्थेत गाडीमागे पडलेला असताना, एक लॉंग शॉट, गाडीच्या मागच्या धुराच्या नळकांडीवर येऊन स्थिरावतो, गाडी निघते आणि स्क्रीनभर धूर पसरतो, यातच सिनेमाची पाटी पडते, 'शिवा' आणि ओपनिंग क्रेडीट्स सुरू होतात. बॅकग्राऊंडमध्ये इलय्या राजाचं ग्रिटी, इंटेन्स म्युझिक वाजत राहतं, पुढे काहीतरी भन्नाट पाहायला मिळणार याची ग्वाही देणारं आणि आपली ऑफिशियली त्या दुनियेत एंट्री होते.

हा पहिला सीन फार महत्वाचा आहे, गणेश, हे तसं फारच दुय्यम पात्र (आणि दुर्दैवाने कलाकारही) असलं तरी, हा पहिला सीन अख्ख्या सिनेमाचा माहोल सेट करतो आणि तो पुढे कायम राहतो. 

याच गणेशाचा अजून एक सीन आहे, जेव्हा जेडी आणि शिवाचं एक-दोनदा वाजलेलं आहे आणि शिवाने जेडीच्या विरोधात स्टूडेंट युनियनच्या इलेक्शनसाठी त्यांच्याच ग्रुपमधल्या नरेशला उभे केले आहे. इलेक्शनमधून नरेशने माघार घ्यावी म्हणून समज द्यायला, जेडी गणेशला घेऊन येतो. त्यावेळेस गणेश आणि शिवाच्या संवादादारम्यान एका वेळी जेडी शिवाच्या अंगावर धावून जायचा प्रयत्न करतो आणि गणेश त्याला अडवत, "मैं बात कर रहा हूँ ना?", म्हणत त्याला अडवतो. या सीनमध्ये रामुला गणेशच्या चेहऱ्यावर वैतागलेले एक्सप्रेशन्स हवे होते, जे काही केल्या येत नव्हते. अखेर 'शिवा नागेश्वर राव' या असिस्टंट डायरेक्टरने, गणेशला रामुच्या चेहऱ्याकडे लक्ष द्यायला सांगितले, कारण तो एव्हाना बऱ्यापैकी इरिटेड झालेला होता आणि त्यानंतर १७ रिटेक्सनंतर हा शॉट ओके झाला.

स्टेडीकॅमचा वापर करून शूट केलेलं चेसिंग सिक्वेन्सेस आणि त्याच्या जोडीला वाजत राहणारं इलैया राजाचं बॅगराऊंड म्युझिक हा चित्रपटाचा आत्मा आहे. सरकारमध्ये पाहिलेले लो अँगल शॉट्स, चहाच्या कपातून, खुर्चीच्या दांडीतून दिसणारे शॉट्स यांचा उगम खरेतर इथे झालाय. ओपनिंग क्रेडिटच्या जस्ट आधीचा, गाडीच्या धुरात मिसळणारा लो अँगल शॉट्, मित्राच्या लग्नासाठी चाललेल्या गाडीचा पाठलाग करतानाचा सीन, आशाला बस स्टॉपवरून किडनप करताना आणि नंतर रेल्वे गेटचा सीन हे त्यातल्या त्यात मोजके. 

चित्रपटातील काही सीन्स आयकॉनिक आहेत. जो सगळ्यात जास्त ओळखला जातो तो सायकल चैनवाला सीन. प्रॅक्टिकली हे शक्य नसल्याने, हा सीन ठेवावा की नको अश्या द्विधा मनस्थितीत असताना, रामुने फायनली तो तसाच ठेवायचे ठरले आणि तो एक अजरामर सीन ठरला. 

याचप्रमाणे, शिवा त्याच्या भावाच्या मुलीला  दवाखान्यातून परतताना सायकलवरचा चेसिंग सिक्वेन्स आणि नंतर तिला उचलून गल्लीबोळातून पळत पळत अखेर बस पकडण्याचा सीन हाही चित्रपटाची एक हायलाईट आहे, या सीनमध्ये गल्लीबोळांतून धावताना केलेलं कॅमेरावर्क अफलातून आहे, त्याचा एक वेगळाच इफेक्ट जाणवतो. पाठलाग करणाऱ्यांपैकी एक जण बसच्या मागे शेवटपर्यंत जिवाच्या आकांताने पळताना दाखवला आहे, त्याला खरे तर खूप आधी थांबायचे होतं, तसे ओरडून सांगण्यातही आले होते, पण सिनच्या ओघात तो धावतच राहिला. फायनली त्याचा पॉवरफुल इम्पॅक्ट लक्षात घेता तो सीन तसाच ठेवण्यात आला आणि त्यामुळेच तो पडद्यावर पाहताना वास्तवाशी धरून आणि जास्त परिणामकारक वाटतो.

एक कॉलेजमधला चेसिंग सिक्वेन्स आहे जेडी आणि शिवामध्ये, त्यात पायांचा आणि श्वासांचा आवाज अत्यंत खुबीने वापरण्यात आला आहे. अश्याच एक सीनमध्ये छोटुचा पाठलाग करणाऱ्यांच्या मोठ्या सावल्या एका बिल्डिंगवर धावत येत छोट्या होताना दिसतात, हा इफेक्ट एक वेगळ्याच प्रकारची दहशत निर्माण करतो आणि ते खूपच परिणामकारकरपणे पडद्यावर दिसते.

असाच एक प्रकाशचा पाठलाग करताना एक सीन आहे (axe scene), ज्यात अखेरीस गणेश त्याला मारतो. तो, mirage effect दिसण्यासाठी, कॅमेराच्या खाली स्टोव्ह ठेऊन शूट करण्यात आला होता. असेच नेमके इफेक्ट्स येण्यासाठी, ट्रॅफिकमधल्या खऱ्या गाड्यांचे आवाज रेकॉर्ड करण्यात आले होते. शिवा आणि भवानीच्या टेरेसवरील क्लायमॅक्स सीनसाठीही एका इलेक्ट्रीशियनच्या मदतीने एक मोठा फॅन वापरून हवेच्या आवाजाचा इफेक्ट देण्यात आला होता. या सर्व बारकाईंमुळे चित्रपट वास्तवाशी नाळ जोडून राहतो. 

अजून एक प्लस पॉईंट म्हणजे, यातले कॅरॅक्टर्स खरे वाटतात, ओढून ताणून किंवा अतिशियोक्ती करणारे नव्हे. शिवा सायकलवर लहान मुलीसोबत जात असताना, त्याला पाठलाग करणारे गुंड दिसतात तेव्हा तो तिला घेऊन बेफाम पळतो, नॉर्मल माणूस जे करेन तोही तेच करतो. शिवा आणि त्याच्या वहिनीतले नातेही असेच. जिथे प्रत्येक हिंदी चित्रपटात देवर-भाभी हा साखरेच्या पाकात घोळलेला विषय, तिथे इथली भाभीही प्रॅक्टिकल आहे, तिला तिच्या परिवाराच्या भविष्याची, मुलीची काळजी आहे आणि त्यासाठी तिचा शिवावर पैसे खर्च करण्यास विरोध आहे आणि जे आपल्यालाही पटतं.

'शिवा' ही नागार्जुनासाठी खरेतर हिंदीमध्ये, खूपच दमदार एंट्री होती, पुढे त्याचं म्हणावं तसं सोनं झालं नाही, हे दुर्दैव, पण त्याला तेलगू सिनेमाने भरभरून दिलेलं आहे, अजूनही तितक्याच ऊर्जेने तो कार्यरत आहेच, त्यामुळे त्याला ही खंत नसावी. नागार्जुनाने साकारलेला शिवा हा शांत, संयमी, डोळ्यांनी बोलणारा आहे. शिकायला आल्यामुळे नको त्या लफडयात त्याला पाडायचं नाहीये, पण त्याच बरोबर अन्यायाच्या विरोधात उभे राहायलाही तो मागे पुढे पाहत नाही.

सध्याच्या पिढीतल्या 'रंग दे बसंती' मधल्या पात्रांच्या विचारसरणीच्या छटा पंचवीस वर्षांपूर्वी, त्यावेळी शिवाच्याही विचारात दिसल्या. परिस्थितीला दोष देण्यापेक्षा परिस्थिती बदलणे गरजेचे आहे आणि त्याची सुरुवात आपणच केली पाहिजे, अशी त्याची मते होती.

जेव्हा आशा म्हणते, 'मतलब ये देश कभी नही सुधर सकता' त्यावर तो शांतपणे, 'सब लोगो के ऐसे सोचनेसे ही देश की ये हालत हैं' म्हणतो.

आशाच्याच, 'पता नही ये सब कब ठीक होगा?' या वक्तव्यावरही तो, 'कोई भी चीज अपने आप ठीक नही होती' असे तिला ठणकावून सांगतो.

चित्रपटाची अजून एक दमदार हायलाईट म्हणजे, रघुवरनने साकारलेला 'भवानी'.

पहिल्या पाच मिनिटापासून भवानीचे नाव आपल्याला ऐकू येते आणि वारंवार कानावरही पडते, पण प्रत्यक्ष तो पडद्यावर येतो तो एक तासाभराचा चित्रपट झाल्यानंतर आणि तरीही तो छाप पाडून जातो.

'सियासी लढाई में तीलकधारी जैसे लिडरो को भवानी जैसे गुंडो की जरूरत पडती हैं' हा एक संवाद इन्स्पेक्टरच्या तोंडी सुरुवातीलाच ऐकायला मिळतो. जसा तीलकधारीने भवानीला पाळलेला आहे तसाच भवानीने गणेश आणि जेडीला. राजकारण, शहरातली दहशत आणि कॉलेजमधले राजकारण यात जम बसण्यासाठी बनवलेली ही एक चेन आहे.

गणेश हा केवळ एक प्यादा आहे 'भवानी' नामक वजीराचा. हा वजीरही 'तिलकधारी' नावाच्या राजकारणी राजाच्या आदेशानुसार सांगेल तेवढी घरं चालणारा सेवकच, पण अस्तित्वाचा प्रश्न आला तर त्यालाही डसणारा. शांत डोक्याचा, तरीही डोळ्यांनी आग ओकणारा. किरकोळ शरीरयष्टी वाटत असली तरी त्याची भीती वाटावी एवढा धाक नजरेत, देहबोलीत आणि तुटक हिंदी बोलण्यात नक्कीच जाणवतो. त्याचे काही डायलॉग्स साधे वाटत असले तरी दमदार आहेत.

"जो कुछ भी शिवा के बारे में सून रहा हूँ, लगता हैं की वो कोई चिल्लर में खर्च करनेवाली चीज नही हैं, अगर ठीक तरह से इस्तेमाल किया तो हमारे काम आ सकता हैं.." 

"हमारे धंदे में सबसे जरुरी चीज हैं डर, क्यूकी इसी से हमारा धंदा चलता हैं.."

"हमारे धंदे का उसुल हैं की दुश्मन का हाथ उठने से पहले ही उसे कट देना चाहीये.."

परेश रावलने साकारलेला तीलकधारीही पक्का मुरलेला बनेल राजकारणी आहे. चित्रपटात मोजून चार ते पाच सीन असतील, पण त्यात तो आपली छाप पाडून जातो. तीलकधारी हा राजा आहे असे वाटत असतानाच भवानी त्याला ओव्हरशैडो करून, स्वतःची ताकद पटवून देतो.

शिवात असलेला 'दम' पाहून भवानी त्याला जेडीच्या जागी रिप्लेसमेंट म्हणून ऑफर देतो, तर तिलकधारी भवानीच्या जागी. पण या सगळ्या चाली खोडून काढत अखेर शिवा त्यांची आणि त्यांच्या धंद्यांची पाळंमुळं उखडून काढतो. अर्थात या प्रवासात त्याला, बऱ्याच आपल्या माणसांना मुकावं लागतं.

तर, असा हा 'शिवा' रिलीज झाला आणि केवळ अव्हरेजची अपेक्षा ठेऊन असलेले निर्माते आणि रामू त्याच्या अपार सफलतेने चकित झाले. शिवाने स्वतःचे नाव चित्रपटसृष्टीच्या कल्ट क्लासिकमध्ये कायमचे नोंदवले.

बेसिक स्क्रिप्ट लिहिताना रामूने स्वतः सुभाष घईंच्या 'कालीचरण' आणि राहुल रवैलच्या 'अर्जुन'चे काही सीन्स उचलले असल्याची स्पष्ट कबुली दिली आहे. शिवा, या मेन प्रोटोगोनिस्टवर आणि बेसिक प्लॉटवर अर्जुनची प्रचंड छाप दिसते, केवळ ट्रीटमेंट वेगळी आहे (अशीच छाप गर्दीश मधल्या जॅकीच्या कॅरॅक्टरवरही आहे, योगायोग म्हणजे त्यात जॅकीच्या कॅरॅक्टरचेही नाव शिवाच आहे, अर्थात ट्रीटमेंट इथेही वेगळी आहेच).

हिंदी 'शिवा'च्या बऱ्याच आधी 'अर्जुन' येऊन गेला असला आणि काही बाबतीत तो 'शिवा'हून सरस असला तरी शिवाला असलेला रामूटच, हे ऍडिशनल बेनिफिट शिवाला हिंदीतली एक पाथब्रेकिंग मूवी नक्कीच बनवते. यात पुढच्या कितीतरी रामू व इतर फिल्ममेकर्सच्या फिल्म्सची बीजं रोवली गेली, हे नाकारता येणं केवळ अशक्य आहे.

तेलुगुत तर निःसंकोचपणे बिफोर सिवा आणि आफ्टर सिवा असे चित्रपटांचे वर्गीकरण करतात, इतका गेमचेंजर आणि पाथब्रेकिंग क्राईम बेस्ड मूवी होता तो.

पुढे जाऊन 'शिवा' इतक्याच ताकदीचा अजून एक कल्ट, पाथब्रेकिंग 'सत्या' रामूने इंडस्ट्रीला दिला. त्यानंतर कंपनीलाही प्रेक्षकांनी पसंत केले, 'सरकार'ला तर डोक्यावर घेतले. अंडरवर्ल्ड म्हणजे रामू हे समीकरण बनत असतानाच रामूची वाट चुकली, त्याचे चित्रपट नुसतेच पडायला लागले नाही तर त्यातला रामू टच पुसट होत होत नाहीसा झाला. नाही म्हणायला रक्त चरित्र मध्ये पुन्हा जुन्या रामुच्या झलक दिसली, तीही तेवढ्यापुरतीच. 

पण तरीही सच्च्या रामू फॅनला, तो पुन्हा तशीच दमदारपणे 'सत्या'म 'शिवा'म सुंदरम वापसी करेल, याची खात्री आहे.

© राज जाधव (२३-१०-२०१७)

Comments

Popular Posts